मुंबई : दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाचा एक मॉर्फ व्हिडीओ सध्या समाज माध्यमावर व्हायरल होत आहे. यावर विविध स्तरांतून संताप व्यक्त केल्यानंतर आता स्वत: रश्मिकाने याबद्दल मौन सोडले आहे. या आक्षेपार्ह व्हिडीओबद्दल महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील नाराजी व्यक्त करत कायदेशीर कारवाईची मागणी केली होती. अशातच आता अभिनेत्री रश्मिका मंदानाने स्वतः यावर प्रतिक्रिया दिली आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक नोट शेअर करत संताप व्यक्त केला आहे.
काय म्हणाली रश्मिका मंदाना?
“माझा डीपफेक व्हिडीओ ऑनलाइन मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे, हे पाहून मला खूप दुःख झालंय. याबद्दल बोलणं गरजेचं आहे. हे फक्त माझ्यासाठीच धक्कादायक नाही तर आपणा सर्वांसाठीच धक्कादायक आहे, कारण तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात गैरवापर केला जात आहे. एक महिला व एक अभिनेत्री म्हणून मी माझे कुटुंब, मित्र आणि शुभचिंतकांचे आभार मानते कारण ते माझे संरक्षक आणि सपोर्ट सिस्टिम आहेत. पण हे मी शाळा किंवा कॉलेजमध्ये असताना घडलं असतं तर मी हे कसं हाताळलं असतं, याची मला कल्पनाही करवत नाही. इतर अनेक जण अशा प्रकरणाला बळी पडण्यापूर्वी आपण याचा एक समाज म्हणून निषेध करायला पाहिजे,” असं तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.