नवी दिल्ली : दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाचा आक्षेपार्ह व्हिडीओ सध्या समाज माध्यमावर व्हायरल होत आहे. यावर कलाकारांनी तर नाराजी व्यक्त केली आहेच, पण स्वत: रश्मिकाने देखील यावर संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, या आक्षेपार्ह व्हिडीओवर मोदी सरकारकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी डीपफेक व्हिडीओ प्रकरणावर प्रतिक्रिया दिली असून त्यांनी म्हटले आहे की, “मोदी सरकार इंटरनेट वापरणाऱ्या सर्व डिजिटल नागरीकांची सुरक्षा आणि विश्वास सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे”, असे त्यांनी म्हटले आहे.
पुढे केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर म्हणाले की, “मोदी सरकार इंटरनेट वापरणाऱ्या सर्व डिजिटल नागरिकांची सुरक्षा आणि विश्वास सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे. एप्रिल २०२३ मध्ये अधिसूचित आयटी नियमांनुसार सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी काही गोष्टी बंधनकारक करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये कोणत्याही युजरद्वारे कोणतीही चुकीची माहिती पोस्ट केली नाही, याची खात्री करा. तसेच कोणत्याही युजरने किंवा सरकारने याबद्दल रिपोर्ट दिल्यानंतर चुकीची माहिती ३६ तासांत काढून टाकली जाईल याची खात्री करा. जर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने याचे पालन केले नाही तर, नियम ७ लागू होईल आणि प्लॅटफॉर्मविरोधात आयपीसीच्या तरतुदींनुसार पीडित व्यक्ती न्यायालयात जाऊ शकते. याशिवाय डीप फेक हे लेटेस्ट तंत्रज्ञान असून खूप धोकादायक आणि हानीकारक आहे. त्यामुळे चुकीची माहिती पसरवण्याच्या बाबतील सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे हे योग्य पद्धतीने हाताळले जाणे आवश्यक आहे.”