मनुष्याच्या शरीराची रचना अतिशय आदर्श आहे. हालचाल व्यवस्थित व्हावी, यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सांधे शरीरात असतात. या सर्वांवर मेंदूचा प्रभाव असतो. पाठीचा कणा अतिशय सुंदर असा आहे. त्याचे दोन मागच्या बाजूचे बाक आणि एक पुढच्या बाजूचा बाक यामुळे शरीराच्या वरच्या भागाचे वजन व्यवस्थित पेलले जाते. शरीराची व्यवस्थित काळजी घेतली, तर अनेक वर्षे तो आपल्या शरीराचे वजन व्यवस्थित पेलत असतो. यात बिघाड झाला, तर गुडघेदुखीस सुरुवात होते. गुडघेदुखी, त्यावरील उपाय, शस्त्रक्रिया यांचा थोडक्यात आढावा घेऊया.
गुडघेदुखीची कारणे
१) वयाप्रमाणे होणारी झीज : वयाच्या ५०व्या वर्षांनंतर सांध्याची झीज जाणवू लागते. सांध्यामधील वंगण कमी होते व सांध्यामधील मिनिस्कस घासले जाऊ लागते. अनेक वरिष्ठ नागरिकांना गुडघेदुखीचा त्रास जाणवतो.
२) लठ्ठपणा : शरीराचे वजन पेलण्यासाठी शरीरास सुंदर बाक ठिकठिकाणी दिलेला आहे. यामुळे शरीराचे वजन व्यवस्थित पेलले जाते व कुठल्याही एका सांध्यावर त्याचा परिणाम होत नाही. वजन अवास्तव वाढल्यामुळे पोटाचा घेर वाढणे, नितंबाभोवती चरबी जमा होणे. मांड्यामध्ये चरबी जमा होणे इत्यादी कारणांमुळे शरीराच्या वजनाचा भार गुडघ्यांवर येतो. जिने चढणे, उतरणे, जमिनीवर मांडी घालून बसणे इत्यादी गोष्टी त्रासदायक वाटू लागतात. पुढे-पुढे हे दुखणे २४ तास आपली साथ देते. सांध्याची हालचाल कमी झाल्यामुळे मांडीचे आणि पोटर्यांचे स्नायूदेखील क्षीण होतात व आपलेच गुडघे आपलेच वजन पेलू शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण होते.
३) संधिवात : संधिवातात शरीरातील सर्व सांधे, खास करून छोट्या सांध्याना अपाय होतो. आजार बळावल्यास गुडघेदुखी चालू होते.
४) गुडघ्यांना इजा होणे : खेळताना गुडघ्यांना इजा होणे. फुटबॉल, क्रिकेट, बेसबॉल, हॉकी, कबड्डी यांसारख्या खेळांमध्ये गुडघ्यास इजा होण्याची शक्यता जास्त असते. यावेळेस गुडघ्याभोवती असलेल्या आवरणाला (लिगामेंट इन्जुरी) इजा होते. काही वेळा सांध्याच्या मधील मिनिस्कसला इजा होते. याशिवाय अपघात होणे, पडणे यांनीदेखील गुडघ्यास इजा होते.
५) गुडघ्यात पाणी किंवा पू जमा होणे : यामुळे ताप येऊन गुडघेदुखी होते.
६) लहान मुलांमध्ये ‘हुमॅटिक हार्ट डिसिज’मध्ये हृदयाच्या झडपांवर परिणाम होतो. या आजाराची सुरुवात बर्याच वेळा गुडघ्याला सूज येऊन होते.
७) गुडघ्याचा कर्करोग : अगदी अल्प प्रमाणात ही गुडघेदुखी कर्करोगामुळे देखील असू शकते.
गुडघेदुखीची यादी मोठी आहे. यातील प्रमुख कारणांचा येथे उल्लेख केला आहे.
१) सांधेदुखी : सुरुवातीला सांधेदुखी फक्त जिने चढता, उतरताना, जमिनीवर बसताना होते. जास्त वेळ उभे राहिल्यास देखील गुडघे दुखू लागतात. पुढे हे दुखणे वाढते व सांधे दिवसभर दुखतात. सांधेदुखीमुळे काही वेळा रात्रीची झोप व्यवस्थित होत नाही. सांध्याची हालचाल करताना वेदना होतात. सांध्यांची हालचाल मर्यादित होऊ लागते व सांधे ताठर होतात. २) साध्यांना सूज येणे : ही सूज जुन्या आजारांमुळे वा सांध्यामध्ये पाणी भरल्यामुळे येऊ शकते. ३) ताप येणे - संधिवातात गुडघेदुखीबरोबर ताप येतो. ४) सांधे कमकुवत झाल्यामुळे शरीराचा तोल जाणे, पडणे, वाटी सरकणे यासारखी लक्षणे उद्भवतात. ५) सांधेदुखीमुळे कामावर व व्यवसायावर देखील परिणाम होतो.
निदान व चाचण्या
गुडघ्याच्या हालचालीच्या वेळेस वेदना होणे, गुडघ्यावर सूज येणे या गोष्टी तपासणीत कळतात. रुग्णास सरळ उभे केल्यास दोन गुडघे एकमेकांस स्पर्श करत नाहीत. त्यांच्यात अंतर राहते. यामुळे शरीराचे वजन पेलणे कठीण जाते. गुडघ्याचा एक्स रे : यात निदानासाठी बरीच माहिती मिळू शकते. हाडांमध्ये झालेली झीज, सांध्यामधील पोकळी कमी होणे. गुडघ्यांची हाडे टोकदार होणे इत्यादी लक्षणे एक्स-रेमध्ये आढळून येतात. रुग्णाचे ऑपरेशन करायचे असेल, तर ‘एमआरआय’, ‘ऑर्थोस्कोपी’, ‘ट्यूमर निडल बायोप्सी’ यासारख्या चाचण्या केल्या जातात. इतर चाचण्या : वरिष्ठ नागरिकांनी आपल्या रक्ताची चाचणी नियमित करावी, ‘सीबीसी’, ‘इएसआर’, ब्लड शुगर, क्रिआटिनिन, कोलेस्ट्रोल इत्यादी चाचणी करून घ्याव्यात. याशिवाय संधिवाताचा संशय येत असल्यास ‘आरए टेस्ट’ करून घ्यावी.
उपचार : वेदनेसाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने ‘पॅरासिटामॉल’, ‘डायक्लोफेनॅक’, ‘ब्रुफेन’ यापैकी एक गोळी घ्यावी. जास्त दिवस गोळ्या घ्याव्या लागणार असतील, तर ‘पायरॉक्स’सारखी दिवसालाएक घ्यावी लागणारी गोळी घ्यावी. गुडघ्याला चोळण्यासाठी वोलीनी क्रिम, स्लोन्स लिनिमेंट, रेली स्प्रे यांचा वापर करावा. गुडघ्याच्या हालचालींना मदत व्हावी म्हणून कॅप वापरावी.
फिजिओथेरपी : वेदना जास्त प्रमाणात असतील, तर शॉटे वेव्ह डायाथर्मीचा शेक डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावा. ‘मसल्स स्ट्रेन्गथनिंग’ व्यायाम डॉक्टरांकडून शिकून घ्यावे व ते घरी नियमित करावे. फिजिओथेरपीने बर्यापैकी आराम मिळतो. आजार जुना असल्यास व वेदना जास्त असल्यास किंवा हिंडणे, फिरणे कठीण झाल्यास शस्त्रक्रियेचा विचार करावा. ऑर्थोस्कोपीमध्ये दुर्बीणीच्या साहाय्याने गुडघ्याच्या सांध्यामध्ये असलेला दोष दूर केला जातो. गुडघेदुखीवरील शेवटचा उपाय म्हणजे ‘टोटल क्नी रिप्लेसमेंट’ (टिकेआर) : या शस्त्रक्रियेत नवीन सांधा बसविला जातो. धातूच्या बनलेला सांधा यात वापरला जातो.
टिकेआर कुणी करावे : १) वेदना प्रचंड असतील व त्या सहन होत नाहीत. अनेक वर्षे असलेला आजार. २) अपघातात गुडघ्याला झालेली गंभीर जखम. ३) तरुण वयात झालेला गुडघ्याचा आजार व त्यामुळे नोकरी-व्यवसायात होणारी अडचण.
४) संधिवातामुळे जखडलेले गुडघ्याचे सांधे.
काही वर्षांपूर्वी ‘टिकेआर’ शस्त्रक्रियेची फॅशन निघाली होती. प्रत्येक गुडघ्याच्या आजाराच्या रुग्णाला ‘टिकेआर’चा सल्ला दिला जायचा. किंमतदेखील भरमसाठ आकारली जायची. काही वर्षांपूर्वी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मेटल क्नी जाईंट आणि हृदयाच्या स्टेंटवर सिलिंग जाहीर केले. या सिलिंगचा परिणाम म्हणून सर्जनची ‘टिकेआर’मधील रुची कमी झाली. ‘टिकेआर’ शस्त्रक्रिया करण्याआधी ‘सेकंड ओपिनियन’ घेणे केव्हाही फायद्याचे असते. शस्त्रक्रिया करण्याचे नक्की झाल्यास येणारा खर्च, कॅशलेस सर्व्हिस, हॉस्पिटलमधील वास्तव्य याबाबत चौकशी करून घ्यावी. ‘टिकेआर’ने आपल्या गुडघ्याच्या वेदना कमी झाल्या तरी वरिष्ठ नागरिकांच्या इतर व्याधी आपणास त्रास देण्यास सज्ज असतात. ‘टिकेआर’ शस्त्रक्रियेची मी जुन्या कारच्या रिपेरिंगशी तुलना करतो. जुन्या गाडीचा सायलेंसर बदलला व आवाज येणे बंद झाले तरी गिअर बॉक्स, बॅटरी इत्यादी पार्टसची कामे बाकी राहतात. ‘टिकेआर’ शस्त्रक्रिया झाल्यावर ‘क्वालिटी ऑफ लाईफ’ मिळेल याची शाश्वती नाही.
आर्युवेद आणि गुडघेदुखी : वात, पित्त आणि कफ या त्रिदोषातील समतोल बिघडल्यास सांधेदुखी सुरू होते. विकृत आममुळे ही सांधेदुखी निर्माण होते. बरेच आर्युवेदाचार्य गुडघेदुखीसाठी रोज रात्री एरंडेल तेल घेण्याचा सल्ला देतात. तीन ते चार चमचे एरंडेल तेल रात्री नियमित घेणे. एकदा सवय झाल्यास त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागतात. हा उपाय आर्युवेदतज्ज्ञाच्या सल्ल्याने करावा.
याशिवाय आर्युवेदात ‘रुमानिन’ किंवा ’सलाकी’ या गोळ्या दिल्या जातात. गुडघ्यावर लावण्यासाठी ‘रुमानिल लिनिमेंट’ दिले जाते. आर्युवेदात आहार व पत्थ्यास फार महत्त्व आहे. आपल्या आहारात डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य बदल करावा. वजन कमी करण्यास प्राधान्य घ्यावे.
प्रतिबंधात्मक उपाय : गुडघेदुखीसाठी काय प्रतिबंधात्मक उपाय असणार? आपले शरीर सुडौल व निरोगी ठेवणे हे त्यावरील उत्तर आहे. वाढलेल्या वजनाचा आणि बेढब शरीराचा बोजा आपल्या गुडघ्यांवर येऊ लागतो. कालांतराने ते देखील कुरकुर करू लागतात व गुडघेदुखीचा प्रारंभ होऊन पुढे आपण ‘टिकेआर’ शस्त्रक्रियेच्या मार्गाने वाटचाल करू लागतो. सकाळी लवकर उठणे, ध्यान-धारणा, योग करणे, मानसिक ताण कमी करणे, नियमित योग्य आहार घेणे, मद्यपान आणि धूम्रपान बंद केल्यास आपले गुडघे सुदृढ राहतील. आपले गुडघे सुदृढ राहावे ही सदिच्छा!
डॉ. मिलिंद शेजवळ
९८९२९३२८०३