रायपूर : छत्तीसगडमध्ये भाजप नेते रतन दुबे यांची नक्षलवाद्यांकडून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना याबाबत जाब विचारला असता त्यांनी ही छोटीमोठी घटना असल्याचे म्हटले आहे. तसेच आपल्यामुळे नक्षलवाद्यांची संख्या कमी झाल्याचे सांगत स्वत:ची स्तुतीही केली आहे.
भाजप नेते रतन दुबे यांच्या हत्येनंतर मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रतन दुबे यांच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला. त्यानंतर त्यांनी स्वत:ची प्रशंसा करत सांगितले की, "आमच्या सैन्याच्या सततच्या दबावामुळे नक्षलवादी प्रभाव कमी झाला आहे. काही ठिकाणी तुरळक घटना घडत आहेत हे नाकारता येणार नाही. पण पूर्वीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती यात फरक आहे," असे ते म्हणाले.
त्यांच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्यावर प्रचंड टीका करण्यात येत आहे. याबाबत एका युजरने म्हटले की, भूपेश बघेल सरकार छत्तीसगडला नक्षली हिंसाचारापासून वाचवू शकले नाही, त्यामुळे जनतेचा त्यांच्यावरील विश्वास उडाला आहे.
दरम्यान, निवडणूक प्रचारासाठी गेलेल्या रतन दुबे यांची ४ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी बस्तरमध्ये हत्या करण्यात आली. नक्षलवाद्यांनी धारदार शस्त्राने वार करत त्यांची हत्या केली आहे. याप्रकरणाचा पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.