'जय-रुद्र'चा पहिला वाढदिवस उत्साहात !

    04-Nov-2023
Total Views |


Jay Rudra 1st birthday




मुंबई (विशेष प्रतिनिधी):
भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयामध्ये जय आणि रुद्र या दोन वाघाच्या बछड्यांचा पहिला वाढदिवस शनिवार दि. ४ नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात आला.


शनिवारी सकाळी १० वाजता या दोन भावंडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला असून त्यांच्यासाठी प्राणिसंग्रहालयामार्फत विशेष सजावट करण्यात आली होती. वाघाच्या एक्झिबिट म्हणजेच पिंजऱ्याजवळ वाढदिवसाची सजावट करण्यात आली होती. शक्ती आणि करिश्मा या वाघांची ही दोन पिल्लं असून गेल्या वर्षी ४ नोव्हेंबरला त्यांचा जन्म झाला होता.


जय आणि रुद्र यांचे फोटो लावून राणीच्या बागेत सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला होता. त्याचबरोबर, शक्ती करिश्मा आणि जय रुद्र यांच्याबद्दल माहिती पर्यटकांना सांगण्यासाठी एका किपर ही ठेवण्यात आला होता. तसेच, येणाऱ्या पर्यटकांसाठी ही काहीतरी विशेष आणि नाविन्यपूर्ण बाब असल्यामुळे त्यांचा उत्साह दिसून येत होता अशी माहिती उद्यानाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. अभिषेक साटम यांनी मुंबई तरुण भारतशी बोलताना दिली.

"जय आणि रुद्र आज वेगळ्याच 'मूड' मध्ये असलेले पहायला मिळाले. प्रदर्शन भागातील त्यांची मस्ती, आनंदाने उड्या मारताना पाहणं पर्यटकांना अधिक आकर्षित करणारं होतं."

- डॉ. अभिषेक साटम
जनसंपर्क अधिकारी
वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय