केरळ उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश! धार्मिक स्थळांवर फटाके फोडण्यास बंदी

04 Nov 2023 16:30:49

Kerala


मुंबई :
केरळ उच्च न्यायालयाने फटाके फोडण्यासंबंधी एक महत्त्वपुर्ण आदेश दिला आहे. देवाला प्रसन्न करण्यासाठी फटाके फोडणे आवश्यक आहे, असे कोणत्याही धर्मग्रंथात लिहिलेले नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच सर्व धार्मिक स्थळांवरील बेकायदेशीरपणे साठवलेले फटाके ताब्यात घेण्याचे निर्देश दिले आहेत.
 
जिल्हाधिकार्‍यांकडून स्फोटक नियमांतर्गत स्फोटक परवाने दिले जात असून केवळ काही मंदिरांकडेच असे परवाने आहेत. तसेच फटाके फोडल्याने ध्वनी आणि वायू प्रदूषण होत असल्याने अशा प्रकारचे परवाने दिले जाऊ नयेत, असे याचिकाकर्त्याने म्हटले आहे.
 
शुक्रवार ३ नोव्हेंबर रोजी न्यायमूर्ती अमित रावल यांच्या एकल खंडपीठाने कोचीन आणि इतर जिल्ह्यांच्या पोलीस आयुक्तांच्या मदतीने उपजिल्हाधिकाऱ्यांना सर्व धार्मिक स्थळांवर छापे टाकून तेथे बेकायदेशीरपणे ठेवलेले फटाके जप्त करण्याचे निर्देश दिले. यासोबतच कोणीही फटाके फोडू नयेत, अशा सूचना देण्याचेही आदेश दिले आहेत.
 
केरळमधील सर्व धार्मिक स्थळांवर फटाके फोडण्यावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने पुढे सांगितले की, “कोणत्याही धर्मग्रंथात देवाला प्रसन्न करण्यासाठी फटाके फोडणे आवश्यक आहे, असे लिहिलेले नाही. त्यामुळे धार्मिक स्थळांवर रात्री उशीरापर्यंत फटाके फोडले जाणार नाहीत."
 
तसेच या आदेशानंतरही जर फटाके फोडले गेले तर न्यायालयाकडून अवमानाची कारवाई केली जाईल, असे न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे. प्रदूषण आणि इतर अनेक कारणांमुळे दिल्ली आणि हरियाणामध्येही रात्री १० नंतर फटाके फोडण्यास न्यायालयाने बंदी घातली आहे. त्यानंतर आता केरळ उच्च न्यायालयाने आपल्या राज्यातही रात्री उशिरा फटाके फोडण्यावर बंदी घातली आहे.



Powered By Sangraha 9.0