कलाशिक्षण हे समाजामध्ये उपयोगी आणि वेगवेगळ्या प्रकारचे असे मौल्यवान शिक्षण आहे. आपण हे लक्षात घ्यायला हवं की, याचं जेवणातल्या मिठासारखं आणि इतकंच महत्त्व आहे. म्हणजे काय, तर कला नसेल तर जीवन अळणी राहील आणि कला असेल तर ते चविष्ट होईल. पण, ते जर जास्त झालं तर? ते खाण्यालायक किंवा उपयोगीसुद्धा उरणार नाही. या दोन्ही गोष्टी आपल्याला नीट लक्षात ठेवाव्या लागतील. म्हणजे मग या प्रकारच्या शिक्षणाकरिता सर जे. जे. स्कूलच्या तीन संस्थाना ‘डी-नोवो डीम टू बी युनिव्हर्सिटी’ हा दर्जा राज्य व केंद्र शासनाने का दिला, ते आपल्या ध्यानात येईल. याबाबत समाजमनातल्या प्रश्नांची उत्तर देण्याचा या लेखातून केलेला हा प्रयत्न...
दि. १९ ऑक्टोबर रोजी सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, सर जे. जे. कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आणि सर जे. जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्ट या तीनही एकाच कॅम्पसमध्ये अस्तित्वात असलेल्या संस्थांचे मिळून ‘डी-नोवो डीम टू बी युनिव्हर्सिटी’ असं रुपांतरण करण्यात आले. दि. १९ ऑक्टोबरला तशी घोषणा केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, भारत सरकार तसेच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याद्वारे केली गेली. या तीनही संस्था सर ज. जी. कला महाविद्यालयांमधून उगम पावलेल्या आहेत. सर ज. जी. कला महाविद्यालय म्हणजे आपल्याला माहिती असलेले ‘सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’ हे १८५७ साली स्थापन झाले. १९१३ साली त्यातून ‘वास्तुकला’ हा विभाग वेगळा झाला आणि त्याची एक परिसंस्था तयार झाली. त्यानंतर १९३५ साली ’कमर्शियल आर्ट’ असा एक विभाग होता, तो वेगळा होऊन त्याची एक मोठी संस्था, त्याच आवारात तयार झाली. त्याचं नाव ‘सर जे. जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्ट’ असे आहे. ही झाली पार्श्वभूमी. या सर्वांचं एकत्रित असं अनन्य अभिमत विद्यापीठ स्थापनेचा एक प्रस्ताव महाराष्ट्र शासनाने, केंद्र शासनाला म्हणजे ‘युजीसी’ला केला होता आणि दोन वर्षांच्या प्रक्रियेनंतर त्याला आता केंद्राची मान्यता मिळालेली आहे. त्याचं बदललेलं नाव ‘सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, आर्किटेक्चर अॅण्ड डिझाईन’ असे इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये ‘सर ज. जी. कला, वास्तुकला आणि अभिकल्प अभिमत महाविद्यालय’ आणि कंसात ‘डी-नोवो डीम टू बी युनिव्हर्सिटी’ असे आहे. आता या पार्श्वभूमीवर पुढील गोष्टी आपण लक्षात घेऊया.
वास्तुकलेबद्दल आपल्याला माहिती आहेच. ज्या घरात, वातावरणात आपण राहतो, इथपासून ते आधुनिक आणि त्यानंतर फार वेगळ्या कारणास्तव अनेक प्रकारचे वास्तुकलेचे नमुने, असा मोठा वास्तुकलेचा परीघ आहे. अनेक अभ्यासकांचं म्हणणं असतं की, जे अभिजात कलेमध्ये अपेक्षित नाही, उदाहरणार्थ, वास्तुकलेत त्यांना महानगरपालिकेचे नियम, एकंदर देशातील जमीन-जुमल्याबाबतचे नियम याचाही अभ्यास करावा लागतो. इथे चित्रकला सौंदर्यशास्त्र एवढंसं पुरेसं ठरत नाही, त्याचबरोबर त्यांना पदार्थ विज्ञान, मटेरियल सायन्स, कोणतं मटेरियल बिल्डिंगसाठी वापरतात? का वापरतात? त्याचे उपयोग काय? त्याचा टिकाऊपणा किती? त्यासाठी लागणारे वातावरण कसं? वार्या, पावसाच्या, सूर्यप्रकाशाच्या दिशा कोणत्या? या सर्व गोष्टींचा त्यांना अभ्यास करावा लागतो. त्यामुळे हा बहुविद्याशाखीय अभ्यासक्रम तयार झालेला आहे. त्याला आपण ‘आर्किटेक्चर’ किंवा ’वास्तुकला’ असं म्हणतो.
आता उपयोजित कला म्हणजे काय? उपयोजित कला या विषयाची सुरुवात भारतात, जाहिरात कलेचा आणि प्रसार माध्यमांचा दृक् अंगाने व्यावसायिक अभ्यास म्हणून झाली. पूर्वी ‘टाईम्स ऑफ इंडिया’ इत्यादी जी वर्तमानपत्रे होती, त्यात एकाच अक्षराकार वळणात आणि आकारात सगळ्या बातम्या छापल्या जायच्या. आता आपण कल्पनाही करू शकत नाही, इतके वेगवेगळे प्रकार आपल्याकडे अस्तित्वात आले आहेत. वेगवेगळ्या दृश्य पद्धतीने कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं, बातम्यांचे आकार बदलले, त्याच्यामध्ये चित्रांचा अंतर्भाव झाला. दृश्यमान जाहिरातीची निर्मिती झाली. आज समाजविचार प्रसारणमाध्यमांमध्ये, ज्याला आपण ’कम्युनिकेशन मीडिया’ म्हणतो, या माध्यमात बरेच बदल झाले आहेत. आज रंगीत वर्तमानपत्र छापण्याच्या पलीकडे ते गेले आहेत. टीव्ही, व्हिडिओ, इंटरनेट, डिजिटल सोशल मीडिया इथवर ते क्षेत्र विस्तारीत झाले आहे. तसेच नाटकांचे, चित्रपटांचे सेट्स, प्रदर्शने अशाही गोष्टींचा त्यात अंतर्भाव आहे. कंपन्यांचे ब्रॅण्डिंग, लोगो, सिंबॉल डिझाईन, मासिकामध्ये आणि पुस्तकांच्या मुखपृष्ठासाठी काढली जाणारी चित्रे, रेस्टॉरंटमधले इंटेरियर डिझाईन, हॉटेलची दर्शनी सजावट अशा या सर्व गोष्टी उपयोजित कलेमध्ये म्हणजेच ‘अप्लाईड आर्ट’मध्ये ‘व्हिज्युअल कम्युनिकेशन डिझाईन’ म्हणून येतात. हे सर्व बदललेले जग समजून घेणं गरजेचे आहे.
समाजामध्ये याविषयीचं उपयोगी आणि वेगवेगळ्या प्रकारचे असे हे मौल्यवान शिक्षण आहे, तरी आपण हे लक्षात घ्यायला हवं की, याचं जेवणातल्या मिठासारखं आणि इतकंच महत्त्व आहे. म्हणजे काय, तर कला नसेल तर जीवन अळणी राहील आणि कला असेल तर ते चविष्ट होईल. पण, ते जर जास्त झालं तर? ते खाण्यालायक किंवा उपयोगीसुद्धा उरणार नाही. या दोन्ही गोष्टी आपल्याला नीट लक्षात ठेवाव्या लागतील. म्हणजे मग या प्रकारच्या शिक्षणाकरिता सर जे. जे. स्कूलच्या तीन संस्थाना ‘डी-नोवो डीम टू बी युनिव्हर्सिटी’ हा दर्जा राज्य व केंद्र शासनाने का दिला, ते आपल्या ध्यानात येईल. याबाबत समाजमनातल्या प्रश्नांची उत्तर देण्याचा थोडाफार प्रयत्न आपण येथे करणार आहोत.
आपल्या देशाची लोकसंख्या जगाच्या लोकसंख्येच्या तुलनेत पहिल्या क्रमांकावर आहे. म्हणजे १४० कोटी लोकांचा आपला देश असेल, तर त्यातले एक टक्का लोक कलाकार म्हणून जरी धरले तरी कोट्यवधी होतात. तसं पाहिलं तर ते बहुसंख्य भासतात. मात्र, दुसर्या बाजूने पाहिल्यास ते अत्यंत अल्पसंख्य किंवा मूल्यवान अशा प्रमाणात आहेत.त्यात अनेकविध कालांमध्ये ‘दृक्-कला’(Visual Art)हा अजून एकभाग आहे. तसेच द्रुक कला इतर सादरीकरण कलांच्या (Performing Art) तुलनेत एक ‘अप्रत्यक्ष कला’ प्रकार आहे. म्हणूनच की काय आपल्या भारतीय समाजात यातील कलाकार, कमीच माहीत असतात. त्यांची कला आणि ते कलाकार थोडेसे पडद्यामागचे राहतात. त्या कारणाने हे कला शिक्षण किंवा त्यांचे कलाक्षेत्र मूल्यवान असून दुर्लक्षित राहते, हे आपण लक्षात घ्यायला हवे.
आता ‘सर जे. जे. स्कूल स्कूल ऑफ आर्ट आर्किटेक्चर अॅण्ड डिझाईन’ याचे अनन्य स्वायत्त अभिमत विद्यापीठ स्थापन झालं, याबाबत प्रसारमाध्यमे आणि समाजात अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नांकडे आपण वळूया. गंमत म्हणजे सर्वसामान्यांचं मी समजू शकतो. त्यांचं लिखाण, वाचन, ज्ञान हे सर्वच बाबतीत पुरेसे असेलच असे नाही; मात्र काही प्रसारमाध्यमे, वर्तमानपत्रांनी अनेक गोष्टींवर अभ्यास न करता प्रश्न उपस्थित केले आणि आरोपसुद्धा केले. त्या सर्वांना उत्तर देण्याचा माझा उद्देश नाही. पण, त्यासाठी माहिती देता आली तर त्यांच्या शंकांचे निरसन होईल. याच उद्देशाने पुढे काही गोष्टी नमूद करत आहोत.
जे. जे.ला मिळालेला ‘अभिमत विद्यापीठ’ हा प्रकारचा दर्जा आहे. एकदा का विद्यापीठ म्हटलं की, मोठी काहीतरी अशी प्रतिमा आपल्या जुन्या सवयीने आपल्या मनात उभी राहते. ज्याच्याशी अनेक महाविद्यालय संलग्न असू शकतात किंवा ज्याचा विस्तार मोठा असतो. अशा काही कल्पना, मागच्या बर्याच काळापासून आपल्या मनात दृढ आहेत. ते तसे नसून, या तीनही महाविद्यालयांना एकत्रिकरण करून दिला गेलेला हा एक दर्जा आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवं. सदर दर्जा या महाविद्यालयांना न मागता दिला गेलेला नाही. राज्य शासनाला, त्याची रितसर केंद्रीय विद्यापीठ आयोगाकडे मागणी करावी लागली आणि त्यानंतरच तो अनेक तपासण्या आणि अनेक राज्य शासनाच्या हमीपत्रांच्या आधाराने मिळविला गेला आहे. त्या मागणीची प्रक्रिया फार सहज, सोपी नव्हती. त्यात अनेक प्रश्नांची उत्तरं देणं गरजेचं होतं. अनेक गोष्टी सिद्ध करणं गरजेचं होतं. त्यानंतर या संस्थेची पार्श्वभूमी लक्षात घेउन, त्यांचे ऐतिहासिक महत्त्व आणि आजही या संस्थेचं असलेलं देशातील व आंतरराष्ट्रीय महत्त्व लक्षात घेऊनच, हा विचार प्रस्तावित करण्यात आला. तसंच देशातलं या संस्थांचं अढळ स्थान लक्षात घेता, त्या टिकाव्या, त्या ऐतिहासिक वास्तू म्हणून केवळ राहू नयेत, तर त्या आजही जीवंत संस्था आहेत आणि आजही कला विद्यादानाचं काम करत आहेत, हे लक्षात घेतले गेले. तसेच त्यांचा प्रस्ताव देशाला मार्गदर्शक ठरत आहे. हे सारं लक्षात घेऊन त्या संस्थांना आर्थिक पाठबळ, प्रशासकीय पाठबळ आणि शैक्षणिक पाठबळ म्हणजेच काय, त्यांना आर्थिक तरतूद तसंच प्रशासकीय आणि शैक्षणिक स्वातंत्र्य दिलं गेलं आहे, जेणेकरून या दर्जास्वरुपी स्वायत्तेचा, सदुपयोग करून या संस्था, ही विकासाची संधी साधतील, अशी या निर्णयामागची धारणा आहे. त्यामुळे एका बाजूने पाहता, त्यांची जबाबजदारी शासनाने वाढविली आहे आणि त्यांच्या समोर शासनाने एक आव्हान मोठे उभे केले आहे, हे इथे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
आता स्वातंत्र्य म्हटल्यावर सहज आपल्या मनात येतं की, स्वातंत्र्य म्हणजे ‘हम करे सो कायदा’ असं नाहीये. आपण थोडं फार वाचलं तर लक्षात येईल की, ‘युजीसी’ म्हणजे ’युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशन’ हा जो देशाच्या शिक्षण विभागात येणारा विभाग आहे, त्यांनी देशासाठी काही सर्वसाधारण धोरणात्मक कायदे आणि अटीशर्ती तयार केलेल्या आहेत. याच्या परिघात राहूनच तुम्हाला तुमचा प्रस्ताव सादर करता येतो, अन्यथा, तो प्रस्ताव पारितच होत नाही. या नियमांच्या मर्यादा लांबवून किंवा त्याच्या पलीकडे जाऊन आम्ही ’स्वायत्त’ आहोत, म्हणून ’उन्मत्त’पणे काहीही करता येत नाही, हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवं. स्वायत्तता म्हणजे उन्मत्त होणे नव्हे, स्वातंत्र्य म्हणजेच स्वैराचार नाही, हे लक्षात घ्यायला हवं. शासकीय महाविद्यालयाची ‘डीम युनिव्हर्सिटी’ झाली, म्हणजे ‘खासगीकरण’ झालं, हे वाटणं अत्यंत चुकीचं आहे. असे काही मध्यंतरी वाचनात आलेले मुद्दे आहेत. वर्तमानपत्रातून किंवा लोकांनी केलेल्या टीकाटिप्पणीतून, शिक्षित लोकांच्या माहितीच्या अभावी हे निर्माण झालेले गैरसमज आहेत. ज्ञान आणि अज्ञान जाऊ द्या; पण केवळ माहिती अभावी, मनात आलेले आणि शिवाय छापले गेलेले असे काहीसे हे मुद्दे आहेत, याचं दुःख होतं. सर्व काही नियमांचे चौकटीतच करावं लागतं आणि सर्वांनाच करावं लागणार आहे. सर जे. जे.च्या या तीनही संस्था प्रत्यक्षरित्या शासनाच्या स्वतःच्या आहेत. त्यांचा सर्व प्रकारचा आर्थिक भार राज्य शासन उचलते आणि यापुढेही उचलणार आहे, हे आधी स्पष्ट असायले हवे.
आता फी वाढणार का? असे काही बेचकीतले प्रश्न विचारले जातात. याला काही शेंडाबुडखा नसतो. असा प्रश्न उपस्थित करणार्यांना मला हे स्पष्ट सांगायचंय की, त्यांना आजची जे. जे.तील वास्तवातील फी किती आहे, ते माहीत आहे का? महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांतल्या गावोगावी पसरलेल्या नर्सरी, केजी, स्कूल एज्युकेशन वगैरे मान्यताप्राप्त ज्या काही संस्था आहेत, त्यांची फी किती आहे? किंबहुना, त्यापेक्षा कितीतरी कमी फी शासनाने शासकीय कला महाविद्यालयांत अजून तशीच ठेवली आहे. असा साधा तुलनात्मक अंदाज बांधावा, असे कोणाच्याही मनात येत नाही की, एवढ्या कमी पैशात शासन कलाशिक्षण कसं काय चालवतय? का माहीत नाही; पण हा विचार कोणाच्याच मनात येत नाही. जो आकडा आज आहे, त्यात थोडी वाढ झाली की, फक्त बोंबाबोंब करायची आणि जैसे थे सारे काही ठेवायचे, एवढंच काय ते चाललेलं दिसतं. जगातल्या सोडाच, देशातल्यासुद्धा राहू द्या, अगदी राज्यापेक्षाही, आपल्या शहरात किंवा तालुक्यातला अभ्यास केला तर लक्षात येतं की, कलेचे मूल्यवान शिक्षण आणि त्याची वर्षाची सात हजार रुपये एवढीच फी आहे. कोणाच्यातरी लक्षात येतं का? की एवढ्या फीमध्ये, शिक्षकांना लाख लाख रुपये पगार शासन कसं देऊ शकतं? इतर खासगी महाविद्यालयांच्या फी बघितल्या, तर अडीच लाख ते सहा सात लाखांपर्यंतसुद्धा असतात. अमेरिकेत एका वर्षाची फी ३५ लाख रुपये आहे. आमचे विद्यार्थी जातात ना. ते सांगतात की, त्यांना ३५ लाख रुपयांतून १५ लाख माफ करून २० लाख फी भरण्याची शिष्यवृत्ती मिळते.
बाकी जेवण, खाणं, राहणं वेगळं. हे सारं जगात का चाललं आहे? गरिबांवर अन्याय करणे, हा कोणत्याही शिक्षण संस्थेचा उद्देश असूच शकत नाही. त्यात हे ’मूल्यवान शिक्षण’ पूर्ण करून, आमच्या गरीब परिस्थितीतील ’गुणवान’ विद्यार्थ्यांनी आपापली कुटुंबच काय, तर गावंच्या गावं समृद्ध केलेली आम्ही अनुभवली आहेत. त्यांची त्यावेळी फी भरणारे शिक्षक आम्ही जे. जे. मध्ये पाहिले आहेत. जे. जे. गरीब आणि ’ग्रामीण जनतेचे केवळ’ असे कधीच नव्हते, (पान ५ वरून) नाही आणि नसेल तर ते कायमच गुणवंत कलाकारांचे महाविद्यालय, म्हणूनच ओळखले जाते; पण ज्ञानाने आणि आपमतलबीपणे जे.जे.च्या या नवीन केलेल्या व्याख्या जे. जे.करिता चुकीच्या तर आहेतच; पण भविष्यात धोकादायक पण ठरू शकतात. आपण कुठे आहोत? काय करतो आहोत? खरा स्वाभिमानी गुणवान विद्यार्थी बँकेचे कर्ज घेऊ शकत नाही का? आपल्या आवाक्या बाहेरची घरं आपण खरेदी करतो, आपण वारेमाप लग्नावर खर्च करून, गावजेवणं घालतो, आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी थोडा खर्च करू शकत नाही का? आणि सात हजार रुपये वार्षिक फी म्हणजे, तुमच्या मोबाईलचे बिल आहे, वर्षभराचं. इतकं साधं आपल्याला कळत नाही, हे पटण्यासारखे नाही!
एकंदरीत जनसामान्यांचे वाचन या बाबतीत असावं, अशी अपेक्षा करणं तितकं योग्य नाही. पण, जे सवंग कलाशिक्षक माहिती अभावी वृत्तपत्रांना बिनधास्त मुलाखती देतात, त्यांचं मला आश्चर्य वाटतं. उद्या हीच माध्यमे, ‘कलाशिक्षकांनीच आम्हाला हे असं सगळं सांगितलं’ असं म्हणतील आणि आपला बचाव करतील. चित्रकलेच्या क्षेत्रात तरी एकंदरच वाचनाची खूप वानवा आहे आणि शाब्दिक अभ्यास हा जो भाग आहे, तो कमी पडतो. कदाचित थोडासा आळसही केला जातो. तेही ठीक. पण, आता नीती-नियम सांगण्यासाठी सरकार नीती-नियम पुस्तके, चित्रात्मक काढून पुस्तक प्रकाशित करणार का? तर ते असो. किमान शिक्षणात भाषा शिक्षण सक्तीचे असताना, हे कोणीही मान्य करणार नाही आणि करूही नये.
कलाकार म्हणजे चित्रकार. म्हणजे तो वाचनात कमी असतो, तो गणितात कमी असतो, असे सारे भ्रम आपल्या समाजात का आहेत? शिक्षण नीती-नियम हे साधे व्यवहारिक वाचन आहे. हे साधं अग्रलेख वाचन आहे. आपल्याच वर्तमानपत्रातील साधं व्यावहारिक गणित आहे. साधा तर्क आहे. त्यात फार काही कठीण नाहीये. आमच्या एकंदरीत ’दृश्यकला समाजाला’ याचं वावडं का आहे? याला इंग्रजीत ‘आर्टिस्टिक लायसन्स’ असा एक शब्द आहे. तो आता येथे अत्यंत सवंगपणे वापरावा काय? असेच जर राज्यातील कला शिक्षक आणि कलाकार बोलत राहिले, तर उद्या वर्तमानपत्र त्यांच्या नावावर वाटेल ते लिहून कंडी पिकवून, कोंबडे झुंजवून, काहीही लिहीत बसणार आहेत का? मात्र, असे मी व्यक्तिशः गेली चार वर्षे अनुभवले आहे. म्हणून हे सारे लिहावे लागले.
’कोरोना’ काळ एका प्रकारे अभ्यासाकरिता अचानक मिळालेला शांत काळ होता. त्यात आमचे अनेक शिक्षक किती प्रसिद्धीलोलूप होऊन युट्यूबवर सवंग चर्चा करीत होते, यांच्या उद्वेगाने हे सारे लिहावे लागते आहे. खोटं वाटत असल्यास ते सारे अजूनही महाजालावर पुराव्यासारखे उपलब्ध आहे. असो. त्या पार्श्वभूमीवर जे. जे.च्या तिन्ही महाविद्यालयांतील शिक्षकांनी खूप कष्ट केलेत. ‘डी-नोवो डिम टूबी युनिव्हर्सिटी’साठी सहा ते सात वर्षं अथक परिश्रम केलेत. एक परिश्रमपूर्वक विद्यापीठ तयार केलंय आणि यात शासनाने केलेल्या सहकार्याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे.
माझी यानिमित्ताने अशी सर्वांनाच विनंती आहे की, चित्रकला आता फक्त ‘कॉपी करणे’ किंवा ‘उत्कृष्ट दर्जाची कॉपी करणे’ इथवर मर्यादित राहिलेली नाही. ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ म्हणजे ’कृत्रिम बुद्धिमत्ता’ आली आहे, त्यामुळे संगणकावर ऑर्डरप्रमाणे चित्र काढून मिळतात. जेव्हा फोटोग्राफीचा शोध लागला, तेव्हा युरोपात वास्तववादी चित्राचे महत्त्वच बदललं आणि चित्रामधल्या विचाराला, गोष्टीला महत्त्व प्राप्त झालं. समाजातील एकंदरीत विसंगतीवर चित्रं निघाली, तसंच अनेक वेगवेगळ्या अंगाने चित्रकला बहरत गेली. अगदी साधारण तसाच, आताचा काळ आहे. मोठ्या परिवर्तनाचा काळ आहे. जे. जे.मध्ये केले गेलेले बदल काळाचीच गरज होती. तो बदल आता कुठे चालू झाला आहे. आपल्या कला शिक्षणातील बरेच लोक अभ्यास न करता विचार मांडत आहेत, त्यांना सद्बुद्धी मिळो, त्यांच्या विचारांना भविष्यातील दिशा कळो, चित्रापलीकडचे विचार जे चित्रातूनच प्रसवत असतात, त्याची त्यांना जाणीव होवो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना आहे.
आपल्याला याविषयी काही प्रश्न असतील, तर खाली दिलेल्या ई-मेल आयडीवरती जरूर संपर्क करा, मी यथाशक्ती त्यांना उत्तर द्यायचा प्रयत्न करेन.
डॉ. संतोष क्षीरसागर
(लेखक सर ज. जी. उपयोजित कला महाविद्यालयाचे प्र. अधिष्ठाता आहेत.)
santosh.kshirsagar@gmail.com