महाराजांच्या जीवनपटाचा अभ्यास केला तर असे लक्षात येते की, त्यांनी साधारणतः सात वर्षं लष्करासोबत तर उर्वरित प्रदीर्घकाळ मुलकी प्रशासन व्यवस्थेसोबत काम केले. आपण अभ्यास करताना बर्याच वेळेला फक्त या लष्करी प्रशासनासोबत झालेल्या घडामोडींचा अभ्यास करतो. पण, या घडामोडींमध्ये भक्कमपणे पाठीशी उभी राहणारी रयत, ज्या रयतेसाठी असलेले महाराजांचे मुलकी प्रशासन आणि व्यवस्थापन यांचा आपण म्हणावा तसा व तेवढा सखोल अभ्यास करत नाही. तो आजच्या संदर्भात करणे अतिशय गरजेची गोष्ट आहे, असे मला वाटते.
आपण सर्वांनी शिवजयंती नाचून साजरी करण्यापेक्षा वाचून व समजून साजरी करण्याची आवश्यकता आहे. छत्रपतींची न्यायव्यवस्था, महिलांविषयी असलेली धोरणे, प्रशासकीय धोरणे, लष्करी धोरणे, पर्यावरणविषयक दृष्टिकोन, आर्थिक धोरणे, चिकित्सात्मक दृष्टी, संदेशवहन यंत्रणा आपण समजून घेतली पाहिजे. महाराजांनी आपल्या अष्टप्रधान मंत्रिमंडळात लष्करी व्यवस्थापनासंदर्भात फक्त एकच पद हे सेनापतीचे ठेवले व बाकी सर्व पदे ही प्रशासकीय कामकाजासंदर्भात असल्याचे दिसून येते. सेनापतीचा प्रशासकीय कामकाजात हस्तक्षेप नसे, तर न्यायाधीश यांना कधीही युद्धावर जावे लागत नसे. यावरूनसुद्धा महाराजांनी प्रशासकीय व्यवस्थापनाला किती महत्त्व दिले, हे लक्षात येते.
महाराजांनी सन १६४६ मध्ये आपल्या बाल सवंगड्यांना सोबत घेऊन रायरेश्वराच्या मंदिरात हिंदवी स्वराज्य निर्मितीची जी प्रतिज्ञा घेतली, ती खर्या अर्थाने रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठीच होती. राज्य हे रयतेचे, कुणा लहरी-नादान माणसाचे नव्हे. राज्याची निर्मिती ही जनतेच्या कल्याणासाठी असेल, ही भूमिका महाराजांनी सतत ठेवलेली दिसून येते. या कालखंडात सुलतानाकडून व बादशहाकडून रयतेला जो अन्याय, अत्याचार सहन करावा लागत होता, त्यातून रयतेची मुक्तता करण्यासाठी महाराजांनी हिंदवी स्वराज्य म्हणजे रयतेच्या राज्य निर्मितीची शपथ घेतली होती.
महाराजांच्या काळात रयत सुखी आणि समाधानी होती. जनतेला राज्यव्यवस्थेकडून कोणत्याही प्रकारचा त्रास होत नव्हता. त्यांच्यावर अन्याय, अत्याचार होणार नाही, महिलांना सुरक्षित जीवन जगता येईल, महिलांच्या अब्रूचे रक्षण करणारी व्यवस्था महाराजांनी निर्माण केली होती, शेतकरी राजा सुखी व समाधानी होता. त्यामुळे रयतेच्या मनातही स्वराज्याविषयी अत्यंत जिव्हाळ्याची भावना होती. स्वराज्यासाठी कोणत्याही प्रकारचा त्याग करण्यास रयत मागेपुढे पाहत नव्हती. याउलट आज भ्रष्टाचाराचीच बजबजपुरी माजलेली दिसते. महाराजांच्या स्वराज्यात १८ पगड जातीचे लोक एकत्र गुण्यागोविंदाने नांदत होती. आज मात्र अनेक ठिकाणी जाती-धर्माच्या नावाने आंदोलने, दंगली होताना दिसतात.
१) शेती : महाराजांनी स्वराज्यात शेतीविषयक सुविधांवर भर दिल्याचे दिसून येते. अनेक ठिकाणी नद्या, कालवे अडवून धरणे बांधली. जमिनीचे सपाटीकरण केले. शेतीमधून रोजगारनिर्मिती केली. शेतीसाठी सर्वतोपरी मदत केली. बी-बियाणे, खते, नांगर, बैल-जोडी या गोष्टी गरजेनुसार शेतकर्यांना उपलब्ध करून दिल्या. शेतसारा हा जमिनीच्या प्रमाणावर न घेता येणार्या उत्पादनावर असे. त्यामुळे शेतकरी सुखी होता. पीक न आल्यास किंवा दुष्काळ पडल्यास शेतकर्याला शेतसारा भरण्याची आवश्यकता नसे. महाराजांच्या या शेती धोरणाचा आजही विचार करण्याची आवश्यकता आहे.
२) न्यायव्यवस्था : स्वराज्यात गद्दारीला स्थान नव्हते. अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी खानाला जाऊन मिळालेल्या खंडोजी खोपडेने अफजलखानाच्या मृत्यूनंतर कान्होजी जेधेंच्या मदतीने पुन्हा महाराजांकडे येण्याचा प्रयत्न केला. कान्होजी जेधेंनी त्यासाठी महाराजांकडे शब्दही टाकला आणि खंडोजी खोपडे यांच्या प्राणरक्षणाची हमी महाराजांनी जेधेंना दिली. पण, दिलेल्या शब्दाप्रमाणे महाराजांनी खंडोजी खोपडेचे प्राण नाही घेतले; पण एक हात आणि एक पाय कलम केला. महाराजांनी आपल्या प्रशासकीय व्यवस्थेत भ्रष्टाचार किंवा गैरप्रकार होऊ नये किंवा कामात दिरंगाई होऊ नये, प्रशासन स्वच्छ व रयतेला उत्तरदायी असावे म्हणून आपल्या प्रशासनातील अधिकार्यांची नियमितपणे बदली करण्याचे धोरण निश्चित केले होते. मग त्यात किल्लेदार, सरनोबत, कारखानीस, सबनीस यांसह सर्व प्रशासकीय कर्मचार्यांची ठरावीक कालखंडात बदली होत असे.
३) नोकर भरती : महाराज नियुक्ती करताना मावळ्यांच्या अंगी कोणती कौशल्ये आहेत, त्या गोष्टींचा विचार करून स्वराज्याचे कोणते काम त्याला देणे योग्य ठरेल, ते काम त्याला दिले जात असे. महाराजांकडे काम करणार्या सर्वांनाच काही मूलभूत अधिकारसुद्धा होते. महाराजांचे मावळे कामगिरी स्वीकारताना, ती कशी करायची व यश कसे मिळवायचे, हे स्वतः ठरवत. उदाहरणार्थ, तानाजी मालुसरे यांची कोंढाण्यावरील मोहीम किंवा बाजीप्रभूंनी लढवलेली गाजापूरची खिंड. थोडक्यात, महाराजांनी आपल्या सहकार्यांना अशा काही पद्धतीने प्रेरित केले किंवा त्यांना अशा काही प्रकारची वागणूक दिली की, कोणी कितीही मोठे प्रलोभन दिले तरी त्यांची स्वराज्यावरची निष्ठा कमी होत नसे. महाराज आपल्या सर्व प्रशासकीय कर्मचार्यांची काळजी घेत तशी ते त्यांची परीक्षा ही घेत. याबद्दल एक कथा सांगतात की, एकदा त्यांच्या एका किल्ल्याचा पहारेकरी सावळ्या तांडेल याची परीक्षा घेण्यासाठी वेश बदलून संध्याकाळी गडाचे दरवाजे बंद झाल्यानंतर गडावर जाण्यासाठी येतात. प्रवेशदारावरच सावळ्या तांडेल त्यांना अडवतो. ते सावळ्या तांडेलला विनंती करतात, उशिरा येण्याचे कारण सांगतात, गोड बोलून पाहतात, रागावून पाहतात. पण, सावळ्या तांडेल गडाचे दरवाजे काही केल्या उघडत नाही. शेवटी स्वतःची खरी ओळख देतात तरी तो ऐकत नाही. कारण, त्यांच्या मते ज्या महाराजांनी नियम केले, ते नियम ते स्वतःसाठीही मोडणार नाहीत. महाराजांना रात्रभर गडाच्या बाहेरच थांबावे लागते. सकाळी गडाचे दरवाजे उघडल्यावर महाराज किल्ल्यात प्रवेश करतात व दरबार भरवून सावळ्या तांडेलचे बक्षीस देऊन कौतुक करतात. आज मात्र आपण काय चित्र पाहतो, तर आपले स्वतःचे कामसुद्धा प्रामाणिकपणे न करणारी, आपले काम न करताही रुबाब करणारी, काम करणार्या माणसाने काम करू नये म्हणून सतत टोमणे मारणारी माणसे, स्वतःची चूक झाल्यावरही मान्य न करणारी, आपल्या चुका दुसर्यांच्या माथी मारणारी माणसे आपल्याच आजूबाजूला आपल्याला काही प्रमाणात दिसतात. अशा आजच्या काळातील ’नियम हे मोडण्यासाठीच’ असतात असे मानणार्यांना, ’नियम हे सर्वांसाठी सारखेच’ अशी तंबी देणारे राजे.
४) आर्थिक : महाराजांनी संपत्तीचे योग्य नियोजन केले. त्यामध्ये शिक्षण, संरक्षण, स्वच्छता, प्रशासन, भविष्यातील विस्तार, किल्ले बांधणी या सर्वांसाठी आर्थिक तरतूद केली. किल्ले बांधण्यासाठी आणलेली रेतीसुद्धा महाराज दोन वेळेला गोड्या पाण्याने धुण्यास सांगत, त्यामुळे त्यातील क्षारांचे प्रमाण कमी होऊन बांधकाम उत्कृष्ट होत असे. महाराजांनी किल्ल्यांचे बांधकाम करताना नेहमी भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास केला. त्या काळात सर्वांनीच बांधलेले जवळ-जवळ सर्वच किल्ले हे दळणवळण, जकात व संरक्षण या उद्देशाने बांधले. महाराजांनी स्वराज्याच्या संपत्तीचा काही भाग, हा नेहमी किल्ल्यांच्या संरक्षणासाठी वापरला. कारण, महाराज म्हणत ‘जैसे जहाजास किले (खिळे) तैसे राज्यास किल्ले मजबुती देतात.’ महाराज आपल्या सर्व कर्मचार्यांचे पगार नियमितपणे प्रतिपदेला करत. त्यांच्या मते सैन्य व कर्मचारी हे पोटासाठी काम करतात. हे समजून घेणारे त्या कालखंडात महाराज एकमेव असे राजे होते. महाराज स्वराज्यासाठी उत्तम कामगिरी करणार्या आपल्या सहकार्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देत. पण, त्यांनी कधीही बक्षीस म्हणून वतन किंवा जहागिरी दिली नाही.
५) जलव्यवस्थापन : महाराजांनी पाथरवट लोकांच्या मदतीने जलभेद्य खडकांचे थर आणि पाझरणार्या खडकांचे उतारावर हौद किंवा खोल खड्डे तयार केले, त्यात सतत पाणी झिरपत राहील, याची व्यवस्था केली. त्यामुळे पाणी स्वच्छ व आरोग्यासाठी उपयुक्त असे.
६) पर्यावरण : किल्ल्याच्या बांधकामासाठी किंवा आरमार उभारण्यासाठी महाराजांना लाकूड लागत असायचे, तेव्हा त्यांनी आपल्या सर्व सहकार्यांना झाडे तोडण्यासंदर्भात सूचना केली होती की, ’जर आपणास कोणत्याही कामासाठी एक झाड तोडावयाचे असेल, तर सुकलेले झाड तोडावे; पण आधी त्या प्रकारची दहा झाडे लावावीत.’ गडाच्या परिसरातील पर्यावरण चांगले राहावे म्हणून वड, शिसव, बाभूळ, नारळ, आंबा इत्यादी झाडांची लागवड करण्यास सांगत. प्रत्येक गडावर नैसर्गिक विधीसाठी सोय असल्याचे दिसून येते. त्यासाठी सांडपाण्याची विल्हेवाट, कंपोस्ट खत, सोनखत, शोष खड्ड्यांची व्यवस्था व पाणीसाठा यांची व्यवस्था इतकी अचूक होती की, त्यामुळे गडावर कधीही रोगराई पसरत नसे.
७) चिकित्सात्मक दृष्टी : चिकित्सात्मक अभ्यासातून अनेक नवीन उपयुक्त अशा गोष्टींची रुजवात महाराजांनी केली. जसे मध्ययुगातील काही अज्ञात कारणांनी समुद्र लांघणे अशुभ मानले जात होते. महाराजांनी स्वराज्याची गरज लक्षात घेऊन समुद्रात आरमार उभारले व समुद्रातून स्वराज्याचा विदेशी व्यापार सुरू केला. अशुभ मानल्या जाणार्या अमावस्येच्या रात्री महाराजांनी आपल्या अनेक योजना तडीस नेल्या. दीपावलीतील अमावस्येला आपण यश व समृद्धीचे प्रतीक मानतो. पुण्याच्या भूमीला शापित भूमी मानले जात होते. तेथे नांगर चालवणे अशुभ होते. जिजामातेने स्वतः नांगर चालवून जनतेला आश्वस्त केले. महाशिवरात्रीला ज्याप्रकारे शंकराच्या पिंडीवर आपण दूध वाहतो, त्याप्रकारे प्रत्येकाने स्वराज्याच्या कामासाठी आपले योगदान द्यावे.
८) संदेशवहन : महाराजांनी संदेशवहनासाठी प्रत्येक किल्ल्यावर पांढरा धूर निर्माण करणार्या व काळा धूर निर्माण करणार्या लाकडांची व्यवस्था केली होती. बातमी आनंदाची असेल तर गडावर पांढरा धूर निर्माण करणारी लाकडे पेटवली जायची व बातमी दुःखाची किंवा वाईट असेल तर गडावर काळा धूर निर्माण करणारी लाकडे पेटवली जायची. हे सर्वच गडांवर एकापाठोपाठ एक होत असल्या कारणाने संपूर्ण स्वराज्यात बातमी पोहोचायची. महाराजांचा गावाची उभारणी करताना निश्चित नियोजनाचा दृष्टिकोन दिसून येतो. उदाहरणार्थ, रायगडावर शिस्तबद्ध पद्धतीने बांधलेली ३०० घरे, ४२ दुकाने, काही दुमजली तर काही तीन मजली घरे, मोठी बाजारपेठ, धान्य साठवण्यासाठी उत्कृष्ट कोठार यांचा समावेश दिसून येतो. आपण महाराजांच्या विचारांना विसरलो म्हणूनच पारतंत्र्यात गेलो, हे आजतागायत अनेक इतिहासकारांनी दाखवून दिले आहे. आज माणसाला रोजच्या व्यवहारात काय करावे व काय करू नये इतके कळले तरी शिवचरित्र समजल्याचे सार्थक होईल.
प्रा. प्रशांत शिरुडे
prashantshirude१६७४@gmail.com
९९६७८१७८७६