टाटाच्या आयपीओने गुंतवणूकदारांना केले मालामाल; एका तासात दामदुप्पट परतावा

30 Nov 2023 12:45:25
 tata
 
मुंबई : घोषणेपासूनच चर्चेत असलेला टाटा टेक्नॉलॉजीजच्या आयपीओची आज शेयर बाजारामध्ये विक्रमी लिस्टिंग झाली. टाटा टेक्नॉलॉजीजच्या आयपीओची लिस्टिंग होताच, एका तासातच शेयरने गुंतवणूकदारांना दुपटीहून अधिक कमाई करुन दिली. टाटा टेक्नॉलॉजीजच्या शेयरने एनएसई आणि बीएसईमध्ये पहिल्या तासातच १४० टक्क्यांचा परतावा गुंतवणूकदारांना दिला.
 
टाटा टेक्नॉलॉजीजचा आयपीओ ४७५ ते ५०० रुपये या किमतीत आला होता. पण टाटा समूहाचा हा शेयर १४० टक्के प्रीमियमसह १२०० रुपयांवर सूचीबद्ध झाला. टाटा टेक्नॉलॉजीजच्या रुपाने तब्बल २० वर्षानंतर टाटा समूहाची कंपनी शेयर बाजारात लिस्ट झाली आहे. यापुर्वी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचा आयपीओ आला होता.
 
टाटा टेक्नॉलॉजीजच्या आयपीओला गुंतवणूकदारांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. तिसऱ्या दिवशी आयपीओ ७० वेळा सबस्क्राइब झाला होता. म्हणजेच एका शेयरसाठी ७० अर्ज आले होते. या आयपीओच्या खरेदीसाठी विक्रमी ७३.६ लाख अर्ज आले होते. शेवटचे वृत्त हाती आले त्यावेळी सुद्धा टाटा टेक्नॉलॉजीजच्या आयपीओची विक्रमी घोडदौड सुरुच आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0