नवी दिल्ली : नीती आयोगाने २०४७ पर्यंत भारताला ३० ट्रिलियन डॉलरची विकसित अर्थव्यवस्था बनवण्यासाठी व्हिजन डॉक्युमेंट तयार करत आहे, अशी माहिती नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) बीव्हीआर सुब्रमण्यम यांनी बुधवारी दि. २९ नोव्हेंबर रोजी दिली. ते फिक्कीच्या कार्यक्रमात बोलत होते.
'व्हिजन इंडिया@२०४७' दस्तऐवजाचा मसुदा २०४७ पर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनण्यासाठी आवश्यक असलेल्या संस्थात्मक आणि संरचनात्मक बदल आणि सुधारणांची रूपरेषा दर्शवेल. असा विश्वास सुब्रमण्यम यांनी व्यक्त केला. फिक्कीच्या कार्यक्रमात बोलताना, सुब्रमण्यम म्हणाले की, "भारताला विकसित अर्थव्यवस्था बनवण्यासाठी एक व्हिजन प्लॅन तयार केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते जानेवारीत व्हिजन डॉक्युमेंट जारी करण्यात येईल."
'व्हिजन इंडिया@२०४७' डॉक्युमेंटमध्ये शिक्षण क्षेत्राच्या विकासावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. भारतात शिक्षण क्षेत्रात पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी खाजगी क्षेत्राची सुद्धा मदत घेण्यात येणार असल्याची माहिती बीव्हीआर सुब्रमण्यम यांनी दिली. ते म्हणाले की, " सरकारला महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणांचे प्रवेशाचे प्रमाण वाढवायचे आहे. पुढील काळात कॉलेजला जाणाऱ्यांची संख्या चार कोटींवरून आठ-नऊ कोटींवर जाईल. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नवीन विद्यापीठांची गरज भासेल."
पुढे बोलताना ते म्हणाले की, "देशातील राज्यांची आर्थिकस्थिती सध्या चांगली नाहीये. त्यामुळे नवीन विद्यापीठे उघडण्यासाठी खाजगी क्षेत्राचे सहकार्य घेतले जाईल."