दामोदर हॉल पुनर्बांधणीबाबत साशंकता!

30 Nov 2023 18:24:56
Damodar Hall News

मुंबई : गिरणगावातील मराठी कामगार कलाकारांचे हक्काचे व्यासपीठ म्हणून ओळख असणाऱ्या परळ येथील दामोदर हॉल त्याचबरोबर येथील सहकारी मनोरंजन मंडळ कार्यालय पुनर्बांधणीसाठी दि. १ नोव्हेंबरपासून बंद करण्यात आले असून सद्यस्थितीत ते जमीनदोस्त करण्याचे काम सुरू आहे. सोशल सर्व्हिस लीगच्या मालकीच्या या जागेवर मालक नव्याने संबंधित वास्तू बांधणार आहे. परंतु, सहकारी मनोरंजन मंडळ तसेच ज्येष्ठ कलावंत मंडळींनी याला विरोध दर्शवत शुक्रवार, गुरुवार, दि. ३० नोव्हेंबर रोजी आंदोलनाचे हत्यार उपसले. यावेळी केलेल्या आंदोलनात अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा अभिनेते विजय पाटकर, ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक-अभिनेते हेमंत भालेकर, ज्येष्ठ शाहीर मधु खामकर, प्रायोगिक रंगमंच अध्यक्ष दिलीप दळवी आदी लोक्कलाकर, रंगकर्मी आणि सहकारी मनोरंजन मंडळाशी संबंधित कलावंत यावेळी उपस्थित होते.

सोशल सर्व्हिस लीगच्या पुनर्विकासासाठी असणाऱ्या प्रकल्पात दामोदर हॉल तसेच सहकारी मनोरंजन मंडळ कार्यालयाला देण्यात येणाऱ्या जागेबाबत साशंकता व्यक्त करण्यात आली आहे. पुनर्विकासात दामोदर हॉलच्या जागेवर सीबीएसई शाळा प्रस्तावित असून कोणत्याही प्रकारचे लेखी आश्वासन देण्यात आलेले नाही, असा आरोप यावेळी करण्यात आला.दरम्यान, दामोदर बचाव आंदोलनाला मीडिया असोसिएशन ऑफ इंडियानेही यावेळी जाहीर पाठिंबा दर्शवला.१०१ वर्षाची परंपरा असणाऱ्या या दामोदर हॉलला तसेच सहकारी मनोरंजन मंडळ कार्यालयात, जिथे तालमी करण्यात येत होत्या, ती जागा कुठे देणार? किती जागा असणार? याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती तथा पत्रव्यवहार या पुनर्विकासात नसल्याचे सहकारी मनोरंजन मंडळाचे म्हणणे आहे. आमचा पुनर्विकासाला विरोध नाही पण आमच्या हक्काची जागा आम्हाला दिली गेली पाहिजे. दामोदर नाट्यगृह पाडून त्याजागी बांधण्यात येणाऱ्या इमारतीत नाट्यगृह दिसणार नाही तोपर्यंत शासन परवानगी देणार नाही, असे शासनाने त्यांच्या निर्णयात स्पष्ट केले आहे. त्यामुळे या योजनेवर शासनाने लक्ष ठेवले पाहिजे, अशी मागणी दिलीप दळवी यांनी केली.

कलावंतांना रस्त्यावर उभे राहून हक्कासाठी आंदोलन करणे ही लाजिरवाणी बाब आहे. सरकार आमचेच आहे. कलावंतांना नक्कीच सरकारच्या माध्यमातून न्याय मिळेल. आम्हाला फक्त अमाची हक्काची जागा उपलब्ध करून देण्यात यावी एवढीच आमची मागणी आहे. दामोदर हॉल आणि सहकारी मनोरंजन मंडळासाठी जागेचे संपूर्ण नियोजन आम्हाला सांगून याच जागी आम्हाला सदर हॉल आणि कार्यालयासाठी जागा देण्याचे आश्वस्त करण्यात यावे.- विजय पाटकर, ज्येष्ठ अभिनेते



 
Powered By Sangraha 9.0