मध्य आशियातून हिमालयीन गिधाडांच्या स्थलांतराला सुरुवात; लवकरच महाराष्ट्रात

03 Nov 2023 17:57:02
vulture

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मध्य आशियामधून 'हिमालयीन ग्रिफाॅन' ( himalayan griffon ) प्रजातीच्या गिधाडांच्या स्थलांतराला सुरुवात झाली आहे. 'भारतीय वन्यजीव संस्थान'ने (डब्लूआयआय) याविषयाची माहिती दिली असून त्यांनी जीपीएस टॅग केलेले एक गिधाड उत्तर भारतात पोहोचले आहे. त्यामुळे लवकरच ही गिधाड मध्य भारत आणि महाराष्ट्रात दाखल होतील असा अंदाज आहे. ( himalayan griffon )

 
फेब्रुवारी २०२२ मध्ये 'भारतीय वन्यजीव संस्थान'ने (Wildlife Insititute of India – WII) मध्यप्रदेशातील 'पन्ना टायगर रिझर्व्ह'मध्ये २५ 'हिमालयीन ग्रिफॉन' ( himalayan griffon ) गिधाडांना रिंग आणि जीपीएस टॅग केले होते. या प्रजातीच्या गिधाडांच्या स्थलांतराचा अभ्यास करण्यासाठी त्यांना टॅग करण्यात आले होते. 'हिमालयन ग्रिफॉन' दरवर्षी हिवाळ्यात भारतात स्थलांतर करतात. मध्य प्रदेशातील 'पन्ना टायगर रिझर्व्ह'मध्ये रिंग केलेल्या गिधाडांपैकी एका गिधाडाने हिवाळी स्थलांतराला सुरुवात केली आहे. सध्या तो उत्तराखंड राज्यापर्यंत पोहोचल्याची माहिती 'डब्लूआयआय'चे शास्त्रज्ञ डाॅ. रमेश कृष्णमूर्ती यांनी 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली. मध्य आशियातील सर्वांत लांब पर्वतरांग असणाऱ्या चीनमधील टिन शान पर्वतीय प्रदेशामधून या गिधाडाने प्रवास सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. उत्तराखंडपर्यंतच पोहोचलेले हे गिधाड लवकरच मध्य भारतात पोहोचेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 



'हिमालयीन ग्रिफाॅन' गिधाडाच्या महाराष्ट्रातील स्थलांतराच्या अनुषंगाने विचार करायचा झाल्यास दरवर्षी ही गिधाडे राज्यात हिवाळी हंगामात दिसतात. राज्यात पांढऱ्या पुठ्याच्या, लांब चोचीच्या आणि पांढऱ्या गिधाडांचा कायमस्वरुपी अधिवास आहे. मात्र, 'हिमालयीन ग्रिफाॅन' हे गिधाड डिसेंबर आणि जानेवारी महिन्यामध्ये राज्यात दिसून येते. खास करुन कोकणात ही गिधाडे मोठ्या संख्येने दिसून येतात. माणगाव, म्हसाळा आणि श्रीवर्धन भागातून 'हिमालयीन ग्रिफाॅन' गिधाडांच्या नोंदी आहेत. याठिकाणी गेल्या काही वर्षांमध्ये दहा ते बारा 'हिमालयीन ग्रिफाॅन' गिधाडांची नोंद डिसेंबर-जानेवारी महिन्यादरम्यान करण्यात आली आहे. त्यामुळे यंदाही लवकरच ही गिधाडे कोकणात दाखल होतील अशी आशा आहे. 


हिमालयीन ग्रिफाॅन गिधाडाविषयी...
* मध्य आशियामधील पामीर पर्वतरांग, काझाखस्तान, तिबेटी पठार आणि हिमालय पर्वतरांगांमध्ये या प्रजातीच्या गिधाडांचे वास्तव्य.
* भारतात आढळणाऱ्या गिधाडांमध्ये सर्वात मोठा गिधाड
* वजन साधारणतः ८ ते १२ किलो पर्यंत असून त्यांच्या पंखांचा व्यास ९ ते १० फूट इतका असतो.
 
Powered By Sangraha 9.0