भरती थांबविण्याच्या जरांगेंच्या मागणीवर विनोद पाटील म्हणतात, "दोन महिन्यांत..."
03 Nov 2023 16:23:38
मुंबई : मराठा समाजासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी सरकारला २ जानेवारीपर्यंतची मुदत देत आपलं उपोषण मागे घेतलं आहे. यावेळी त्यांनी सरकारला अनेक मागण्या केल्या आहेत. याबाबत मराठा समाज नेते विनोद पाटील माध्यमांशी संवाद साधला.
मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागेपर्यंत नोकरभरती करु नका, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. याबाबत विनोद पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, यापुर्वी राज्य सरकारच्या भरतीबाबतच्या आलेल्या जाहीराती या प्रत्येक जाहिरातीमध्ये वेगवेगळ्या एजंसींना काम दिल्यामुळे कुठे पेपर फुटले, कुठे निकाल फुटला तर कुठे परीक्षेची अडचण आली. ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेता राज्य सरकारने अनेक परीक्षा स्थगित केल्या आहेत.
मग तुम्ही २ तारखेपर्यंत वेळ मागून घेतलाय तर दोन महिने काय फरक पडणार आहे? असा सवाल त्यांनी केला आहे. ते पुढे म्हणाले की, यात छोटासा तांत्रिक मुद्दा येऊ शकतो. दोन महिन्यानंतर काही विद्यार्थ्यांची वयाची मर्यादा उलटू शकते.
परंतू, याबाबत जाहिरातीत उल्लेख करता येऊ शकतो की, मागच्या सहा महिन्यांपुर्वी ज्यांची वयोमर्यादा संपत असेल ते यासाठी पात्र असू शकतात. यामुळे कुठलेही नुकसान होणार नाही. विनाकारण गैरसमज करुन घेऊ नका. त्यामुळे नोकरभरती थांबवण्याची ही मागणी रास्त आहे, असेही विनोद पाटील म्हणाले आहेत.