‘मामी फिल्म फेस्टिवल’मध्ये रंगली दिग्दर्शकांची मैफिल

03 Nov 2023 21:43:33
Marathi Directors MAMI Film Festival

जगभरात तसे अनेक चित्रपट महोत्सव प्रसिद्ध आहेत. त्यात आपली अनोखी छाप उमटविणारा ख्यातनाम चित्रपट महोत्सव म्हणजे ‘मामी फिल्म फेस्टिवल’ (Mumbai Academy of Moving Image (MAMI).जगभरातील चित्रपटांच्या यादीत मराठी चित्रपटदेखील ‘मामी’मध्ये विशेष आकर्षणाचे केंद्र ठरतात. त्याचीच प्रचिती यंदाच्या ‘मामी फिल्म फेस्टिवल’मध्ये देखील दिसून आली. ‘मामी’मध्ये १२ मराठी चित्रपट, लघुपट दाखवण्यात आले. जगभरातून आलेल्या प्रेक्षकांनी, सिनेसमीक्षकांनी या चित्रपटांना अगदी भरभरून प्रतिसाद आणि शुभेच्छाही दिल्या. ‘मामी फिल्म फेस्टिवल’ अंतर्गत ‘मराठी टॉकीज’च्या विशेष चर्चासत्रात मराठी चित्रपटसृष्टीतील सहा दिग्दर्शकांनी एकूणच मराठी चित्रपटसृष्टीची आर्थिक, सामाजिक अवस्था, तसेच प्रेक्षकांच्या दृष्टिकोनातूनही काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. त्यांचाच या लेखात घेतलेला संक्षिप्त आढावा....

मराठी चित्रपटांचा आशय ही जमेची बाजू

मराठी चित्रपटसृष्टीचा इतिहासही तितकाच समृद्ध आणि संपन्न. दिग्गज दिग्दर्शक, लेखक, कलाकार यांचा वारसा मराठी चित्रपटसृष्टीलाही लाभला. उत्कृष्ट कथा, संहिता, आशय-विषय आपल्याकडे असूनही दुर्दैवाने गेली अनेक वर्षं मराठी चित्रपटाची आर्थिक बाजू मात्र कमकुवत राहिली, अशी तक्रारवजा खंत आजही व्यक्त केली जाते. त्यामुळेच हिंदी, दाक्षिणात्य अथवा इतर मनोरंजनसृष्टीतील चित्रपट हे मराठीपेक्षा बॉक्स ऑफिसवर अधिक कमाई करताना दिसतात. याविषयी भाष्य करताना अभिनेता-दिग्दर्शक रितेश देशमुख म्हणतो की, “इतर कोणत्याही चित्रपटसृष्टीशी मराठी चित्रपटांची तुलना केल्यास केवळ आर्थिक फरकच प्रामुख्याने जाणवतो. याचं प्रमुख कारण म्हणजे, मराठीत वेळेला अधिक महत्त्व दिले जाते. परंतु, मराठी चित्रपटांचे बजेट जरी कमी असले तरीही आशय, विषय या दोन गोष्टींमुळे कायमच मराठी चित्रपटांचं पारडं जड असतं, असं मला वाटतं.”

प्रेक्षकांना गृहीत धरून चालणार नाही!

मराठी चित्रपटसृष्टीच्या आर्थिक आव्हानानंतर दुसरा सर्वाधिक चर्चिला जाणारा मुद्दा म्हणजे, मराठी चित्रपट सिनेमागृहात जाऊन पाहण्यासाठी मराठी प्रेक्षकांचा काहीसा उदासीनपणा. ही बाब लक्षात घेता, मराठी प्रेक्षकांसंबंधी एक महत्त्वाचे निरीक्षण रितेश देशमुखने या चर्चेदरम्यान नोंदवले. तो म्हणतो की, “ज्यावेळी प्रेक्षकांना चित्रपटगृहात जाऊन एखाद्या चित्रपटाचा आस्वाद घ्यायचा असेल, तर तिथे पहिली पसंती ही हिंदी चित्रपटांना दिली जाते. पण, घरी ज्यावेळी तोच प्रेक्षक टीव्हीवर काही पाहात असतो; त्यावेळी मात्र प्राधान्य हे मराठी वाहिन्या आणि मराठी चित्रपटांना दिले जाते.” ‘वेड’ या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने रितेश देशमुखने मराठी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. त्यावेळी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी केलेल्या अभ्यासात ज्या महत्त्वाच्या बाबी निदर्शनास आल्या, त्यापैकी काही बाबी रितेशने यावेळी अगदी मोजक्या शब्दांत मांडल्या. रितेश म्हणतो, “मराठी प्रेक्षकांमध्ये मराठी कलाकृती पाहण्याची क्षमता आणि आवड नक्की आहे. मात्र, दिग्दर्शक आणि एक कलाकार म्हणून आपल्याला प्रेक्षकांना केवळ विश्वासात घेऊन हे पटवून द्यायचं आहे की, मराठी चित्रपट हा चित्रपटगृहातच जाऊन पाहा. पण, असे असले तरी प्रेक्षकांसाठी चित्रपट बनवताना त्याच प्रेक्षकांना मात्र गृहीत धरून चालणार नाही,” असे महत्त्वाचे निरीक्षण नोंदवत, रितेशने चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांनाही यानिमित्ताने प्रेक्षकांचे महत्त्व अधोरेखित करुन सांगितले.

मराठीसाठी ‘ओटीटी’ नाहीच!

कोरोना काळानंतर ‘ओटीटी’ वाहिनीकडे सर्व वयोगटातील प्रेक्षकांचा कल वाढलेला दिसून येतो. कारण, अगदी घरबसल्या जगभरातील आशय-विषय विविध भाषांमध्ये प्रेक्षकांना पाहणे सहजशक्य झाले आहे. मात्र, ‘ओटीटी’च्या या विश्वात मराठी चित्रपटांना कोणतेही स्थान नाही, अशी खंत राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक सुजय डहाके यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. सुजय म्हणाले की, “आजच्या स्थितीला कोणतेही ‘ओटीटी’ माध्यम मराठी चित्रपट विकत घेत नाहीत. त्यामागे त्यांची व्यावसायिक कारणे नक्कीच असतील. परंतु, तरीही जे मराठी चित्रपट कोणत्याही ‘ओटीटी’ वाहिनीवर दिसतात, ते ’पे पर व्ह्यू’चेच आहेत. याशिवाय मराठी चित्रपट सॅटेलाईटवर दाखवायचे अथवा नाही, हेदेखील प्रदर्शनानंतर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली, यावर ठरते. त्यामुळेच ‘ओटीटी’ आणि सॅटेलाईटवर मराठी चित्रपटांची अवस्था तशी फारच बिकट असल्यामुळे मराठी चित्रपटांना केवळ चित्रपटगृहेच तारू शकतात,” अशा भावना सुजय डहाके यांनी व्यक्त केल्या.”

प्रसिद्धी करताना प्रेक्षकवर्ग निवडावा

कोणत्याही भाषेतील चित्रपट जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत कसा पोहोचतो? तर त्या चित्रपटाची जितकी अधिक प्रसिद्धी होईल तितका तो लोकांपर्यंत पोहोचतो आणि त्या चित्रपटाला प्रतिसाद मिळतो. परंतु, चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काही योजना आखाव्या लागतात. याबद्दल अधिक माहिती देताना रितेश म्हणतो की, “आम्ही दोन वेगवेगळ्या प्रमोशनच्या योजना आखल्या होत्या. त्यात आम्ही प्रामुख्याने चित्रपटाचे दोन वेगळे ट्रेलर तयार केले होते. एक ट्रेलर तरुण वर्गाला आकर्षित करण्यासाठी समाजमाध्यमांवर प्रदर्शित केला, तर दुसरा ट्रेलर आम्ही श्रावणी या नायिकेच्या दृष्टिकोनातून तयार करत घरातील महिलावर्गासाठी टीव्हीवर प्रदर्शित केला.” परिणामाअंती चित्रपट पाहण्यासाठी तरुणवर्ग आणि घरातील महिला या दोन्ही वर्गातील प्रेक्षकांनी तुफान गर्दी केली.” याच पठडीतील सकारात्मक चित्र केदार शिंदे दिग्दर्शित ’बाईपण भारी देवा’ चित्रपटाच्या बाबतीतही दिसून आले होते. हा चित्रपट पाहण्यासाठी ९५ टक्के प्रेक्षक या महिला होत्या. याबद्दल केदार शिंदे म्हणाले की, “महाराष्ट्रात मराठी चित्रपटांची स्पर्धा एकाच वेळी बॉलीवूड, दाक्षिणात्य, हॉलीवूड चित्रपट अशा सर्वांसोबत असते. पण, मला प्रेक्षकांवर विश्वास आहे. त्यांना जे आवडेल आणि मनाला भिडेल, त्याकडे ते नक्कीच आकर्षित होतात. त्यामुळे चित्रपटांची प्रसिद्धी करत असताना आधी आपला प्रेक्षकवर्ग कोण आहे, कोणत्या वयोगटातील आहे, याचा विचार करून त्यानुसार कल्पना राबवायला पाहिजे,” असा मोलाचा सल्ला सर्व दिग्दर्शकांनी नवोदित आणि जुन्या जाणत्या दिग्दर्शक आणि कलाकारांना दिला. तसेच, यावर्षीदेखील ‘मामी फिल्म फेस्टिवल’मध्ये मराठी दिग्दर्शकांच्या मेहनतीचे फळ नक्कीच दिसून आले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

रसिका शिंदे-पॉल
Powered By Sangraha 9.0