झिम्मा : वेध कलामनाचा...

03 Nov 2023 21:23:13
Book Rweview of Jhimmā

विजया मेहता यांच्या ‘झिम्मा : आठवणींचा गोफ’ या आत्मचरित्राच्या प्रकाशनाला ११ वर्षे, तर विजयाबाईंना वयाची ८९ वर्षेदेखील आजच्या दिवशी पूर्ण होत आहेत. बाईंची नाट्यक्षेत्रातील कारकिर्दच जवळपास ५० वर्षांची. भारताने नुकतेच स्वातंत्र्य मिळवले होते. त्या काळात कलाक्षेत्रात अनेक चळवळी झाल्या. मराठी रंगभूमी सातासमुद्रापार पोहोचली. भारत, जर्मनी या दोन देशांत सांस्कृतिक देवाणघेवाण झाली. मराठी रंगभूमीने अनेक नवे प्रयोग केले. कलाक्षेत्र बहराला आले. असे अनेक प्रवाह बाईंनी आपल्या कारकिर्दीत पाहिले आणि सुरू केले. तसेच तटस्थपणे आपल्या स्वतंत्र शैलीत मांडले. यात केवळ कला संस्कृतीचं दर्शन नसून, ते प्रवाह जगलेल्या एका व्यक्तिमत्त्वाचा आत्मशोध आहे. ही केवळ ऐकून सोडून देण्याजोगी कथा नाही, तर कलेच्या क्रांतीचं मूलभूत तत्त्व आहे. म्हणूनच या पुस्तकाविषयी आणि त्यानिमित्ताने विजयाबाईंविषयी...
 
स्वतःचं आयुष्य असं तुकड्या तुकड्यात कोण मांडतं? बेबी, विजू जयवंत, विजया खोटे आणि विजया मेहता... स्वतःच्या आयुष्याकडे असं त्रयस्थपणे पाहणारं, हे पहिलंच चरित्र. घार जशी उंच आकाशात भरारी घेते आणि आपल्या विश्वाकडे उंचावरून पाहते, एक-एक लहानशी गोष्टही अगदी डोळसपणे टिपते, ही सर्वसमावेशक आणि वेधक नजर दिग्दर्शकाचीच! बाईंनी आपल्या ५० वर्षांच्या कारकिर्दीत अनेक नाटके दिग्दर्शित केली. त्यात नावीन्य होतं, कुतूहल होतं. पण, ही तर निर्मिती. या निर्मितीमागे एक प्रक्रिया असते. त्या प्रक्रियेला कारणीभूत अनेक घटना असतात. ‘झिम्मा’ हे ४४० पानी पुस्तक म्हणजे त्या काळातील रंगविश्वातील सर्वच विविध प्रवाह, नाट्यचळवळी, रंगभूमीवर झालेले नावीन्यपूर्ण प्रयोग, मराठीच्या माध्यमातून जगाशी जोडली गेलेली भारतीय संस्कृती अशा बर्‍याच कलाविष्कारांचा अद्भुत संगमच जणू!

जसा या पुस्तकाचा वाढदिवस दि. ४ नोव्हेंबर तसाच बेबींचा जन्मही दि. ४ नोव्हेंबर १९३४चा. म्हणजे भारताने स्वातंत्र्य मिळवण्यापूर्वीचा तो काळ. असा काळ जेव्हा भारताच्या दरडोई उत्पन्नात मोठी तफावत होती. बहुतांश लोक पोट भरण्यासाठी नोकर्‍या शोधत होते, तेव्हाचे हे दिवस. अर्थनियोजनातच दिवसाचा बहुतांश वेळ खर्ची होत होता. मनोरंजन म्हणजे ‘फॅड’ होतं. भारतीय समाजाला कलेचं वावडं कधीही नव्हतंच म्हणा. भजन, कीर्तन, गोंधळ, पथनाट्ये गावागावात रंगायचीच. पण, व्यावसायिक रंगभूमी गावंच्या गावं सांधू लागली, इतकी की पुढे देशाच्या सीमा पार तोडून जर्मनीत जाऊन ती विस्तारली. जर्मन विद्यार्थ्यांनी ‘शाकुंतल’ केलं. ’हयवदन’चेही प्रयोग झाले. जर्मन चेहर्‍याच्या मुलांना महाभारत समजलं, ते या स्वातंत्र्योत्तर ५० वर्षांच्या काळातच, ही केवढी मोठी झेप!

विजू संवेदनशील होती. बाह्य वातावरणाचा मोठा परिणाम कलाकारावर होत असतो. त्या-त्या काळात होणारे विचारमूल्यांचे अभिसरण कलाकाराच्या आविष्कारातून स्पष्ट होत असते. ही झाली बेबीची ओळख. बेबीच्या टीपकागदात आता बरेच अनुभव होते. त्याचे रुपांतर विचारात होत होतं आणि नेमकं इथेच तिची अभिनय विश्वाशी तोंडओळख झाली! शिनॉय या तिच्या वर्गमित्राच्या माध्यमातून तिची तिच्या एका गुरूशी गाठ पडली. ते म्हणजे इब्राहिम अल्काझी.

अल्काझींचा शिष्य विजूची तालीम घ्यायचा. विजूला आस्वादक बनवण्याचं काम होतं ते! चित्र पाहून त्यातून संगीत ऐकू येतंय का? सिंफनीच्या रेकॉर्डमधून बासरी वेगळी ऐकू येते का? असे त्याचे प्रश्न असायचे. आपल्या कलेची समीक्षा आपण करू शकतोच. मात्र, जेव्हा आपल्याला कला कळू लागते तेव्हाच! या कळण्याच्या प्रक्रियेत आपला गुरू महत्त्वाची भूमिका बजावत असतो. व्यक्तींसमवेत अनेक संस्था आणि वास्तू यांचा प्रभाव बाईंच्या जीवनावर दिसून येतो. वास्तू आपल्याला मार्गदर्शन करतात. त्यांची सुरुवात झाली, ती ‘गिरगाव मराठी साहित्य संघा’पासून. एक व्यक्ती पाठीशी असणे आणि एक संस्थेचा खंबीर हात पाठीवर असणे, यात केवढा फरक असतो.
 
‘साहित्य संघा’नंतर ’आयएडीए’मध्ये अदि मर्झबान आणि दुर्गाबाई असे दोन गुरू. विजूची ‘विजया’ येथे होते. आपलं स्वतंत्र अस्तित्व, आत्मभान जेव्हा माणसाला येतं, तेव्हा तो अगदी पेटून उठतो. काठावर थांबून पाण्याकडे पाहत नाही, तर उड्या घेऊन गटांगळ्या खातो. सृजनाचे आविष्कार दिसू लागले असतात. रंगभूमीचंही भान यावं लागतं. नाटक करताना दृक् आणि श्राव्य घटकांसोबतच अभिनयाकडे लक्ष वेधणं महत्त्वाचं. ‘सेल्फ इमेज’ म्हणजे घातलेल्या कपड्यांतून आपण नक्की कसे दिसतोय, कपडेपटातून आणून घातलेल्या ओढणीचे काही म्हणणे असते. पदराला एक लाज असते, घागर्‍याला समज असते. त्याची बूज राखायलाच हवी, पोहोचायला हवी तीही. सांगू दे ना ओढणीला तिची व्याकुळता, कानातल्याला मिरवू दे, सौंदर्याचा माज...विजयाबाई म्हणजे भारतीय रंगभूमीला मिळालेला उत्तम शिष्य. तिचा वारसा केवळ पुढे घेऊन जाणारा नाही, तर चहू अंगाने तिला बहर आणणारा, फुलवणारा तिचा सच्चा चाहता! मराठी रंगभूमीचा उमेदीचा काळ आणि बाईंची कारकिर्द एकमेकांना पूरक. म्हणूनच त्यांचे आत्मचरित्र म्हणजे मराठी रंगभूमीचा इतिहास असंच म्हंटलं जातं.
 
पुस्तक वाचन हा एक अनुभव असेल, तर मुखपृष्ठ आणि पुस्तकाचं नाव त्या अनुभवावर मोठा प्रभाव पाडून असतं. ‘झिम्मा’ हा नृत्यप्रकार आहे. ताल आणि लयित पावलं पडण्याशिवाय त्याला इतर नियम नाहीत. फेर धरताना प्रत्येक पावलांगणिक वेगवेगळे भाव नर्तकीच्या चेहर्‍यावर आणि देहबोलीत दिसून येतात. मुखपृष्ठावरचे २० फोटो पाहून विजयाबाईंच्या व्यक्तिमत्त्वाची कल्पना करता येतेच. कलाकाराचा जीवनप्रवास नदीसारखा असतो. नागमोडी वळणं आणि उंच-सखलता त्याच्या पाचवीलाच पूजलेली. हा ओढा जसा प्रत्येक वळणावर जलसंपदेने समृद्ध होत जातो, तशीच त्याच्या आजूबाजूला एक विशिष्ट परिसंस्था तयार होत जाते. एक देवाणघेवाण असते, नामविरहित. तसं कलाकारांचं आयुष्य. फरक इतकाच की, त्याच्या कलाविष्कारांना नावं असतात. बाईंचं पहिलं-ते ‘झुंजारराव.’

आज अगदी सहज वाटणारे मायक्रोफोन्स आणि स्पॉटलाईट्स तेव्हा नव्हते. प्रकाशयोजना आणि एकंदर रंगमंचावरची ही क्रांतीच. मग हे नसताना कसं होत असेल सगळं? आपला लाईट आपण घ्यावा लागत असेल. हो हे ‘स्किल’च एकप्रकारचे! आपला प्रकाश, आपल्यासाठी असलेला प्रकाशझोत आपल्याला ओळखता यायला हवा. तेव्हा आपण कुणाच्या किंवा कुणी आपल्या आड येता कामा नये. आपली देहबोली, चेहर्‍यावरील भाव, व्यक्त होण्यातील ताणतणाव आणि त्याला सुसंगत अशी आवाजफेक हे सर्व दाखवण्यासाठी तो एखादा प्रकाश असतो. तो ओळखता येतो का? आपलं म्हणणं आपण केवळ शब्दांच्या माध्यमातून शेवटच्या रांगेपर्यंत पोहोचवायचे असते. यासाठी अभिनयावर विसंबून राहता येत नाही. कारण, अभिनय शब्दप्रामाण्याप्रमाणे चालतो. मायक्रोफोन अस्तित्वात नव्हते, तेव्हा शब्द जड आणि तीव्र लिहायची पद्धत तेव्हाच्या नाटककारांची होती. अफाट लोक समुदायासमोर बसून मुरक्या घेतल्या, हरकती घेतल्या तर चालतील का? तिथे तीव्र षड्जच हवा! परंतु, तांत्रिक क्रांती झाली, तशा अनेक संधी अभिनयासमोर आल्या. यावेळी त्यांचा योग्य उपयोग करून घेण्याची सुरुवात केली-ती बाईंनी. ‘झुंजारराव’ची शेवटची किंकाळी त्यांनी चक्क गाळली!

काय असाव्या त्यांच्या भावना अभिनय आणि दिग्दर्शनाबाबत? पुढे केव्हातरी त्या म्हणतात की, “रडतानाचा अभिनय करताना, आपल्या डोळ्यातून नाही, तर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या डोळ्यातून पाणी यायला हवं.” एखादी संस्था सुरू करायची, तर बरीच जुळवाजुळव ओघाने आलीच. त्याहीमागे लागते ती प्रचंड इच्छाशक्ती आणि ऊर्जा. बाई गरोदर. जागा कोणती घ्यावी, त्यापासून नाव काय द्यावं, इथवर प्रश्न होतेच. ‘रंगायन’ला सुरुवातीच्या काळात मिळालेल्या प्रसिद्धीमागचे आणि यशामागचे कारण हेच! ‘रंगायन’ ही संस्था नव्हती. ती चळवळ होती. केवळ अस्तित्वाचा नाही, तर दर्जेदार नाट्यनिर्मिती आणि नवनिर्मितीचा तो ध्यास होता. या एकमेव उद्दिष्टामागे फिरत राहणारा संघर्ष होता. बाईंनी केवळ नाटकच नाही, तर आपला नाट्यसंचही आपल्या कलाकृतीप्रमाणे मनोभावे जपला होता. वेळोवेळी त्यांच्यावर काम केले होते, संस्कार केले होते. जमशेदपूरवेळी मोकळा श्वास, घरच्यांपासून दूर असणं, अभिनयापासून, दिग्दर्शनापासून दूर असणं, आपल्या माणसांपासून दूर आणि सर्जनशीलतेला मनाविरुद्ध घातला गेलेला लगाम. त्यामुळे पुन्हा महाराष्ट्रात परतल्यानंतर नाटक ठरवणं, कलाकारांशी चर्चा, जागेसाठी, नावासाठी पत्रव्यवहार अगदी सहज केला त्यांनी. कलाकारांची निवड करण्यापासून काही ठरलेली मूल्ये रंगायची होती. ‘स्टार सिस्टीम’प्रमाणे ‘रंगायन’ पुढे गेले, तर त्याला अर्थ राहणार नाही. ‘रंगायन’ म्हणजे नाट्यकला आणि तिचा ध्यास घेतलेल्या वेड्या लोकांचा समूह. बाई म्हणतात की, “ ‘रंगायन’मध्ये वलये झाली. वलय म्हणजे एक वर्तुळ, एकाच्या आत अजून एक, त्यात अजून एक, अशी वर्तुळे. जशा आपल्या पिढ्या असतात, तशी ‘रंगायन’ला माणसे जोडली गेली. पुढे लोकसंख्या वाढल्यावर त्यात राजकारणाचाही शिरकाव झाला. तो अपरिहार्य असतो. सुरुवातीची चार-पाच वर्षे ‘रंगायन’ रंगलं. एखादी वास्तू कलेची भोक्ती असते, तिच्या सहवासात कला बहरतात.

आपण निर्माण केलेल्या किंवा आपण सुरुवात केलेल्या संस्था, चळवळी कधीच आपल्या हातात नसतात. आपण केवळ निर्मितीचे कारण असतो. ओढ्याला मिळणार्‍या इतर प्रवाहावर जसं, त्याचं भवितव्य निश्चित होत असतं तसंच इथेही. अनेक जोडली गेलेली माणसे, त्यांची स्वप्न आणि कर्तृत्व सगळंच. ’रंगायन’ला जसजशी प्रसिद्धी मिळू लागली, तसे अनेक कलाकार आणि प्रेक्षकसुद्धा येऊन मिळाले. ‘रंगायन’ म्हणजे केवळ संस्था नव्हती, ती नाट्यकलेची एक प्रयोगशाळा होती. नाट्यचळवळ होती. पुढे-पुढे स्थिरावत गेली, नावारुपाला आली आणि तिला उतरती कळाही लागली. याबद्दल बाई म्हणता की,“ ‘रंगायन’बद्दल आमच्या काही कल्पना, संकल्पना, श्रद्धा होत्या. हा वैचारिक ऐवज दुसर्‍या व तिसर्‍या फळीतील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचला आहे, असं आम्हाला वाटायचं; हा विश्वास खोटा ठरला. त्यांच्या उत्साहाला आम्ही श्रद्धा समजलो.” ‘रंगायन’ मुळात उभी होती, ते लेखन-दिग्दर्शनाच्या युतीवर. लेखन आणि दिग्दर्शन ही सृजनाची अंगे आहेत. त्यांच्यात समतोल असेल तरच त्याच्या अभिव्यक्ती चिरकाल टिकतील. बाईंनी ‘रंगायन’साठी आपलं सर्वस्व वाहिलं होतं, तेव्हा संस्थेचा प्रमुख म्हणणं, बाईच हे अलिखित सत्य होतं. ‘रंगायन’ची ओळख बाई होत्या. अशात तेंडुलकरांनी दुय्यम दर्जाचा दिग्दर्शक हवा, असे म्हटले आणि ‘रंगायन’चा आधारच निखळला. किती स्पष्टपणे आणि परखडपणे चिकित्सा केलीय बाईंनी आपली स्वतःची, आपल्या माणसांची आणि आपल्याच संस्थेची!
 
बाईंचा नाट्यप्रवास असा वळणावळणाचा. तो मराठीपुरताही सीमित नाही आणि महाराष्ट्रापुरताही नाही. व्यासंग मोठा असल्याने त्याला सीमा नाहीत. त्यांच्या सेटप्रमाणे त्यांनी या नाट्यविचारालाही अमेय अवकाश उपलब्ध करून दिले. आपल्या न चाललेल्या आणि फसलेल्या नाटकांविषयीही त्या बोलतात. त्या म्हणतात की, ”प्रेक्षक नाट्यकृती हे नातं बिनसलं असेल, तर त्याचं कारण सादरीकरणात हुडकायला हवं. आपला प्रेक्षकवर्ग ठरवणं आणि नेमबाजीचा खेळात ’बुल्स आय’ म्हणतात, त्याप्रमाणे अतिशय नेमकेपणाने आपला प्रयोग सादर करणं, ही नाटककार आणि दिग्दर्शक द्वयीची कलात्मक जबाबदारी आहे. कळत नकळत प्रयोगात काही त्रुटी राहतात. लक्षात आल्यावर त्या सुधारताही येऊ शकतात; पण फसलेली संहिता, भरमसाठ पात्रे, त्यांचं ढोबळ स्वभाव रेखाटन आणि पसरत जाणारं लिखाण हे दोष मात्र सुधारण्यापलीकडचे असतात.” एकत्रित प्रयोग म्हटल्यावर त्याबद्दलची तत्त्व त्या सांगताना, त्यांना गवसलेलं प्रयोगाचं वर्णन त्या करतात. प्रयोगाची राजवट एखाद्या हुकूमशाप्रमाणे असते. तालमीत एक कलात्मक चौकट तयार होते. त्यात भावनिक लय, तालाची स्पंदनं असतात. त्या चौकटीचीच हुकूमत रंगमंचावर चालते. तिला डावलता येत नाही. प्रयोगातले नवे रथ हुडकायचे असतील तरीही कलावंताला चौकटीची मर्यादा पाळावी लागते; अन्यथा प्रयोगाचा तोल ढासळतो.

हा काळ होता, जेव्हा रंगभूमी उमलत होती. अभिव्यक्तीला बंधनं नव्हती आणि मनोरंजनाची माध्यमेही कमी होती. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद, कलाकारांना मिळणारा वेळ आणि त्यामुळे घेतली गेलेली मदत आजच्या धकाधकीच्या आयुष्यात पाहायला मिळत नाही. अशातच चित्रपट तंत्राचा प्रसार झाला आणि नाटकापेक्षा चित्रपट जास्त पाहिले जाऊ लागले. एकाचवेळी अनेक ठिकाणी चित्रपट पाहता येतो. तसेच कलाकृती पूर्ण झाल्यावर फार मेहनत घ्यावी लागत नाही. साहजिकच हे माध्यम लोकप्रिय झाले आणि रंगभूमीच्या उतरत्या कळेला कारणीभूत आहे असे वाटले. पण, आज कोरोना काळानंतर रंगभूमीला पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत. अशावेळी नेमके मधल्या काळात नाट्यक्षेत्रात नक्की काय हरवलं, हे शोधणं गरजेचं ठरतं. अभिनयात किंवा तांत्रिक साहाय्य आणि नेपथ्यादी कलेत कमतरता जाणवते का? तर नाही. मग विषय हा एकमेव मुद्दा आहे का? या पार्श्वभूमीवर नाट्य चळवळी आणि त्यांचे बदलते प्रवाह जाणून घेणे अतिशय महत्त्वाचे ठरते आणि म्हणूनच ‘झिम्मा’ हे विजया मेहता यांचं केवळ आत्मचरित्र न वाटता भारतीय मनोरंजन क्षेत्राचा ५० वर्षांचा लेखाजोखा वाटतो!
Powered By Sangraha 9.0