भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षांच्या कारकिर्दीची वर्षपूर्ती...
03 Nov 2023 17:10:53
मुंबई : भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या कारकिर्दीला आज एक वर्ष पुर्ण झाले आहे. यानिमित्ताने महाराष्ट्र महिला मोर्चा देशात नंबर एक करण्याचे प्रयत्न जोमाने सुरू राहतील, असे त्यांनी म्हटले आहे. ट्विटरवर पोस्ट करत त्यांनी आपल्या कारकिर्दीच्या वर्षपूर्तीबद्दल माहिती दिली आहे.
चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये "उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माझ्यावर विश्वास ठेवत दिलेल्या जबाबदारीला मी न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे," असे म्हटले आहे. तसेच "या वर्षभरात पंतप्रधान मोदीजी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी, सुरक्षिततेसाठी, हितासाठी घेतलेले निर्णय-उपक्रम, विविध योजना महिला मोर्चाच्या माध्यमातून राज्यभर पोहोचविता आल्या, याचा आनंद आहे," असेही त्यांनी म्हटले आहे.
पुढे त्यांनी लिहीले की, "राज्य पातळींवर महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विधानपरिषद आमदार प्रविणजी दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाजिल्ह्यात उभारलेले सहकारी संस्थांचे जाळे असो व त्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळवून देणे असो, गावोगावीच्या महिलांच्या समस्या समजून त्या सोडविण्यासाठी केलेली कामे असो, महिलांना केंद्र- राज्य सरकारच्या योजनांची माहिती देणं- त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवणे असो. ही सर्व कामे अत्यंत यशस्वीरित्या माझ्या महिला मोर्चाच्या सहकाऱ्यांच्या साथीने मी करू शकले अर्थात यात सन्माननीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजी यांचे ही सहकार्य फार मोलाचे आहे," असेही त्यांनी म्हटले आहे.
तसेच "प्रत्येक पातळींवर महिला मोर्चा सामान्य महिलेच्या पाठीशी उभा राहिला. जिथे आव्हान तिथं संधी असते. हा वर्षभराचा कालावधी आव्हानात्मक होताच पण सोबत संधी आणणाराही होता," असेही चित्रा वाघ म्हणाल्या. "महाराष्ट्रात ‘शत प्रतिशत भाजपा’ चे संघटन सक्षम करण्यासाठी महिला मोर्चा प्रतिबद्ध आहे. अजूनही बरेच काम करायचे आहे. महिला मोर्चाच्या माध्यमातून ते आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने करू. महाराष्ट्र महिला मोर्चा देशात नंबर एक बनविण्याचे प्रयत्न अधिक जोमाने सुरू राहतील आणि यात मला माझ्या सर्व महिला सहकाऱ्यांची साथ मिळेल याची खात्री आहे," असेही चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे.