म्युरल्स विश्वातील अनोखा कलावर्षाव

03 Nov 2023 20:57:53
Article on Varsha Pawar

९०च्या दशकात ‘डीएड’ करायचे व शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी करायची, अशा काळात त्यांनी वेगळी वाट निवडत, कलाक्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली. जाणून घेऊया वर्षा पवार यांच्याविषयी...
 
९०च्या दशकाचा काळ मुलींसाठी प्रामुख्याने ‘डीएड’ करायचे आणि शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी पत्करायची, असा काहीसा होता. मात्र, अशातही त्यांनी आपली वेगळी वाट चोखाळत कलाक्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यांच्या वर्गातील अनेकजणी आज शिक्षिका आहेत. त्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देतात. मात्र, वर्षा पवार या ‘रुची आर्ट गॅलरी’च्या माध्यमातून कलेचे धडे देत आहेत.
 
नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात जन्मलेल्या वर्षा रवींद्र पवार यांचे वडील पेशाने शिक्षक, तर आई गृहिणी. इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण वर्षा यांनी जिजामाता गर्ल्स हायस्कूलमधून पूर्ण केले. चित्रकलेसह वाचनाची त्यांना प्रचंड आवड. आत्मचरित्र, कथा, कादंबरी अशा अनेक पुस्तकांचे वाचन बालपणीच त्यांनी केले. वडील के. एस. अहिरे यांनीच वाचनाची आवड रुजवली. अहिरे सरांना चित्रकलेचीही विशेष आवड होती. त्यामुळेच वर्षा यांनाही चित्रकलेची आवड निर्माण झाली. वर्षा या पुस्तकांमधील चित्रे काढत असत.

इयत्ता नववीत असतानाच त्यांनी कपड्यावर चित्र काढणे, लोकरची कामे करणे यांत प्रावीण्य मिळवले. नववीपासूनच त्यांनी शिकवणी घेण्यास सुरुवात केली. ऑईल, कॅऩव्हास पेंटिंगचे धडे त्या जुजबी शुल्क घेऊन देऊ लागल्या. त्यावेळी त्यांना मोठ्या प्रमाणावर ऑर्डरदेखील मिळू लागल्या. मुलीला मेहंदी काढायले आवडते, हे समजल्यावर वडिलांनी नाशिकहून वर्षा यांना मेहंदीचे पुस्तक आणून दिले. इयत्ता दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर वर्षा यांनी कला शाखेत शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा वडिलांनाही त्यांना विरोध केला नाही.

त्याकाळी जास्त सामान मिळत नसल्याने वेलव्हेट पेपर घेऊन, त्यावर लोकरचे वेगवेगळे आकार बनवून त्यावर प्राण्यांची चित्रे त्या काढत. इतक्या लहान वयातच त्यांनी कलाक्षेत्रात पदार्पण केले. पुढे त्यांनी पुण्यात ‘चित्रलिला निकेतन’मध्ये प्रवेश घेतला. सीरॅमिक, पॉटरी, टेक्सस्टाईल डिझायनिंगचे धडे त्यांना इथून मिळाले. तीन वर्षांचा हा अभ्यासक्रम होता. ‘टेक्सस्टाईल’मध्ये त्या महाराष्ट्रातून प्रथम आल्या होत्या. या काळात त्यांनी जे साहित्य उपलब्ध होतं, त्यातून कला शिकली. इतक्या ग्रामीण भागातून थेट पुण्यासारख्या शहरात शिक्षण घेणे, हे ९०च्या दशकात सोपी गोष्ट मुळीच नव्हती. पुण्याहून घरी यायला १२ तास लागायचे. आई-वडिलांशी संवाद होत नव्हता. पत्रही १५ दिवसांनी यायचे. तेव्हा मोबाईल, एटीएम अशा गोष्टी नव्हत्या, अशातही शिक्षणाच्या जिद्दीने वर्षा यांनी सर्व अडचणींवर मात केली.

१९९२ साली शिक्षण पूर्ण करत पुण्याहून परतल्यानंतर त्यांनी स्टेन ग्लास वर्क सुरू केले. लग्नानंतर आपल्या मुलीला पुरेसा वेळ देता यावा, यासाठी त्यांनी घरीच पुन्हा चित्रकलेचे क्लासेस घ्यायला सुरुवात केली. यावेळी रबर मोल्डिंगचे क्लासेसही त्यांनी सुरू केले. अशा प्रकारचे क्लासेस घेणार्‍या, त्या नाशिकमधील पहिल्या कलाकार. १९९६ साली ‘रुची आर्ट गॅलरी’ची स्थापना करत, गुरूकुल पद्धतीने चित्रकलेचे शिक्षण देण्यास त्यांनी सुरुवात केली. यानंतर वर्षा यांनी प्रामुख्याने म्युरल्सवर काम करण्यास सुरुवात केली. ‘पीडब्ल्यूडी’, ‘आरसीएफ’ अशा अनेक विभागांमध्येही त्यांनी आपल्या म्युरल्सची छाप सोडली आहे. थ्रीडी म्युरल्स, वास्तू म्युरल्स आणि देवांच्या म्युरल्सला अधिक पसंती मिळत गेली. आतापर्यंत त्यांनी एक फूट ते सात फुटांहून अधिक लांबीची नऊ हजारांहून अधिक म्युरल्स तयार केली आहेत. वर्षा यांच्या म्युरल्सला महाराष्ट्रासह कोलकाता, अहमदाबाद, दुबई, अमेरिका आणि जर्मनीतही मागणी असते.

२००३ साली वडील निवर्तल्यानंतरही वर्षा यांनी कलेच्या माध्यमातून, त्यांना आज जीवंत ठेवले आहे. वर्षा यांना वडील अर्जुन अहिरे यांच्यासह आई चित्रा अहिरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. घरात मुलगा-मुलगी असा भेदभाव कधीही नव्हता. घरात अगदी सकारात्मक वातावरण होते. “तू मुलगी आहेस म्हणून ही गोष्ट करू नये,’ असे त्यांनी कधीही जाणवू दिले नाही. माझी आवड बघून त्यांनी मला पुण्याला शिक्षणासाठी पाठवले. चित्रकलेपेक्षा म्युरल्समध्ये पर्याय अधिक आहेत. म्युरल्स ही रोजची नवनिर्मिती असते. अनेक बारकावे त्यात असतात. अनेकांना म्युरल्स नावाचा शिल्पप्रकार असतो, हेच माहिती नसते. कलेकडे दुर्लक्ष झाल्यामुळे अनेक कलाप्रकारांचा प्रचारप्रसार होऊ शकला नाही. यात पैसे मनासारखे मिळतीलच असे नाही, त्यामुळे अनेकांची कला शिकण्याची इच्छा असूनही ते दुसर्‍या प्रवाहात निघून जातात. मलाही अनेक महिने कामे मिळाली नव्हती, तेव्हा वाईट वाटायचे. पण, वडिलांकडून प्रेरणा मिळत गेली,” असे वर्षा सांगतात.

वर्षा यांच्या ‘रुची आर्ट गॅलरी’त दोन महिने, सहा महिने आणि एक वर्षासाठीचे असे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. याठिकाणी विविध ठिकाणांहून विद्यार्थी चित्रकलेसह म्युरल्सचे धडे घेण्यास येतात. ९०च्या काळातही एक मुलगी शिक्षण घेऊन आपल्या पायावर उभी राहू शकते आणि आपली स्वतंत्र ओळख निर्माण करू शकते, हेच वर्षा पवार यांनी दाखवून दिले. त्यांच्या आगामी वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरूण भारत’च्यावतीने त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!
७०५८५८९७६७
Powered By Sangraha 9.0