‘सॅम बहादूर’ चित्रपटातील युद्ध प्रसंगांचे हुबेहूब चित्रण करण्यासाठी रणगाडे आणि क्षेपणास्त्रांचा खास समावेश!

29 Nov 2023 11:43:14

vicky kaushal 
 
मुंबई : अभिनेता विकी कौशलचा आगामी चित्रपट ‘सॅम बहादूर’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे कथानक देशातील पहिले फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ आणि भारतीय लष्कराच्या असीम शौर्याला समर्पित असून या चित्रपटात सॅम माणेकशॉ यांची विकी कौशल याने साकारली आहे.
 
दरम्यान, या चित्रपटात युद्ध प्रसंग हुबेहुब दिसावेत यासाठी निर्मात्यांनी प्रत्येक युद्धाचे प्रसंग त्या काळानुरूप वेगळे आणि अचूक बनवण्याकरता तोफा, क्षेपणास्त्र डागणारी वाहने, रणगाडे इत्यादींसह हजारो शस्त्रे आणि युद्ध वाहनांची खरेदी करण्यात आली होती.
 

vicky kaushal 
 
हा चित्रपट असीम शौर्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित आहे, ज्यांनी भारतीय सैन्याचे तडफदार नेतृत्व केले आणि बांगलादेशची निर्मिती करण्यात मोलाची कामगिरी बजावली.
 
चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केले असून त्यांनी भवानी अय्यर आणि शंतनू श्रीवास्तव यांच्या समवेत या चित्रपटाचे लेखन देखील केले आहे. या चित्रपटाची निर्मिती रॉनी स्क्रूवाला यांनी ‘आरएसव्हीपी मूव्हीज’च्या बॅनरखाली करण्यात आली आहे. या चित्रपटात विकी कौशल व्यतिरिक्त फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा, नीरज काबी, एडवर्ड सोनेनब्लिक आणि झीशान अय्युब यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. ‘सॅम बहादूर’ हा चित्रपट १ डिसेंबर २०२३ रोजी चित्रपटगृहांत झळकणार आहे. 
Powered By Sangraha 9.0