गिरण्यांच्या इतिहासाला मिळणार उजाळा

- इंडिया युनायटेड मिलच्या जागेवर उभारणार टेक्स्टटाईल म्युझियम

    29-Nov-2023
Total Views |
Textile Museum news
 
मुंबई : मुंबईची ओळख असणाऱ्या कापड गिरण्या बंद पडल्या आणि त्यात काम करणारे कामगार यांची ओळख काळाच्या ओघात पुसून गेली. मात्र, लवकरच गिरण्यांच्या इतिहासाला पुन्हा उजाळा मिळणार आहे. गिरण गावातील काळाचौकी येथील इंडिया युनायटेड मिलच्या एकूण ४४ हजार चौरस मीटर पैकी ३७ चौरस मीटर जागेवर उभ्या राहात असलेल्या टेक्स्टटाईल म्युझियममध्ये संगीत कारंज्यावरील जलपटाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, या जलपटाच्या माध्यमातून गिरण्यांच्या इतिहासाची पाने उलगडली जाणार आहेत. त्यामुळे नव्या पिढीला गिरण्यांचे गतवैभव पाहण्याची संधी मिळेल. मुंबईतील गिरण्या, त्याकाळी या गिरण्यांमधून तयार होणारे कापड, तेथील कार्यपद्धती याची सविस्तर माहिती यामुळे मिळण्यास मदत होणार आहे.
टेक्स्टटाईल म्युझियम उभारण्याचा प्रस्ताव हा खूप जुना आहे. जानेवारी२०१९च्या मध्यावर तीन टप्प्यात काळाचौकी येथील ४४ हजार चौरस मीटर जागेवर गिरण्यांचा इतिहास उलगडण्यासाठीच्या कामाला सुरुवात झाली. मात्र अद्यापपर्यंत एकही टप्पा पूर्ण झाला नाही.

- पहिल्या टप्प्यात सात हजार चौरस मीटर जागेवर संपूर्ण गिरणगावचा इतिहास साकारण्यात येणार आहे. यात तळे व सभोवतालचा परिसर सुशोभिकरण करुन बहुउद्देशीय प्लाझा व वस्त्रोद्योगावर म्युरल बनविण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या कामाला दि. १५ जानेवारी २०१९ रोजी सुरूवात झाली.

- टप्पा १ ब अंतर्गत विविध प्रकारच्या नळीच्या तोंडाद्वारे संगीत कारंजे निर्माण करून जलपटावर मुंबई व कापड गिरण्यांचा इतिहास प्रदर्शित करण्याकरिता लघुपट तयार करणे, प्रदर्शन करणे व पुढील 4 वर्षे प्रचलन व परिरक्षित करण्याचे काम आहे. सदर 4 वर्षाकरिता एकूण २८ विविध लघुपट निर्माण करुन जलपटावर प्रदर्शित करण्याचे काम आहे.या कामाची सुरूवात दि. १३ नोव्हेंबर २०१९ रोजी सुरु झाली असून आजमितीला संगीत कारंज्यासाठी लागणारे सामान तयार करणे व पुरवठा करण्याचे काम पूर्ण झाले आहे.

- तर तिसऱ्या टप्प्यात म्युझियमचे प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे.

लवकरच लोकार्पण

दरम्यान, येथे उभारण्यात आलेल्या तळ्यात नॅनो बबल प्रणाली बसवल्यानंतर संगीत कारंज्याचे काम पूर्ण होईल. त्यानंतर पहिल्या टप्प्यातील कामाचे लोकार्पण होणार आहे. तसेच पुढील चार महिन्यात तळ्याच्या सुशोभिकरणाचे कामही पूर्ण होणार असल्याची माहिती संबंधितांनी दिली आहे.

उलगडणार जीवनमान :

कापड गिरण्या बंद झाल्यानंतर त्या जागेवर व्यावसायिक तसेच निवासी संकुले उभी राहिली. काही जागा म्हाडा आणि मुंबई महापालिकेच्या ताब्यात आल्या. पालिकेने आपल्या ताब्यातील जागेवर काही उपक्रम राबवण्यास सुरुवात केली. काळाचौकी येथील इंडिया युनायटेड मिलमध्ये टेक्स्टटाईल म्युझियम व सांस्कृतिक केंद्र उभारले जात आहे. गिरणगावातील जीवनमान आणि गिरण्यांची माहिती जलपटाच्या अर्थात संगीत कारंज्याच्या माध्यमातून दिली जाईल. संगीत कारंजे, ध्वनी आणि प्रकाश व्यवस्थेमार्फत चित्रीकरणाच्या माध्यमातून गिरण्यांच्या इतिहास उलगडला जाईल.

इंडिया युनायटेड मिलमधील जागेवर असलेल्या १०० वर्षांपूर्वीच्या गिरणीच्या इमारतींपैकी "हेरिटेज दर्जा" असलेल्या इमारतींचे मूळ रूपात संवर्धन केले जाणार आहे. त्यामध्ये वस्त्रोद्योग आणि त्या अनुषंगाने मुंबई शहराने केलेली प्रगती याचा लेखाजोखा मांडणारा इतिहास पुढील पिढ्यांसाठी "टेक्सटाईल म्युझियम"च्या रूपात मुंबई महानगरपालिकेच्या "पुरातन वास्तू जतन विभागामार्फत" मांडला जाणार आहे.