मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी धर्मवीर चित्रपटाच्या निर्मात्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. ठाकरे गटाचे नेते आणि माजी महापौर दत्ता दळवी यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी भांडूप पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी हे वक्तव्य केले आहे.
संजय राऊत यांनी भांडूप पोलीस स्टेशनला जाऊन माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, "दत्ता दळवी यांना आज सकाळी पोलिसांनी घरात घुसून अटक केली. दत्ता दळवी यांचा गुन्हा काय आहे? त्यांनी या महाराष्ट्राच्या जनतेच्या लोकभावना या भांडूपमधल्या एका मेळाव्यात व्यक्त केल्या. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी किंवा त्यांच्याबरोबरचे जे गद्दार हृदयसम्राट आहेत ते स्वतःला हिंदू हृदयसम्राट म्हणवून घेत आहेत. याच्यावर तमाम हिंदूंचा आक्षेप आहे,” असे ते म्हणाले.
"खरं म्हणजे गद्दार ह्रदयसम्राटांनी स्वत:ला हिंदूह्रदयसम्राट म्हणवून घेणे हा वीर सावरकर आणि हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान आहे. त्याबद्दल खरं म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. मी मुख्यमंत्र्यावर बोलत नाही. मी एकनाथ शिंदेंवर गुन्हा दाखल व्हायला हवा असे म्हणत आहे. कारण ते वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरेंची उपाधी स्वत:ला लावून घेत आहे," असेही ते म्हणाले.
पुढे संजय राऊत म्हणाले की, "यासंदर्भात दत्ता दळवी यांनी एक शिवसैनिक म्हणून त्या सभेत जोशपुर्ण भाषण केलं. जर आनंद दिघे असते तर या गद्दार हृदयसम्राटांना चाबकाने फोडून काढले असते, त्यात काय चुकीचं बोलले. त्यांनी एक शब्द उच्चरला जो धर्मवीर चित्रपटामध्ये आनंद दिघेंच्या तोंडी घातलेला आहे. तो शब्द सेन्सॉरने काढला नाही. धर्मवीर चित्रपटात तो शब्द आनंद दिघेच्या तोंडी जसाच्या तसा आहे. जर तो शब्द आक्षेपार्ह असेल तर चित्रपटाचे निर्माते, चित्रपटाचे प्रायोजक आणि कलाकार यांच्यावर गुन्हा दाखल केला का? तोच शब्द दत्ता दळवी यांनी वापरला तर त्यांना अटक कशी केली जाते? असा सवालही त्यांनी केला आहे.