नवी दिल्ली : मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. देशातील ८० कोटींहून अधिक लोकांना मोफत अन्नधान्य उपलब्ध करून देणारी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना पाच वर्षांसाठी वाढवण्यास मोदी सरकारने मान्यता दिली आहे. मंगळवारी, २८ नोव्हेंबर २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना ५ वर्षांसाठी वाढवण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
मंत्रिमंडळाच्या निर्णयाची माहिती देताना माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, "कोविड महामारीच्या काळात पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना सुरू करण्यात आली होती. ही योजना १ जानेवारी २०२४ नंतर पुढील पाच वर्षांसाठी वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. योजनेच्या लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती ५ किलो मोफत धान्य मिळणार असून ८१ कोटी भारतीयांना योजनेचा लाभ मिळणार आहे. अंत्योदय योजनेचा लाभ मिळविणाऱ्या कुटुंबांना ३५ किलो धान्य मिळत राहील. आणि सरकार या योजनेवर पुढील पाच वर्षांत ११.८० लाख कोटी रुपये खर्च करणार आहे."