मलबार हिल येथील जलाशय संदर्भातील समितीला मुदतवाढ द्या : मंत्री मंगलप्रभात लोढा

29 Nov 2023 18:34:22
Minister Mangal prabhat Lodha On Reservoir
 
मुंबई : मलबार हिल येथील जलाशयाच्या टाकीची क्षमता वाढवण्याच्या संदर्भातील अहवाल देण्यासाठी स्थापन समितीला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यतामंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी नुकतीच मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबालसिंह चहल यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पालिका आयुक्तांना पत्र पाठवले आहे.

आयुक्तांना दिलेल्या पत्रात मंत्री लोढा यांनी म्हटले आहे की, मलबार हिल येथील सदर विषयाबाबत दि. ३१ ऑक्टोबर रोजी एक बैठक घेतली होती. या बैठकीत मलबार हिल येथील जलाशय संदर्भात एक समिती अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्याचे ठरवण्यात आले होते आणि त्या समितीचा अहवाल दि. १ डिसेंबर रोजी देण्याचे ठरवण्यात आले होते.
 
परंतु, नोव्हेंबर महिन्यात विविध उत्सवांच्या शासकीय सुट्ट्या आल्याने संबंधित विषयाबाबत योग्य अहवाल देण्यासाठी समितीला अपुरा वेळ मिळत असल्याचे निदर्शनास येत आहे. तरी आपण सादर समितीचा कार्यकाळ ४५ दिवसांनी वाढवण्याचे संबंधितांना निर्देश द्यावेत, अशी मागणी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आयुक्तांकडे केली आहे.
Powered By Sangraha 9.0