"माझी सुन आणि मी.." निर्मिती सावंत यांनी सांगितला 'तो' किस्सा
28-Nov-2023
Total Views |
रसिका शिंदे-पॉल
मुंबई : स्त्रियांच्या स्वातंत्र्याची व्याख्या त्यांना हवी तशी त्यांनी लिहावी आणि जगावी हे सांगणारा चित्रपट म्हणजे हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा २'. करोनाच्या संकटानंतर घाबरलेल्या प्रेक्षकांना चित्रपटगृहात आणणारा चित्रपट म्हणजे 'झिम्मा'. या चित्रपटात ७ वेगवेगळ्या तऱ्हा असलेल्या बायका परदेशात फिरण्यासाठी जातात आणि त्यानंतर त्या प्रवासात अनोळखी लोकांसोबत अविस्मरणीय आठवणी तयार होतात. 'झिम्मा २' चित्रपटात २ नव्या बायकांचा प्रवेश झाला असून त्यातील एक निर्मला अर्थात निर्मिती सावंत यांची सुन तानिया अर्थात रिंकू राजगुरु आहे. पण निर्मिती सावंत यांनी महाएमटीबीशी बोलताना त्यांच्या खऱ्या आयुष्यातील सुनेसोबत नाते कसे आहे हे सांगितले.
मी आणि माझी सुन आम्ही दोघी ठार वेड्या आहोत
“मी आणि माझी सुन आम्ही दोघी एकत्र आलो की धिंगाणा घालतो. दोन बायका एकत्र आल्या की काय होतं ते आम्हाला भेटून नक्कीच लोकांना कळतं. बिचाऱ्या माझ्या मुलाला आमचा वेडेपणा सहन करावा लागतो. बऱ्याचदा आम्ही बाहेर जेवायला हॉटेलमध्ये गेलो की आम्ही दोघी इतक्या मोठ्याने हसत आणि गप्पा मारत असतो की माझा मुलगा येऊन आम्हाला दोघींना ओरडतो की आपण कुठे आहोत याचं भान ठेवा. पण आम्ही त्याचं काहीही ऐकत नाही. तर असं आमच्या दोघींचं समंजसपणाचं नातं आहे”, असं निर्मिती सावंत म्हणाल्या. पुढे त्या असं देखील म्हणाल्या की, “कोणत्याही नात्यात मतभेद असावेत पण मनभेद असू नयेत”.
हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा २' या चित्रपटात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरु, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. २४ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रभरात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑपिसवर तीन दिवसांत ४.७७ कोटींची कमाई केली आहे.