नवी दिल्ली : ‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशी घोषणाबाजी करणाऱ्या 'शेर-ए-काश्मीर कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठा'तील सात विद्यार्थ्यांविरोधात बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायद्यांतर्गत (युएपीए) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जम्मू-काश्मीरमधील गांदरबल येथील शेर-ए-काश्मीर कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या सात विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे. या काश्मिरी विद्यार्थ्यांवर १९ नोव्हेंबर रोजी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून भारताचा पराभव झाल्यानंतर जल्लोष करण्याचा आणि पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याचा आरोप आहे.
याप्रकरणी एका बिगर काश्मिरी विद्यार्थ्याने तक्रार दाखल केली होती. त्यात त्यांनी म्हटले होते की, जेव्हा ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला तेव्हा या सात विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या वसतिगृहात आनंदोत्सव साजरा केला होता. यामुळे तो व त्याचे इतर साथीदार घाबरले. घाबरलेल्या विद्यार्थ्यांनी वसतिगृहात फटाके फोडल्याबद्दलही आक्षेप घेतला. मात्र, काश्मिरी विद्यार्थ्यांनी जल्लोष सुरूच ठेवल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले होते.
तक्रारीनंतर पोलिसांनी नुकतीच या सात काश्मिरी विद्यार्थ्यांना त्यांच्या वसतिगृहातून अटक केली आहे. तौकीर भट, मोहसीन फारुख वानी, आसिफ गुलजार वॉर, ओमर नजीर दार, सय्यद खालिद बुखारी, समीर रशीद मीर आणि उबेद अहमद अशी अटक केलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत.