नवी दिल्ली : अॅपल कंपनीचे आयफोन बनवणाऱ्या फॉक्सकॉनने भारतात १.५४ अब्ज डॉलर्सच्या गुंतवणूकीची योजना आखली आहे. भारतीय रुपयांमध्ये ही रक्कम १३,५०० कोटी इतकी होते. फॉक्सकॉनने तैवान स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, या गुंतवणुकीमुळे त्याच्या ऑपरेटिंग गरजा पूर्ण करण्यात मदत होईल. फॉक्सकॉनने याआधीच भारतात आपले कर्मचारी आणि गुंतवणूक दुप्पट करण्याची योजना जाहीर केली होती.
फॉक्सकॉन अॅपलसह अनेक प्रसिद्ध कंपन्यासाठी मॅन्युफॅक्चरिंगचे काम करते. फॉक्सकॉनने मोठ्या प्रमाणात चीनमध्ये गुंतवणूक केली होती. पण आता चीनच्या अर्थव्यवस्थेत आलेल्या मंदीमुळे कंपनी भारतात आपले उत्पादन केंद्र हलवत आहे. कंपनी सध्या भारतात तीन मॅन्युफॅक्चरिंग युनिट चालवत आहे. या तीनही उत्पादन केंद्रांची क्षमता वाढवण्यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे.
फॉक्सकॉन कंपनीने भारत सरकारच्या मेड इन इंडिया योजनेला पाठिंबा दिलेला आहे. फॉक्सकॉन सध्या भारतात अॅपलच्या आयफोनसाठी लागणाऱ्या सामग्रीचे उत्पादन भारतात करत आहे. त्यासोबतच फॉक्सकॉन सेमीकंडक्टरच्या उत्पादनाची सुद्धा योजना आखत आहे.