गाझियाबाद : उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद जिल्ह्यात एका जोडप्याने घरवापसी केली आहे. मंदिरातील शंखनाद आणि वेदमंत्रांच्या गजरात या जोडप्याने जय श्री रामचा नारा देत आपले भावी जीवन सनातन पद्धतीनुसार जगण्याचा संकल्प केला. हिंदू रक्षा दल नावाच्या संघटनेने हा घरवापसीचा कार्यक्रम आयोजित केला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, घरवापसी केल्याने आसिफ नावाचा तरुण आता आकाश चौहान बनला आहे, तर त्याची पत्नी सुमैया खातून ही प्रिया बनली आहे. रविवार २६ नोव्हेंबर रोजी या दोघांनी घरवापसी केली आहे. आसिफ हा मुळचा लोणी येथील रहिवासी असून त्याचा टॅक्सीचा व्यवसाय आहे.
५ वर्षांपुर्वी सुमैया खातून नावाच्या मुलीशी आसिफचे लग्न झाले. त्यांना एक मुलगादेखील आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्याची घरवापसी करण्याची इच्छा असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय सुमैयावर सुरुवातीपासूनच हिंदू धर्माचा प्रभाव होता.
शेवटी २६ नोव्हेंबर रोजी त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला. गाझियाबादच्या भोपुरा भागातील एका मंदिरात घरवापसीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आसिफ आणि सुमैया यांनी विधीनुसार पूजा केली. त्यानंतर शंखनाद आणि वेदमंत्रांच्या गजरात त्यांनी हवन केले आणि भविष्यात सनातन पद्धतीनुसार जीवन जगण्याचा निर्धार केला.