गेल्या भागांमध्ये प्लास्टिक प्रपाताबद्दल आपण पाहिले. पृथ्वीवरील घनकचरा व्यवस्थापन हीसुद्धा तितकीच मोठी समस्या होत चालली आहे. याच विषयावर चर्चा करणारा हा लेख...
काही वर्षांपूर्वी महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना एक प्रकल्प दिला होता. यात त्यांनी त्यांच्या घरातल्या कचर्याच्या बादलीचे रोज विश्लेषण करणे आणि त्याची लिखित नोंद करणे हे आवश्यक होते. दर दिवशी, वेगवेगळ्या महिन्यांना आणि काही खास कारण असल्यास अशा वेळेला कचर्याच्या बादलीत पडणार्या विविध कचर्याकडे डोळस दृष्टिकोन टाका, अशी या प्रकल्पाच्या मागची भूमिका होती. कोणता कचरा आहे, आपण कचरा कसा कसा निर्माण केला आहे! त्यातला कोणता कचरा अनिवार्यरित्या फेकावा लागणार आहे याची उत्तरे त्यांनी शोधायची होती. सर्वप्रथम विद्यार्थ्यांना या प्रकल्पात सहभागी होण्यास आवडले नव्हते. कचरा कसला चिवडायचा असे काहीसे त्यांना वाटत होते. कचर्याच्या बादलीचे विश्लेषण कशाला करायचे अशी त्यांची धारणा, तर काही विद्यार्थ्यांना आपल्या घरात कचर्याची बादलीच नाही असेही जाणवले. आम्ही कचरा खालच्या चौकात भिरकावून देतो, घरापाठीमागे फेकतो,नदीत टाकून येतो असे ही काही महाभाग सापडले. एखादाच अपवादात्मक घरच्या-घरी कचरा कंपोस्ट करतो, असे सांगून गेला.
आपण दर दिवशी विविध प्रकारे कचरा निर्माण करत असतो. आपल्या घरातल्या कचर्याची बादली ही आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा असते. आपल्या आर्थिक स्तराचा परिचय आपल्या बादलीवरून होऊ शकतो. आपल्या पर्यावरणीय पाऊलखुणा आपण फेकतअसलेल्या कचर्याच्या स्वरूपावरून सहज समजून येतात. आपले सामाजिक भानदेखील आपण निर्माण करत असलेल्या कचर्यावरून लक्षात येते, असे आपण म्हणू शकतो.
घरातून निर्माण होणारा कचरा मुख्य दोन प्रकारचा! यातील काही भाग ओला कचरा व काही भाग सुका कचरा असतो. ओला कचरा म्हणजे जैवविघटनशील कचरा. भाज्यांची व फळांची साले, वाया गेलेले अन्न, जे जे आपण होऊन कुजून जाऊन नष्ट होऊ शकेल, असे सर्व पदार्थ या वर्गात येतात. यांचे विघटन होत असताना दुर्गंधी तर येतेच, शिवाय सर्व परिसर विद्रुप दिसू शकतो. घरमाश्यांसारखे कीटक अशा कचर्यावर जगताना मोठ्या संख्येने प्रजनन करतात. त्यांच्या जीवनशैलीमुळे रोगराईचा प्रादुर्भाव होऊ शकतो. विशेषतः कॉलरा, टायफाईड, हगवण, आमांश असे पोटाचे विकार आणि त्याच्या साथी पसरल्या जातात. उकिरड्याच्या ढिगावर मोठ्या संख्येने कुत्री, मांजरे, उंदीर असे प्राणी या कचर्यात अन्न शोधत असतात. त्यामुळे हा कचरा सगळीकडे विखुरला जातो. एखाद्या परिसराचे सौंदर्य नष्ट करायचे असल्यास असे कचर्याचे ढीग मदतीला येतात.
दुसर्या प्रकारचा कचरा म्हणजे अविघटनशील. कोणतेही जैविक घटक या कचर्याचे रुपांतर करून शकत नाहीत. वर्षानुवर्षे असा कचरा परिसरात न बदलता साचून राहू शकतो. प्लास्टिक हे त्याचे प्रातिनिधिक उदाहरण असले तरी इतरही अनेक पदार्थ यात मोडतात. पत्रे, घातुंच्या इतर वस्तू, काचा, ई-वेस्ट ...जसे बॅटरीज, संगणकांचे विविध भाग, मोडके रेडिओ, कॅसेटस वगैरे. शिवाय इमारतीच्यापुनर्बांधणीचा कचरा तर घनघोरच! अविघटनशील कचर्यात घातक कचरा ही समाविष्ट आहे. त्यात लहान-मोठ्यांचे डायपर, रक्तलांच्छित कापूस, बँडेजेस, वापरलेले सॅनिटरी नॅपकिन अशा अनेक वस्तू येतात. शिवाय नको असलेली औषधे, सुया, सिरींजेस, काचा असा वैद्यकीय कचरा देखील घरोघरी तयार होत असतो.
‘स्वच्छ भारत अभियान योजना’ शासकीय पातळीवर राबवली जाणारी योजना. म्हणजे जी यंत्रणा गावा-शहरातून घरोघरी जाऊन कचरा गोळा करणार आहे त्यांची जबाबदारी, असे आम्हा सामान्यांना वाटते. पण कचरा हा वैयक्तिक पातळीवर तयार होतोय, मग आपणही त्याची वैयक्तिक जबाबदारी उचलली पाहिजे नाही का? ‘वाढता वाढता वाढे ग्रासले भू-मंडळा’ अशी अवस्था कचर्याच्या बाबतीत झाली आहे. जस जशी मानवाची जीवनशैली बदलत चालली तसतसे कचर्याचे प्रमाण देखील वाढत चालले. आपला सांपत्तिक स्तर वाढला की आपण अधिकाधिक कचरा करतो. हे सत्य आहे. मोठ्या शहरात कचरा व्यवस्थापनाची सोय असते. महानगरपालिका हे काम नित्यनेमाने पार पाडत असते. गावात ग्रामपंचायतीच्या आणि नगरात नगरपरिषदेच्या अनेक कामांपैकी घनकचरा नियोजन हेदेखील महत्त्वाचे काम असते. पण आपण या लेखमालेत विचार करणार आहोत ते म्हणजे आपण आपल्या स्वयं पातळीवर काय करू शकतो त्याच! (क्रमश:)