लखनौ : नुकतीच उत्तर प्रदेशात हलाल उत्पादनांवर बंदी आणण्यात आली आहे. त्यानंतर आता योगी सरकारने राज्यातील सर्व विक्रेत्यांना १५ दिवसांच्या आत त्यांच्याकडे असलेल्या उत्पादनांच्या साठ्यातून हलाल उत्पादने काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.
यासोबतच हलाल प्रमाणपत्रासह माल विकणाऱ्या ९२ कंपन्यांनी दुकानांना विकलेला माल परत घेण्यास सांगितले आहे. तसेच नवीन पॅकिंग करुन हा माल विकण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय हलाल उत्पादनांमध्ये भेसळ असण्याची शंका घेत त्याचे काही नमुनेही प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी राज्यभरात आतापर्यंत ९२ छापे टाकून ५०० ठिकाणी तपासणी करण्यात आली आहे. या कालावधीत अंदाजे सात ते आठ लाख रुपये किमतीची हलाल उत्पादने जप्त करण्यात आली आहेत. जप्त केलेल्या मालामध्ये साखर, तेल आणि बेकरीच्या वस्तूंचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. हलाल प्रमाणपत्र वापरून व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्यात येत आहे.