व्ही. के. पंडियन ठरणार नवीनबाबूंचे उत्तराधिकारी ?

27 Nov 2023 18:57:21
Naveen Patnaik's close aide V K Pandian joins BJD
 
नवी दिल्ली : ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे स्वीय सचिव म्हणून दीर्घकाळ कार्यरत असणारे भारतीय प्रशासकीय सेवेतील (भाप्रसे) निवृत्त अधिकारी व्ही. के. पंडियन हे आता नवीनबाबूंचे उत्तराधिकारी होण्यास सज्ज झाल्याची चर्चा आहे.ओडिशामध्ये आपला एकछत्री अंमल दीर्घकाळपासून कायम ठेवणारे बिजू जनता दलाचे सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी आपल्या राजकीय उत्तराधिकाऱ्याचा प्रश्न सोडविल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्याचे कारण म्हणजे निवृत्त भाप्रसे अधिकारी व्ही. के. पंडियन यांनी सोमवारी मुख्यमंत्री पटनायक यांच्या उपस्थितीत केलेला बिजद प्रवेश. यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात पंडियन यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. ते मुख्यमंत्री पटनायक यांचे स्वीय सचिव म्हणून कार्यरत होते.

मात्र, आता त्यांचे नाव ओदिशाचे पुढील मुख्यमंत्री म्हणून पुढे येत आहे.ओडिशाच्या जनतेसाठी व्ही. के. पंडियन गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांनी राज्यातील जनतेकडून सन्मान आणि विश्वास प्राप्त केला आहे. यापुढेदेखील बिजू जनता दलाचे सदस्य म्हणून ते कार्यरत राहतील असा विश्वास वाटत असल्याचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री पटनायक यांच्या महत्त्वाकांशी अशा नवीन ओदिशा प्रकल्पाचे प्रमुखपद त्यांच्याकडे स्वेच्छानिवृत्तीनंतर सोपविण्यात आले होते.

व्ही. के. पंडियन हे भारतीय प्रशासकीय सेवेतील २०० च्या तुकडीचे अधिकारी आहेत. २००२ मध्ये त्यांची ओडिशातील कालाहांडी जिल्ह्यातील धरमगढचे उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली, त्यानंतर २००५ साली मध्ये त्यांची मयूरभंजचे जिल्हा दंडाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर २००७ साली ते गंजमचे जिल्हा दंडाधिकारी झाले. पुढे २०११ साली मुख्यमंत्री कार्यालयात (सीएमओ) नियुक्ती झाल्यानंतर ते १२ वर्षे मुख्यमंत्री पटनायक यांचे स्वीय सचिव म्हणून कार्यरत होते.
 
ते तर ‘सुपरसीएम’ होतेच

ओडिशाच्या प्रशासनातील अतिशय ताकदवान सनदी अधिकारी अशी व्ही. के. पंडियन यांची ओळख होती. सेवानिवृत्तीनंतर मुख्यमंत्री पटनायक यांच्यासाठी त्यांनी ‘५टी’ अर्थात “ट्रान्स्परन्सी, टीमवर्क, टेक्नॉलॉजी, टाईम अँड ट्रान्स्फॉर्मेशन” ची आखणी करून प्रशासनात आमूलाग्र बदलांची योजना आखली होती. त्यांच्याविषयी बोलताना ओदिशामधील एका मराठी भाप्रसे अधिकाऱ्यांने ‘ते तर सुपरसीएम होतेच’ अशी सुचक प्रतिक्रिया दिली आहे.

 
Powered By Sangraha 9.0