उत्तर प्रदेशात बेकायदेशीर लाऊडस्पीकर हटवण्याची मोहिम सुरु; ३५० ठिकाणी कारवाई!

27 Nov 2023 15:17:18
Loudspeakers removed from mosques
 
लखनौ : उत्तर प्रदेश पोलिसांनी धार्मिक स्थळे, मशिदी आणि धार्मिक स्थळांवर लावलेले बेकायदेशीर लाऊडस्पीकर हटवण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत प्रथम राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये अशी ठिकाणे शोधण्यात आली. जेथे मानकांनुसार लाऊडस्पीकर लावलेले नाहीत. आता ते बेकायदा लाऊडस्पीकर काढले जात आहेत. दि.२७ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळपासून सुरू झालेल्या या मोहिमेअंतर्गत आजपर्यंत शेकडो लाऊडस्पीकर एकतर जप्त करण्यात आले आहेत किंवा त्यांचा आवाज कमी करण्यात आला आहे.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ही मोहीम सोमवारी पहाटे ५ वाजता सुरू झाली. याअंतर्गत लखनौ तकिया वली मशिदीसह इतर अनेक भागांत लाऊडस्पीकर खाली आणण्यात आले. यासोबतच कानपूर, हमीरपूरसह इतर जिल्ह्यांमध्ये पोलिसांनी एकतर माईकचा आवाज कमी केला किंवा लाऊडस्पीकर काढून घेतले. या मोहिमेदरम्यान अयोध्या आणि चित्रकूटसारख्या जिल्ह्यांमध्येही मशिदींवर मानकांनुसार लाऊडस्पीकर दिसले नाहीत. चित्रकूटमधील एका मशिदीतून लाऊडस्पीकर काढण्यात आला. या मोहिमेत पोलिसांसह दंडाधिकारी दर्जाचे अधिकारीही उपस्थित होते.

प्रतापगड जिल्ह्यात अवैध ध्वनीक्षेपक लावलेल्या ३५० ठिकाणी कारवाई करण्यात आली. ज्यांनी वारंवार स्पष्टीकरण देऊनही सरकारी आदेशाचे पालन केले नाही,अशा लोकांविरुद्धही एफआयआर दाखल करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.कौशांबी जिल्ह्यात, २०३ ठिकाणे ओळखण्यात आली जिथे लाऊडस्पीकर नियमांविरुद्ध वाजवले जात होते. पोलिसांनी या सर्व ठिकाणांहून ध्वनिक्षेपक हटवले. यातील काही धार्मिक स्थळेही दिसली जिथे वीज कनेक्शन नव्हते. पोलिसांनी वीज विभागाला पत्र लिहून तेथे होणाऱ्या वीजचोरीबाबत माहिती व कारवाईची मागणी केली आहे.
 
फर्रुखाबाद जिल्ह्यात एकूण ४६ ठिकाणी लाऊडस्पीकर मानकांविरुद्ध लावण्यात आले आहेत. यापैकी ३७ ठिकाणी माईकचा आवाज कमी करण्यात आला, तर ९ ठिकाणी लाऊडस्पीकर काढण्यात आले. ललितपूर जिल्ह्यात अनेक मशिदींमध्‍ये लावण्‍यात आलेल्‍या माईकचा आवाज कमी करण्‍यात आला तर ३ ठिकाणी लाउडस्‍पीकर काढण्‍यात आले. कन्नौज जिल्ह्यातील २० मशिदींमध्ये लावलेल्या लाऊडस्पीकरचा आवाज कमी करण्यात आला. फतेहपूर जिल्ह्यात १४ मशिदींमधून माइक काढण्यात आले तर २१ ठिकाणी आवाज कमी करण्यात आला.

याशिवाय औरैया जिल्ह्यात ४ ठिकाणी माईक हटवण्यात आले असून १९ ठिकाणी त्यांचा आवाज कमी करण्यात आला आहे. काही जिल्ह्यांमध्ये पोलिस अधीक्षकांनी मौलाना, इमाम, मौलवी यांच्या बैठका घेतल्या आहेत. यावेळी, त्यांना निर्धारित सरकारी मानकांचे पालन करण्यास सांगितले. या कारवाईदरम्यान अनेक मंदिरे आणि मठांमधील माईकही काढण्यात आले आहेत. या मोहिमेचे दिग्दर्शन उत्तर प्रदेशचे विशेष डीजी प्रशांत कुमार यांनी केले होते. मिळालेल्या माहितीनुसार या मोहिमेत मौलानांचंही सहकार्य लाभलं. आतापर्यंतची मोहीम शांततेत पार पडली आहे.


Powered By Sangraha 9.0