’हमास’ विरुद्ध भुयारी युद्ध जिंकण्यासाठी इस्रायलचे नावीन्यपूर्ण डावपेच

25 Nov 2023 22:11:48
article on Israel-Hamas War
 
’हमास’चे संपूर्ण उच्चाटन करण्याचा निर्धार करून, इस्रायलने गाझापट्टीवर हल्ले सुरू केले. पण, गाझापट्टीच्या जमिनीखाली पसरलेले भुयाराचे जाळे नष्ट होत नाहीत, तोपर्यंत ’हमास’ला संपवता येणार नाही. यासाठी आता विविध तंत्रज्ञान आणि कल्पना वापरून इस्रायली सैन्य ते उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहे.इस्रायल आणि ’हमास’मधील गेल्या 50 दिवसांपासून अधिक काळ सुरु असलेल्या युद्धाला तात्पुरता विराम मिळाला असला तरी हे युद्ध लवकर संपण्याची तशी शक्यता धूसरच. इस्रायली मंत्रिमंडळाने गाझामधील ओलिसांच्या सुटकेसाठी ’हमास’बरोबरच्या युद्धविरामाच्या कराराला मंजुरी दिली आहे. येत्या दिवसांमध्ये ‘हमास’ ओलीस ठेवलेल्या इस्रायली नागरिकांपैकी लहान मुलं आणि त्यांच्या आया मिळून 50 जणांची सुटका करेल. इस्रायली नागरिकांच्या मोबदल्यात 150 ‘हमास’ कैदी इस्रायलला मात्र ‘हमास’कडे सुपुर्द करावे लागतील. पण, ‘हमास’ला वाटते की, हा युद्धविराम अजून जास्त काळ चालेल आणि हे युद्ध कायमचेच थांबेल.

’हमास’ पूर्ण नष्ट होईपर्यंत युद्ध थांबणार नाही!

मात्र, इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांनी स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत ‘हमास’ ही संघटना पूर्णपणे नष्ट होत नाही, सगळ्या ओलिसांना परत आणले जात नाही, तोपर्यंत हे युद्ध थांबणार नाही. याचाच अर्थ हे युद्ध अनेक दिवस चालणार आहे. या युद्धामध्ये सध्या ‘टनेल वॉर’ किंवा ‘भुयारातले युद्ध’ हा एक मोठा आयाम समोर येत आहे. कारण, ’हमास’ची युद्धपद्धती अनेक कारणांमुळे भुयारांवर आधारित आहे. ज्यातून ’हमास’ इस्रायलवर हल्ले करते किंवा रक्षात्मक युद्ध लढते. त्यामुळे इस्रायलला ‘हमास’ला नष्ट करण्याकरिता भुयाराच्या आत जाऊन युद्ध लढण्याशिवाय पर्यायच उरला नाही.’हमास’चे संपूर्ण उच्चाटन करण्याचा निर्धार करून, इस्रायलने गाझापट्टीवर हल्ले सुरू केले. पण, गाझापट्टीच्या जमिनीखाली पसरलेले भुयाराचे जाळे नष्ट होत नाहीत, तोपर्यंत ’हमास’ला संपवता येणार नाही. यासाठी आता विविध तंत्रज्ञान आणि कल्पना वापरून इस्रायली सैन्य ते उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहे.
 
रुग्णालये, शाळा, मशिदीखालीही ’हमास’चे भूमिगत बोगदे
 
इस्रायली संरक्षण दलाने म्हटले की, गाझामधील रुग्णालये, शाळा, मशिदीखाली ‘हमास’चे भूमिगत बोगदे आहे. ‘हमास’चे दहशतवादी कुठे लपतात, रॉकेट्सचा साठा कुठे ठेवला जातो, ‘हमास’चे मुख्यालय कुठे आहे, ते आहेत, तर भुयारात! गाझाखाली जमिनीत ‘हमास’ने भूमिगत शहर तयार केलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ‘हमास’चे दहशतवादी येथे राहत आहेत. या बोगद्यांमधून सहजपणे हत्यारं गाझातील वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवली जातात. ‘हमास’ने इस्रायलवर हल्ला करण्यासाठी नियोजनपूर्वक पद्धतीने हे बोगदे तयार केले आहेत. ‘हमास’ दहशतवाद्यांचं रक्षण करण्यासाठी मशीद, रुग्णालये आणि गाझामधील लाखो लोकांचा ढाल म्हणून वापर करत आहे.

अल शिफा रुग्णालयाचे युद्धभूमीत रुपांतर


गाझा शहरातील अल शिफा रुग्णालय सर्वाधिक मोठे आणि अत्याधुनिक सुविधांनी युक्त असे रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या सहा मजली इमारतीत एकूण 600 ते 900 रुग्णखाटा असून, शेकडो कर्मचारी आहेत. इस्रायल आणि ‘हमास’ यांच्यात युद्ध सुरू झाल्यापासून हे रुग्णालय निर्वासितांचे आश्रयस्थान झाले आहे. तसेच युद्धातील अनेक जखमी पॅलेस्टिनींवर या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.काही दिवसांपासून इस्रायली सैन्याने अल शिफा या रुग्णालयाला वेढा दिलेला आहे. ‘हमास’ दहशतवादी संघटनचे मुख्यालय याच रुग्णालयाखाली आहे . याच रुग्णालयाखालच्या बोगद्यांतून ‘हमास’ आपल्या कारवाया करीत आहे. ‘हमास’ रुग्णालयाच्या इमारतीचा तसेच रुग्ण आणि रुग्णालयातील कर्मचार्‍यांचा ढाल म्हणून वापर केला जात आहे, असे इस्रायल म्हटले आहे.

इस्रायलच्या बंकर बस्टिंग बॉम्बपासून सुरक्षित राहण्यासाठी भुयारं

 
1980च्या दशकात गाझापट्टीच्या जमिनीखाली सर्वप्रथम बोगदे खणण्यात आले. जमिनीखालील भुयार/बोगद्यांमुळेच वेस्ट बँकपेक्षाही ‘हमास’ संघटन गाझामध्ये अधिक शक्तिशाली झाले. एका माणसाला उभे राहून चालता येईल, एवढ्या आकाराची ही इस्रायलच्या बंकर बस्टिंग बॉम्बपासून सुरक्षित राहण्यासाठी भुयारं आहेत. या भुयारांची खोली 40 मीटर खोलवर आहे.या बोगद्यांमध्ये वीज, इंटरनेट आणि टेलिफोन लाईन्सच्या केबल आणि वायरचेही जाळे आहे. ‘हमास’च्या दहशतवाद्यांना यामुळे संपर्काची सर्व व्यवस्था बोगद्यात उपलब्ध होते. ‘हमास’च्या दहशतवाद्यांकडे निरीक्षण आणि शोध उपकरणे आहेत, ज्यामुळे इस्रायली सैनिक कुठे पोहोचले आहेत, हे त्यांना कळू शकते. ज्यामुळे ते दूरवरूनच स्फोटकाच्या साहाय्याने इस्रायली सैनिकांवर हल्ला करू शकतात.

जेव्हा इजिप्तने सीमेपलीकडून होणारी तस्करी रोखण्याचा प्रयत्न केला, तेव्हा 12 किमीच्या इजिप्त-गाझा सीमेवर जवळपास 2 हजार, 500 बोगदे असल्याचे समोर आले. या बोगद्यांमधून रोज 500 टन लोखंड आणि तीन हजार टन सिमेंटची तस्करी केली जात होती. गाझापट्टीची अर्थव्यवस्था सुरळीत चालण्यासाठी आणि गाझामधील लोकांच्या अस्तित्वासाठी या बोगद्याने मोठी जबाबदारी पार पाडली. त्यामुळेच ती बांधण्यासाठी आणि त्यांची देखभाल ठेवण्यासाठी ‘हमास’ने लाखो डॉलर्स खर्च केले आहेत.

रोबोट, स्पंज बॉम्बचा जमिनीखालील भुयारे नष्ट करण्यासाठी वापर

मागच्या दीड महिन्यांपासून इस्रायल गाझापट्टीतून ‘हमास’चे उच्चाटन करण्याच्या प्रयत्नात आहे. यासाठी गाझापट्टीवर सतत बॉम्बवर्षाव केला गेला. त्यानंतर जमिनीवरून हल्ले सुरू झाले. गाझामधील सर्वात मोठ्या अल-शिफा रुग्णालयावरही इस्रायलने हल्ला चढविला असून, या रुग्णालयात ‘हमास’चा तळ असल्याचा आरोप इस्रायलने केला आहे. इस्रायल संरक्षण दलाने गाझा पट्टीतील जमिनीखाली मोठ्या प्रमाणात असलेले भुयाराचे जाळेही उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केली आहे.भुयारांचे जाळे वापरून ‘हमास’चे दहशतवादी लपून राहत होते. या भुयारात ‘हमास’ने शस्त्र, अन्न आणि इंधनाचा साठा करून ठेवला आहे. इस्रायलच्या बॉम्ब हल्ल्यापासून संरक्षण देणे आणि इस्रायली सैनिकांवर अचानक हल्ला करण्यासाठीही भुयारांचा वापर होत होता. दि. 17 नोव्हेंबर इस्रायली सैन्याने अल-शिफा रुग्णालयाच्या इमारतीखाली भुयार सापडल्याचा एक व्हिडीओ ’एक्स’ सोशल मीडिया साईटवर पोस्ट केला.

जमिनीखालील भुयार शोधण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर

‘हमास’ने जमिनीखाली तयार केलेली भुयारे शोधण्यासाठी इस्रायलने तंत्रज्ञान वापरले आहे. गाझामध्ये इस्रायलकडून देखरेख करणार्‍या ड्रोन्सचा वापर होत आहे. तसेच जीवंत प्राणी भुयाराच्या आतमध्ये सोडून दुसर्‍या बाजूला भुयाराचे प्रवेशद्वार कुठे आहे, हे शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. उपग्रहाचा वापर करून जमिनीखालील भुयाराचे जाळे शोधण्याचाही प्रयत्न इस्रायल करत आहे. शिवाय इस्रायल जमिनीला भेदणार्‍या रडारचाही वापर करत आहे. यामुळे जमिनीखाली भुयार आहे की नाही, याचा शोध घेतो येतो.

नष्ट करण्याचे इस्रायलचे डावपेच

जमिनीखालील भुयार शोधणे, ते शोधल्यानंतर त्याचा माग काढून ते सर्व नष्ट करण्याचेही आव्हानात्मक आहे. जमिनीखाली लांबवर पसरलेल्या भुयाराचा नकाशा तयार करण्यासाठी आणि ते उद्ध्वस्त करण्यासाठी इस्रायली सैन्यांकडून हल्ल्यासाठी आक्रमक कुत्रे, मानवरहित वाहन आणि रोबोट्सचा वापर सुरू आहे. ‘हमास’ने या भुयारांमध्ये सापळे रचून ठेवल्याची शंका असल्यामुळे इस्रायलने आपल्या सैन्यांना आतमध्ये उतरविणे टाळले आहे.भुयारात सैनिकांना उतरविण्याखेरीज इस्रायली सैन्याकडून अनेक नावीन्यपूर्ण आणि कल्पक पद्धती राबविल्या जात आहेत.

भुयारांचे प्रवेशद्वार बंद करून त्यांना नष्ट केले जात आहे. यासाठी स्फोटक द्रव्यपदार्थांचा (exploding gel) वापर केला जात आहे.इस्रायली सैन्यांनी भुयारामधून ’हमास’च्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी ‘स्पंज बॉम्ब’चा वापरही केला आहे. ‘स्पंज बॉम्ब’ ही रासायनिक प्रक्रिया असून, दोन रसायने एकत्र केल्यामुळे त्यातून मोठ्या प्रमाणात जाड असा फेस तयार होतो. हा फेस वेगाने इतरत्र पसरतो. हा फेस बॉम्बस्फोटासारखा नसला तरी त्यामुळे मोकळी जागा वेगाने व्यापली जाते. ज्यामुळे भुयारात लपलेल्या दहशतवाद्यांना ते स्थान सोडून इतरत्र पळावे लागेल. भुयाराच्या दुसर्‍या प्रवेशद्वारातून बाहेर पडत असताना, इस्रायलचे सैनिक त्यांचा वेध घेऊ शकतात.

इस्रायली सैन्याने दिलेल्या माहितीनुसार, भुयारामध्ये उतरण्यासाठी असलेले 130 बीळ (shafts) नष्ट करण्यात आले आहेत.भुयारी युद्धापासून भारतीय सुरक्षा दले काय शिकू शकतात?पाकिस्तानदेखील अशाचप्रकारे भुयारांचा वापर करून आंतरराष्ट्रीय सीमेवरून अफू, गांजा, चरस, तस्करी करत असतो. त्यांना थांबवण्यामध्ये ’बॉर्डर सिक्युरिटी फोर्स’ला फारसे यश आलेले नाही. शत्रू चीन लडाखमध्ये भुयारे बांधत असल्याचाही अहवाल आहे, यावर लक्ष ठेवून डावपेच तयार करावे लागतील. देशाचे शत्रू नेहमीच नवीन युद्धाचे डावपेच वापरून युद्ध जिंकण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ते कुठले डावपेच येणार्‍या काळात वापरू शकतील, याचे विश्लेषण वेळोवेळी करून, त्या विरुद्ध आपल्याला नेमके काय करता येईल, यावर सतत संशोधन जरुरी आहे. भुयारातून युद्ध करणार्‍या ‘हमास’ दहशतवाद्यांना नष्ट करण्याकरिता इस्रायलचा तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण डावपेचांचा अभ्यास केला जावा.





Powered By Sangraha 9.0