नवी दिल्ली : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांची टेस्ला कंपनी भारतात आपला कारखाना उभा करण्यास तयार झाली आहे. यासाठी टेस्लाने आपली योजना केंद्र सरकारला सादर केली आहे. कंपनीने भारतात गुंतवणूक करण्याच्याआधी केंद्र सरकारसमोर काही सवलतींची मागणी केली आहे.
टेस्लाने सरकारकडे भारतात पहिल्या दोन वर्षांच्या ऑपरेशन दरम्यान आयात केलेल्या वाहनांवर १५ टक्के सूट देण्याची विनंती केली आहे. अमेरिकन इलेक्ट्रिक कार निर्माता टेस्ला स्थानिक कारखाना उभारण्यासाठी २ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्यास तयार आहे. यासाठी कंपनीने सरकारला सविस्तर योजना सादर केली आहे.
सरकारकडून या योजनेचे मूल्यांकन केले जात आहे. अवजड उद्योग मंत्रालय आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली वित्त मंत्रालय या प्रस्तावाचे संयुक्तपणे मूल्यांकन करत आहे. टेस्लाच्या या प्रस्तावावर अद्याप सरकारकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
भारत सरकारने सुद्धा टेस्ला समोर बँक हमी देण्याची अट ठेवली आहे. टेस्लाने भारतात आपला कारखाना उभा केला नाहीतर सरकारचे आयात शुल्काचे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी ही अट ठेवण्यात आली आहे. जेणेकरुन हे नुकसान सरकारला भरुन काढता येईल. सरकारच्या या अटीवर टेस्लाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी टेस्लाच्या पदाधिकारांची भेट घेतली होती. याचवेळी झालेल्या बैठकीत या प्रस्तावाविषयी चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.