अखेर कोविडच्या ४,१५० कोटींच्या खर्चाची आकडेवारी तपशीलवार जाहीर

24 Nov 2023 21:09:42
covid news
 
मुंबई : मुंबई महानगरपालिकेतर्फे कोविडच्या चार हजार १५० कोटी रुपयांच्या खर्चाची आकडेवारी अखेर तपशीलवार जाहीर झाली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना स्वतः मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी दिली आहे. सर्वाधिक खर्च हा जम्बो सुविधा केंद्रावर १,४६६.१३ कोटी खर्च करण्यात आला आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी महापालिका आयुक्त कार्यालयात अर्ज करत कोविड काळात करण्यात आलेल्या चार हजार कोटी रुपयांच्या खर्चाबाबत सादर अहवालाची प्रत मागितली होती. कोणत्याही विभागाने माहिती दिली नाही. याबाबत लेखी तक्रार करताच पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी अनिल गलगली याना तीन पानाची तपशीलवार माहिती दिली. ही आकडेवारी दि. ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंतची आहे.

यात अन्नाची पाकिटे आणि अन्नधान्य यावर १२३.८८ कोटी, मध्यवर्ती खरेदी विभागाने २६३.७७ कोटी, वाहतुक विभागाने १२०.६३ कोटी, यांत्रिक आणि विद्युत विभागाने ३७६.७१ कोटी, घन आणि कचरा विभागाकडून ६.८५ कोटी खर्च करण्यात आले आहेत. लोकप्रतिनिधी यांनी फक्त नऊ लाख रूपयांचा निधी दिला आहे.

जम्बो सुविधा केंद्रावर सर्वांधिक खर्च

मुंबईतील १३ जम्बो सुविधा केंद्रावर १,४६६.१३ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. यानंतर मुंबईतील २४ वॉर्ड आणि सेव्हन हिल रुग्णालयाने १,२४५.२५ कोटी रुपये खर्च केला आहे. कार्यकारी आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयाने २३३.१० कोटी खर्च केले आहे. मुंबईतील पाच प्रमुख रुग्णालयाने १९७.०७ कोटी, सहा विशेष रुग्णालयाने २५.२३ कोटी, १७ पेरिफेरल रुग्णालयाने ८९.७० कोटी आणि नायर रुग्णालयाने १.४८ कोटी रुपये खर्च केले आहेत.
 
ही आकडेवारी जरी स्पष्ट असली तरी, कोविड काळातील सर्व प्रकारच्या खर्चावर श्वेतपत्रिका काढली जाणे आवश्यक आहे जेणेकरून अजून सुस्पष्टता येईल.- अनिल गलगली, आरटीआय कार्यकर्ते



Powered By Sangraha 9.0