पुणे : खेड, जुन्नरमध्ये सर्वाधिक कुणबी नोंदी सापडल्या आहेत. या नोंदी शोधण्यासाठी आतापर्यंत १३ प्रकारच्या दस्तांमधून सुमारे २४ लाख नोंदी तपासण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. तर, पुणे व पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मिळून एक लाख ४० हजार कुणबी नोंदी सापडल्या आहेत. सरसकट कुणबी नोंदी पडताळणी सुरू करण्यापूर्वीच्या दहा महिन्यांच्या कालावधीत पुणे जिल्ह्यात १२ हजार २५४ कुणबी मराठा नोंदी आढळून आल्या होत्या.
पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सर्व तालुक्यांत तालुकास्तरीय कागदपत्रे पडताळणीसाठी समित्या स्थापन केल्या आहेत. समित्यांकडून कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. पडताळणीत सन १९६७ पूर्वीच्या नोंदी पडताळण्यात येत आहेत. जिल्ह्यातील तेरापैकी जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर, हवेली आणि मावळ या सहा तालुक्यांत नोंदी सापडत आहेत.