मुंबई : ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली आहे. एकनाथ खडसेंना त्यांच्या तब्येतीची काळजी घेण्याचा त्यांनी सल्ला दिला आहे. तसेच त्यांनी आजारपणाचे नाटक केले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न चर्चेत आहेत. यावरून एकनाथ खडसे यांनी मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी संकटमोचक गिरीश महाजन यांनी पुढाकार घ्यावा, असे वक्तव्य केले होते. यावर आता गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
गिरीश महाजन म्हणाले की, "खडसेंना म्हणावं तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. सगळे प्रश्न आपोआप सुटतील. एकीकडे सोंग करायचं आणि काही झालेलं नसताना दवाखान्यात जाऊन बसायचं. गौण खनिज प्रकरणी १३७ कोटी रुपयांची नोटीस आल्यावर मुख्यमंत्र्यांना फोन करून माझी तब्येत खराब आहे म्हणत विमान मागवायचं."
"कशाची तब्येत खराब आहे. कुठला अटॅक त्यांना आला आहे. नोटीस आल्यावर कोर्टाकडून सहानुभूती मिळवण्यासाठी त्यांनी हे नाटक केलेलं आहे. आमचं सरकार, आमचे नेते सगळं सांभाळायला समर्थ आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या तब्येतीची चांगली काळजी घ्या," असेही गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.