डुकराचा बळी दिल्याने दोन गटांत वाद! मुस्लिम समाजाचा गंभीर आरोप, म्हणाले...
21 Nov 2023 19:17:37
रांची : झारखंडमधील गोमिया येथे दलित समाजाच्या पारंपारिक कार्यक्रमादरम्यान दोन गटांमध्ये वाद झाल्याची घटना समोर आली आहे. मुस्लिम समाजाने आक्षेप घेतल्यामुळे हा वाद निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात तणावपुर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवार १९ नोव्हेंबर रोजी ही घटना घडली आहे. येथे रविवारी रविदास समाजाच्या लोकांनी पारंपरिक पद्धतीने पुजा करत डुकराचा बळी दिला. त्यानंतर तेथील लोक डुकराचे मांस आपल्या सोबत घेऊन गेले. दरम्यान, या लोकांनी मांसाचे इकडे-तिकडे विखुरल्याचा आरोप मुस्लीम समाजाकडून करण्यात आला आहे.
यातील काही तुकडे मुस्लिम लोकांच्या वस्तीत सापडल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ही घटना सर्वत्र पसरताच मुस्लिम समाजातील लोक घराबाहेर पडले. त्यानंतर रविदास समाजातील लोक आणि मुस्लिम समुदायामध्ये तणावपुर्ण परिस्थिती निर्माण झाली.
याप्रकरणाची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि दोन्ही गटांना शांत करण्याचा प्रयत्न केला. रविदास समाजातील लोकांनी सांगितल्यानुसार, त्यांचा हा सण ७ वर्षांतून एकदा येतो आणि यामध्ये ते परंपरेनुसार डुकराचा बळी देतात. भात कापणीपूर्वी ते आपल्या देवतेला प्रसन्न करण्यासाठी हा बळी देतात.