२०२४ मध्ये भारतीय शेयर बाजार धावणार सुसाट; गोल्डमन सॅक्स आणि मॉर्गन स्टॅन्लेने व्यक्त केला अंदाज

    21-Nov-2023
Total Views |
 BSE
 
मुंबई : जागतिक पातळीवर मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये उलथापालथ सुरु असताना, भारतीय शेयर बाजार मात्र नवे उच्चांक गाठत आहे. भारतीय शेयर बाजार भविष्यकाळातही अशीच कामगिरी करत राहिल, असा अंदाज जगभरातील वित्तीय संस्थांनी व्यक्त केला आहे. कॅलेंडर वर्ष २०२४ मध्ये देशांतर्गत शेअर बाजारातील वाढीबद्दल बहुतांश परदेशी ब्रोकरेज कंपन्या आशावादी आहेत.
 
जागतिक भू-राजकीय घडामोडी, कच्च्या तेलाच्या किमती आणि या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती बँकेने उचललेली पावले यामुळे शेयर बाजारात चढ-उतार चालू राहील. पण शेवटी भारतीय शेयर बाजार नवा उच्चांक गाठेल, असा अंदाज आहे. गोल्डमन सॅक्स या संस्थेने निफ्टी निर्देशांकात २०२४ या कॅलेंडर वर्षात ११ टक्क्यांची वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. २०२४ मध्ये देशात सार्वत्रिक निवडणूका सुद्धा आहेत. त्याचाही परिणाम शेयर बाजारावर होईल, असा दावा गोल्डमन सॅक्सने केला आहे. निवडणूका झाल्यानंतर गुंतवणूकीमध्ये पुन्हा वाढ होईल, असा अंदाजही गोल्डमन सॅक्सने व्यक्त केला आहे.
 
गोल्डमन सॅक्सने सांगितले की, "भारतीय कॉर्पोरेट क्षेत्राचा नफा २०१४ मध्ये १५ टक्के आणि २०२५ मध्ये १४ टक्क्यांनी वाढू शकतो, ही वाढ जवळपास सर्वच क्षेत्रात दिसून येईल." या वर्षी आतापर्यंत बीएसई सेन्सेक्स ८ टक्क्यांनी वाढला आहे आणि निफ्टी ५० मध्ये सुमारे ९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे मिडकॅपमध्ये ३२ टक्के आणि स्मॉलकॅपमध्ये ३७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
 
गोल्डमन सॅक्स बरोबरच मॉर्गन स्टॅन्ले सुद्धा भारतीय शेयर बाजाराविषयी आशावादी आहे. मॉर्गन स्टॅन्लेने म्हटले आहे की, "भारतीय शेयर बाजाराने मागच्या काही काळात जागतिक आव्हानांचा सामना करत चांगली कामगिरी केली आहे." मॉर्गन स्टॅन्लेच्या अंदाजानुसार २०२४ मध्ये बीएसई सेन्सेक्स ८६ हजाराचा टप्पा गाठण्याची शक्यता ३० टक्के आहे. तर साधारण परिस्थितीत बीएसई सेन्सेक्स ७४ हजारांचा टप्पा गाठू शकते. बीएसई सेन्सेक्सची कमाई आर्थिक वर्ष २०२३ ते आर्थिक वर्ष २०२६ पर्यंत वार्षिक २१.५ टक्के चक्रवाढ दराने वाढण्याची अपेक्षा आहे.