प.पू धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणजेच बागेश्वर धाम सरकार यांच्या श्रीराम व श्री हनुमान कथेचा कार्यक्रम नुकताच संभाजीनगर येथे संपन्न झाला. कार्यक्रम भारत सरकारचे केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी आयोजित केला असला तरी या कार्यक्रमाच्या आयोजनात आणि सहभागितेमध्ये सकल हिंदू जनजागरण समिती आघाडीवर होती. समरसतेचा मंत्र जागृत करणार्या आणि अनुभव देणार्या या कार्यकमाचा समरस भाव इथे मांडला आहे.
प.पू धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणजेच बागेश्वर धाम सरकार यांच्या श्रीराम व श्री हनुमान कथेचा कार्यक्रम नुकताच संभाजीनगर येथे संपन्न झाला. या आयोजनाचे मुख्य कारण म्हणजे नुकतेच या शहराला शेकडो वर्षांच्या गुलामीच्या प्रतीकाचे नाव सोडून प्रखर धर्माभिमानी छत्रपती संभाजी नगर असे नाव मिळाले होते, पण त्यासोबतच यावर्षी छत्रपती शिवरायांचा ३५०वा राज्यारोहण व मराठवाड्याच्या मुक्तिसंग्रामाला ७५ वर्षे पूर्ण होणे, अशीही सबळ कारणे होती.
या सर्वच गोष्टींचे औचित्य साधत बागेश्वर धाम यांनी या कार्यक्रमाला येण्याची अनुमती दिली होती. कार्यक्रमाची सुरुवात माता भगिनींच्या भव्य कलश यात्रेने झाली. ही संपूर्ण यात्रा संभाजीनगर शहरातील फिरून अयोध्या नगरी मैदानावर म्हणजे कथेच्या स्थानवर पोहोचली.कथास्थानी जवळजवळ १०० मीटर लांबीचे पाच भव्य मंडप उभारले गेलेले होते, खरतर जमलेल्या भक्तांसाठी तेही अपुरे पडत होते. येथे जमलेल्या सर्वांना महाराजांच्या मुखातून कथा ऐकायची होतीच, पण त्यासोबत दुसर्या दिवशी भरणारा भव्य दरबार म्हणजेच चिठ्ठीद्वारे व्यक्तिगत प्रश्नांची सोडवणूक हेदेखील सर्वांच्या चर्चेचे मुख्य आकर्षण होते. कथास्थानी भव्य व्यासपीठ, जीवंत राम दरबार, संत व प्रमुख मान्यवरांना बसण्याच्या स्वतंत्र दर्जेदार व्यवस्था, अबाल वृद्ध, महिला व पुरुष सर्वांची काळजी घेणारा भव्य सभा मंडप एकूणच डोळे दिपवून टाकणार सगळं वातावरण होतं.
ठरल्याप्रमाणे सोमवार, दि. ६ नोव्हेंबर रोजी कलश यात्रेनंतर दुपारी ठीक ३ वाजता कथा सोहळा प्रारंभाच्या वेळी वेद शाळेतील विद्यार्थ्यांनी वेदमंत्रांनी कथेच्या सुरुवातीस आरती केली होती.त्यानंतर धीरेंद्र शास्त्री महाराजांनी बजरंग बलीच्या हनुमान चालीसामधील एक दोहा उलगडला तसे वातावरण अधिकाधिक प्रफुल्लित व टवटवीत होऊ लागले. मध्येमध्ये विविध भजन व भजनांच्या वेळी लोकांचा टाळ्या वाजवणे व सोबत नाचत उत्स्फूर्त प्रतिसाद या सगळ्यामुळे वातावरण राममय झालेले होते. या संपूर्ण भक्तीमय वातावरणाचा शेवट म्हणजे बजरंग बलीची शेवटची आरती होती. कथेच्या नियोजनाप्रमाणे धीरेंद्र शास्त्रींनी अगदी सुरुवातीस एक आरती दलित वंचित मागास स्वच्छता कर्मी अशा सेवाकाम करणार्या माता भगिनी बांधवांच्या हातून व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केलेली होती.
या अपेक्षेनुसार, शहरात अशा पद्धतीचे कार्य करणार्या अनुसूचित जातींमध्ये विविध समाज घटकांच्या प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले, यामध्ये मुख्यतः वाल्मिकी, मातंग, चर्मकार व बौद्ध इत्यादी समाजाचे प्रतिनिधी होते. विशेष म्हणजे हे सर्वजण कुटुंबीयांसह व्यासपीठावर बोलावले गेले, सन्मानपूर्वक या सर्वांच्या हातात दिव्यांसहित ताट व्यासपीठावरील अन्य पंडितांच्या हातून देण्यात आली व आरतीला सुरुवात झाली. दलित वंचित मागासांचे प्रतिनिधित्व करणारा घटक प्रत्यक्ष आरती करतो आहे आणि लाखोंचा जनसमुदाय या आरतीला तल्लीन होऊन टाळ्या वाजवत, नाचत, उड्या मारत प्रतिसाद करत आहे हे वातावरण सर्वांचे डोळे पाणवणारे होते. आरती पूर्ण होताच व्यासपीठावरील सर्व निमंत्रितांचा महाराजांशी परिचय करून देण्यात आला. महाराजांनी सर्वांचा यथोचित सन्मान केला.
वाल्मिकी समाजाच्या एका बांधवाने भगवान वाल्मिकींची एक प्रतिमा महाराजांना भेट देण्यासाठी आणली होती, ही प्रतिमा पाहताच महाराजांना अत्यंत आनंद झाला होता, त्यांनी भेट स्वरूपात आलेली ती प्रतिमा स्वीकारली व या वाल्मिकी बांधवाला कडकडून मिठी मारली व बोलताना त्यांना म्हणाले, “भगवान वाल्मिकींनी रामायण लिहिले त्यांच्याशिवाय राम जगाला समजू शकले नसते, त्यामुळे त्यांच्या जगावर खूप उपकार आहेत. सोबतच हा वाल्मिकी समाज संपूर्ण ब्रह्मांडाची सेवा करणारा समाज आहे. त्यामुळे या समाजाला थेट स्वर्गात स्थान आहे. तरीदेखीलमाझ्यावतीने मी बजरंगबलीकडे प्रार्थना करीन की या संपूर्ण समाजाचे कल्याण कर जो हिंदुत्वाचा खर्या अर्थाने रक्षक आहे. एकूणच ही मिठी जणू राम केवटाच्या किंवा कृष्ण सुदामाच्या भेटीची आठवण करून देत होती. रामकथेला उपस्थित सर्वांनी या घटनेची नोंद घेतली व कडाडणार्या टाळ्यांच्या गजरात त्याला भरभरून प्रतिसाद दिला.
” एका अर्थाने जमलेल्या प्रत्येक हिंदूला धर्माच्या वास्तविक आचरणाची जाणीवच महाराजांनी स्वतःच्या कृतीतून करून दिली. महाराजांनी दीपावलीच्या पूर्व सप्ताहात दिलेला हा संदेश समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारा होता व त्याचा परिणाम उपस्थित हिंदू समाजाच्या व्यवहारांवर झाल्या खेरीज राहणार नाही हे मात्र तिथे जमलेल्या प्रत्येकाला मनोमन जाणवत होतं.एकूणच या आरतीच्या यशस्वीतेसाठी सामाजिक समरसता मंचाचे कार्यकर्ते प्रयत्नरत होते, प्रत्यक्ष आरतीच्या वेळेस व्यासपीठावर शहराचे संघचालक कन्हैयालाल शहा, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवतराव कराड, मकरंद चांदोडकर, नयन वाघचौरे आणि मी उपस्थित होतो. माझ्यासाठी हा आयुष्यातला समरस अविस्मरणीय प्रसंग आहे.