चीन : मसीहा नव्हे मारेकरी!

    21-Nov-2023
Total Views |
China Diplomacy on Israel-Hamas War

'इस्रायल-’हमास’ युद्धाला महिन्याहून अधिकचा कालावधी लोटला. पण, दोन्ही पक्षांनी माघार घेण्यास नकार दिला. अमेरिकेच्या नेतृत्वात पाश्चिमात्य देशांनी इस्रायला पाठिंबा दिला, तर धर्माच्या नावाखाली जगभरातील मुस्लीम देशांनी ’हमास’च्या कारवाईचे समर्थन केले. जगभरातील मुस्लीम देश युद्धविरामासाठी इस्रायलवर दबाव टाकत आहेत. पण, त्यांच्या दबावाला भीक न घालता, इस्रायलने आपली कारवाई सुरूच ठेवली.

एकीकडे गाझामधील जीवितहानीमुळे मुस्लीम देशांमध्ये अमेरिका आणि इस्रायलविषयीच्या द्वेषाला खतपाणीच घातले गेले. मग काय, या या परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी चीन पुढे आला आहे. चीनने इस्रायल-’हमास’ युद्धावर तोडगा काढण्यासाठी मुस्लीम देशांना आमंत्रित केले. आपल्याच देशात उघूर मुस्लिमांचा नरसंहार करणार्‍या चीनने मात्र आपला जागतिक प्रभाव वाढवण्यासाठी गाझाचा संघर्ष मिटवण्याचा केलेला हा एक केविलवाणा प्रयत्न. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, मुस्लीम देशांनीसुद्धा चीनचे हे आमंत्रण स्वीकारले. त्यामुळे या इस्लामी देशांचेच बेगडी मुस्लीम प्रेमसुद्धा यानिमित्ताने पुन्हा एकदा जगजाहीर झाले आहे.

यापूर्वीही इस्रायल-‘हमास’ युद्धावर चर्चा करण्यासाठी जगभरातील मुस्लीम देशांना सौदी अरबने आपल्या देशात आमंत्रित केले. या बैठकीत इस्रायलविरुद्ध कठोर भूमिका घेतली जाईल, असा अंदाज बांधला जात होता. पण, या बैठकीत मुस्लीम ‘उम्मा’ची एकता किती पाण्यात आहे, हे संपूर्ण जगाने पाहिले. या बैठकीत इस्रायलचा एकमुखाने निषेध करण्यात आला. पण, इस्रायलवर कोणती कारवाई करावी, याबाबत एकमत झाले नाही. या बैठकीत इराणने एक ठराव आणला होता. या ठरावात इस्रायलशी सर्व मुस्लीम देशांशी असलेले राजनैतिक आणि आर्थिक संबंध तोडले जावेत आणि हवाई मार्गावरही बंदी घालावी, अशी मागणी करण्यात आली. परंतु, सौदी अरब, युएई, बहारीन, सुदान, मोरोक्को, मॉरिटानिया, जिबुती, जॉर्डन आणि इजिप्त या देशांनी मागण्या फेटाळल्या आणि ठराव मंजूर होऊ शकला नाही.

दुसरीकडे गाझाला लागून असलेल्या इजिप्तने आपल्या देशात कोणताही पॅलेस्टिनी घुसू नये, म्हणून सीमेवर दक्षता वाढवली. युद्ध सुरू झाल्यापासून दोन लाखांहून अधिक पॅलेस्टिनींनी गाझा पट्टी सोडली आहे. परंतु, मुस्लीमबहुल इजिप्तमध्ये त्यांच्याबद्दल नुसती तोंडदेखली सहानुभूती. एकूणच काय तर या युद्धाने हे स्पष्ट केले की, मुस्लीम देशांसाठी पॅलेस्टिनींच्या स्वातंत्र्यापेक्षा त्यांचे स्वतःचे आर्थिक हित मोठे.
 
सौदीमध्ये झालेली बैठक फोल ठरल्यानंतर गाझामध्ये सुरू असलेल्या संघर्षावर तोडगा काढण्यासाठी जगभरातील मुस्लीम देशांचे प्रतिनिधी सोमवारी चीनला पोहोचले. या बैठकीतून चीन मुस्लीम देशांमध्ये आणि पश्चिम आशियातील आपला प्रभाव जगाला दाखवून देण्यास उत्सुक आहे. पैशाच्या जोरावर चीनने पाकिस्तान आणि आफ्रिकेतील काही देशांना आपलं मांडलिकत्व स्वीकारायला भाग पाडले आहे. त्याचबरोबर अरब देशसुद्धा चीनमधील उघूर मुस्लिमांवरील होणार्‍या अत्याचारांवर एक शब्दही काढत नाहीत. याउलट ज्या पाश्चिमात्य देशांना ते मुस्लीमविरोधी म्हणत आहेत, त्यांच्याचमुळे चीनच्या या काळ्या करतुती जगासमोर आल्या आहेत. अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि नेदरलॅण्डसह अनेक देशांनी चीनवर पुराव्यांसह उघूर मुस्लिमांच्या नरसंहारांचा आरोप केला आहे.

उघूरांना शिबिरांमध्ये ठेवण्याबरोबरच चीन समूहाच्या सांस्कृतिक परंपरा मोडण्याचा प्रयत्न करण्यासाठी महिलांची जबरदस्तीने नसबंदी करतो. १२ लाख उघूर नागरिक आजही चिनी तुरुंगात खितपत पडले आहेत. पण, कोणताही मुस्लीम देश त्यावर बोलायला तयार नाही. त्याचबरोबर जगभरात मुस्लिमांचे प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणारी ’ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’ ही संस्था भारताच्या विरोधात काश्मीरविषयी सतत गरळ ओकत असते. पण, उघूरांवर होणार्‍या अत्याचाराविरुद्ध ही संघटना अवाक्षरही उच्चारत नाही. याउलट हे सगळेच उघूर मुस्लिमांना वार्‍यावर सोडून चीनसोबत व्यापार करत आहेत.

पण, जागतिक राजकारणात असे एकही उदाहरण सापडत नाही, ज्यामध्ये चीनने मध्यस्ती करून दोन देशांमध्ये शांतता प्रस्थापित केली. खरं तर, चीनला पॅलेस्टाईन आणि इस्रायलचे युद्ध थांबवण्यात मुळीच काहीच रस नाही. फक्त अमेरिकेला डिवचण्यासाठी आणि जगाला आपली ताकद दाखवण्यासाठीच चीनचा हा सगळा खटाटोप!

श्रेयश खरात 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.