आली दिवाळी :फिटे अंधाराचे जाळे

21 Nov 2023 21:26:06
Article on Swayam Mahila Mandal Initiative

स्वयंम महिला मंडळाने वैष्णवी महिला मंडळाच्या सहकार्याने नुकतेच मुंबईतील विक्रोळी येथे किन्नर भगिनींसोबत दिवाळी संमेलन आयोजित केले होते. रा.स्व.संघ कोकण प्रांत कार्यवाह विठ्ठल कांबळे यांच्या मार्गदर्शनाने गेले चार वर्षे स्वयंम महिला मंडळ किन्नर भगिनींसाठी दिवाळी संमेलनाचे आयोजन करत असते. संमेलनासाठी सुरेश गंगादयाल यादव हे सुरुवातीपासूनच सहकार्य करतात. यावर्षी व्यावसायिक अजित सांडू यांनीही सहकार्य केले. दिवाळी संमेलनाच्या निमित्ताने घेतलेला समाजवास्तवाचा मागोवा!

लहानपणी घरी दिवाळी साजरी व्हायची. मम्मीपप्पांसोबत मीपण दिवाळीसाजरी करायचो. पण जेव्हा मी मुलगाही नाही आणि मुलगीही नाही हे सत्य घरातल्यांना कळाले तेव्हा आई सोडून सगळ्यांनीच तिरस्कार केला. यात माझी काय चूक? तेव्हापासून आयुष्यातले सण-उत्सव सगळे संपले. सगळा अंधारच झाला. देवाने मला जन्माला का घातले मी मरायला हवे हा विचार माझ्या मनात २४ तास यायचा. मला पण कोणी सन्मानाने बोलवून माझ्यासोबत दिवाळीसाजरी करेल, मला भेटवस्तू देईल...” बोलता बोलता त्या किन्नर भगिनीचा कंठ दाटून आला. स्वयंम महिला मंडळ आणि वैष्णवी महिला मंडळाने किन्नर भगिनींसोबत दिवाळी साजरी केली, त्यावेळी ही भगिनी बोलत होती. यावेळी मंचावर व्यावसायिक अजित सांडू, त्यांची कन्या ममता सांडू, ज्येष्ठ स्वयंसेवक रमेश ओवळेकर, वैष्णवी महिला मंडळ अध्यक्ष मंजू यादव तसेच किन्नर मा कामिनी घोडके आणि किन्नर प्रतिनिधी वैष्णवी उपस्थित होते. रा.स्व.संघ कोकण प्रांत कार्यवाह विठ्ठल कांबळे यांच्या मार्गदर्शनाने गेले चार वर्षे स्वयंम महिला मंडळ किन्नर भगिनींसाठी दिवाळी संमेलनाचे आयोजन करत असते. यंदाही संमेलन आयोजित केले होते. सुरुवातीला या भगिनींच्या हस्ते माता लक्ष्मी आणि गणेशाचे पूजन करण्यात आले. या संमेलनात ही किन्नर भगिनी आपल्या मनातल्या भावना व्यक्त करत होती. तिचा दाटून आलेला कंठ तिच्या डोळ्यातले अश्रू आणि समोर बसलेल्या किन्नर भगिनींच्या ओलावलेल्या डोळ्यांच्या कडा पाहून वाटले केवळ दिवाळी संमेलनाच्या निमित्ताने या भगिनींना भेटून केवळ एक ‘इव्हेंट सेलिब्रेशन’करणे चूकच आहे. सातत्याने या भगिनींच्या संपर्कात राहायला हवे.

अर्थात, स्वयंम महिला मंडळाच्या माध्यमातून आपण या भगिनींच्या संपर्कात असतोच. पण या भगिनींचे वास्तव समाजाने पूर्णतः स्वीकारले नसल्याने आणि किन्नरांनीही आपल्या अस्त्विाबाबत न्यूनगंड, भय, अविश्वास असल्याने त्यांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत आहे. मनात विचार येत असतानाच दुसरी किन्नर भगिनी भेटवस्तू स्वीकारताना मनोगत व्यक्त करत म्हणाली,

“चार सुशिक्षित माणसांमध्ये आम्हाला बोलावले जाईल, आमचे सत्य स्वीकारून आमची प्रेमाने विचारपूस केली जाईल, दिवाळी सण आमच्यासोबत साजरा केला जाईल, हे मला कधीच खरं वाटलं नव्हतं. वाटायचं आपली कसली आली दिवाळी? माझ्या किन्नरपणावरून नेहमीच आम्हाला विनाकारण शिवीगाळ, हेटाळणी सहन करावी लागते. मी माझ्या गुरूमाला विचारले गुरू माँ मी अशी जन्मले यात माझा काय दोष? माझ्या हातात असते, तर मी स्त्री किंवा पुरुष म्हणून जन्माला आलो असतो ना? तेव्हा गुरू माँ म्हणाल्या, आपण देवाची लेकरं आहोत. रडू नकोस, जे आहे ते स्वीकार करून जगायला शिक. आपण माणूस आहोत, हेच लक्षात ठेवून आपला मानसन्मान, सुरक्षा आपणच सांभाळायला हवा. तेव्हापासून मी स्वतःला स्वीकारले.” ती बोलली आणि सगळ्यांनी टाळ्याचा कडकडाट केला.

तिला जगण्याचा मार्ग दाखवणारी किन्नर माँ म्हणजे कामिनी घोडके. कामिनी यांना कोरोना काळापासून ओळखते. ठाणे फायर ब्रिगेड वस्तीमध्येही कोरोनाने हाहाकार उडाला होता. तिथे कामिनी त्यांच्या आईबाबासमवेत राहतात. किन्नर आहोत म्हणून सिग्नलवर उभे राहून भीक मागायची किंवा अन्य कृत्य करायचे याला कामिनीचा विरोध. आपण चांगल्या इज्जतदार घरचे आहोत, आपला स्वाभिमान इज्जत सांभाळून जगायचे हा त्यांचा ठाम निर्धार. त्यानुसार कामिनी यांनी देवधर्म पूजा पाठ यातच लक्ष केंद्रित केले आहे. आई सप्तश्रृंगी देवी, माता कामाख्यादेवी यांच्या पूजा पाठासाठी कामिनी यांना पाचारण करण्यात येतेे. तसेच, मोठ-मोठ्या वास्तू, कार्यालय घरभरणी यावेळीही पूजापाठ करण्यास कामिनींना निमंत्रित करण्यात येते. यातूनच कामिनी यांचा उदरनिर्वाह होत असतो, तर कोरोना काळात पूजा पाठ आणि सगळेच बंद झाले. कामिनी यांच्या घरातच नव्हे, तर वस्तीवर कोरोनाचे सावट पसरले. दोन वेळच्या काय एक वेळच्या अन्नाचीही दात सुरू झाली.

अशावेळी रा.स्व.संघाच्या स्वयंसेवकांनी या वस्तीत अन्नधान्य ताजे अन्न आणि मूलभूत गरजेच्या वस्तू वितरण करणे सुरू केले. याच काळात कामिनीचा आणि माझा संपर्क झाला. वस्तीचा कामिनीवर विश्वास आहे. त्यामुळे वस्तू वितरण व्यवस्थित करायचे, तर ते कामिनीताईच करू शकेल, असे सगळ्यांना वाटले. या काळात कामिनी यांनी या वस्तीच्या आणि मुख्यतः इतर किन्नर भगिनींच्या जगण्यासाठी जे कार्य केले ते शब्दातीत आहे. कोरोना काळामध्ये पायाला भिंगरी बांधून कामिनी यांनी किन्नर भगिनीची सेवा केली. मग ते अन्नधान्य वितरण असू दे की, कोरोनाची लस वितरण असू दे. सेवा सहयोग स्वयंसेवी संस्था दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरण करते. तेव्हा कामिनी यांनी मला विचारले होते की, आमच्या किन्नर भगिनींच्या घरी लहाण भाऊ बहीण आहेत. त्यांना देता येईल का? तेव्हा शालेय साहित्याचे वितरणही सेवासहयोगतर्फे आपण केले होते. तर अशा कामिनीनी तरुण किन्नर भगिनींच्या मनातील उदासीनता दूर करण्याचे जे काम केले ती खरी जगण्यातली रोषणाई होती.

मनात विचार येत असतानाच कामिनी मनोगत व्यक्त करण्यासाठी उभ्या राहिल्या. त्या म्हणाल्या, आताची परिस्थिती बदलली आहे. किन्नर असणे पाप नाही. समाजही आम्हाला माणूस म्हणून स्वीकारतो आहे. आमच्या किन्नर भगिनींना वाईट अनुभव येत असतात हे खरे आहे. पण, जगात असं कुणीच नाही की त्याला कधीच वाईट अनुभव येत नाहीत. तुम्ही आमच्यासोबत दिवाळी साजरी करता आम्हाला आपल मानता. हीच आमची खरी दिवाळी. कामिनी यांचे म्हणणे खरेच होते. कारण, किन्नर भगिनींसोबत दिवाळी साजरी करायची म्हटल्यावर समाजातले बंधू पुढे आले होते. भगिनींना अजित सांडू यांच्यातर्फे साडी, ‘माय ग्रीन सोसायटी’तर्फे मिठाई वितरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी सभागृह आणि सर्वच व्यवस्था ईशान्य मुंबई भाजप सचिव सुरेश गंगादयाल यादव यांनी उपलब्ध करून दिले होते.

असो, या संमेलनाला अजित सांडू आणि रमेश ओवळेकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच मनोज रहाटे, शरद हे स्वयंसेवक उपस्थित होते. यावेळी अजित सांडू, ममता सांडू आणि रमेश ओवळेकर, मंजू सुरेश यादव यांनी अक्षरशः दोन शब्दांत शुभेच्छा देऊन मनेागत व्यक्त केले. कारण त्यांचे म्हणणे होते की, किन्नर भगिनींच्या जगण्याचे वास्तव दुरून माहिती होते पण आज ते काही अनुभवले त्यामुळे वाटते की, आपण खूप संवेदनशील आहोत. मात्र, ‘चलो जलाये दीप वहा जहा अब भी अंधेरा है.’ या सगळ्यांचे म्हणणे ऐकून एकच वाटते की, या किन्नरांची आपल्याकडून अपेक्षा तरी काय आहे? केवळ आपण त्यांना माणूस म्हणून स्वीकाराव हीच! आपण खरच जर स्वतःला माणूस समजत असू तर मग देवानेच निर्माण केलेल्या या किन्नरांचेही माणूसपण आपण स्वीकारायला हवे.

ती भावना या संमेलनाने उपस्थित शेकडो महिलांमध्ये जागवली.लिंगभेदाचा जो अंधार होता तो तिथे नष्ट झाला होता. खर्‍या अर्थाने दिवाळीचे तेज मांगल्य तिथे प्रज्वलित झाले होते.
९५९४९६९६३८
Powered By Sangraha 9.0