मुंबई : नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (NAREDCO) महाराष्ट्रद्वारे भारतातील सर्वात मोठा रिअल इस्टेट प्रॉपर्टी एक्सपो, 'होमथॉन प्रॉपर्टी एक्सपो २०२३' च्या दुसऱ्या आवृत्तीचे आयोजन करण्यात येणार आहे. जिओवर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, बीकेसी येथे हे आयोजन करण्यात येणार आहे.
येत्या २४ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत हा एक्स्पो पार पडणार आहे. गेल्या वर्षी झालेल्या होमथॉन एक्स्पोला अभूतपूर्व यश मिळाले होते. त्यापेक्षाही यावर्षीचा एक्स्पो मोठा असणार आहे. होमथॉन एक्स्पो २०२३ मध्ये महाराष्ट्रातील आघाडीच्या विकासकांकडून ५०० हून अधिक प्रकल्पांचे प्रदर्शन केले जाईल. यामुळे घर खरेदीदारांना अनेक विभागांमधील मालमत्तांच्या श्रेणीतून निवडण्याची संधी मिळेल.
या एक्सपोमध्ये परवडणारी आणि लक्झरी अशी दोन्ही प्रकारची घरे उपलब्ध असतील. यामध्ये संपूर्ण मुंबईतील प्रॉपर्टीज आणि एमएमआर तसेच ठाणे, कल्याण, नवी मुंबई, पनवेल, रायगड, मीरा रोड, वसई, विरार इत्यादींचा समावेश आहे. याशिवाय पुणे, नाशिक आणि नागपूर येथील मालमत्तांसह द्वितीय गृह प्रकल्प आणि भूखंड योजनांचाही समावेश आहे. या एक्स्पोमध्ये अग्रगण्य हाऊसिंग फायनान्स कंपन्या घर खरेदीदारांसाठी आकर्षक गृहकर्ज ऑफर उपलब्ध करून देणार आहेत. त्यामुळे घर खरेदीसाठी उत्सुक असलेल्यांसाठी हा एक्स्पो एक पर्वणीच ठरणार आहे.