'नथुराम गोडसे' पुन्हा एकदा रंगमंचावर!

20 Nov 2023 15:17:21

nathuram godse 
 
मुंबई : 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकाने मराठी रंगभूमीवर एक इतिहास घडवला आणि सारी नाट्यसृष्टी ढवळून निघाली. राष्ट्रपिता महात्मा गांधीची हत्या करणाऱ्या नथुरामची बाजू मांडणाऱ्या या नाटकाचे लेखन ज्येष्ठ नाटककार कै. प्रदीप दळवी यांनी केले आणि ते नाटक दिग्दर्शित करण्याचे धाडस मराठी रंगभूमीवरील दिग्दर्शक विनय आपटे यांनी केले. आज अनेक वर्षानंतर ए नाटक पुन्हा रंगमंचावर येत आहे! तसेच या निमित्ताने नाटकाचा ८१८ व प्रयोग संपन्न होणार आहे.
 
'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नावानेच त्यावेळी महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ माजली, माऊली प्रॉडक्शन्सचे संचालक आणि नाटकाचे निर्माते उदय धुरत यांनी त्यावेळी यशस्वीपणे लढा दिला आणि नाटक कोर्टाच्या विवादातून मुक्त केले. नाटक सेन्सॉर संमत करावे लागले. त्यानंतरही अनेक वेळा या नाटकावर विविध पद्धतीने दबाव आणायचा राजकीय प्रयत्न झाला, नाटकाची बसही सामानासकट जाळण्याचे प्रयत्न झाले, त्यातील एक यशस्वी ठरला; सातत्याने प्रयोग सुरूच ठेवले.
 
नाटकाचे पुनर्दिग्दर्शन विवेक आपटे करीत असून कै. विनय आपटे यांच्या तालमीत तयार झालेल्या वैचारिक आणि कलात्मक बैठकीचा प्रभाव त्यांच्या या नाटकात पाहायला मिळेल. नथुराम यांच्या वयाच्या जवळपास जाणाऱ्या वयाचा अभिनेता त्यांना या नाटकासाठी हवा होता, तो शोध आता पूर्ण झाला आहे. नव्या नाटकात संगीतकार अशोक पत्की, नेपथ्य प्रकाश परब, रंगभूषा प्रदीप दरणे, वेशभूषा नाना गुजर, दृक्श्राव्य संकलन अभिमान आपटे, ध्वनी संकेत रुपेश दुदम, जाहिरात संकल्पना अक्षर कमल शेडगे अशी तंत्रज्ञांची चांगली फळी काम करीत आहे. नाटकाच्या मागे उभे असणारे आणि गेली ५० वर्षे निर्मिती क्षेत्रात कार्यरत असलेले ज्येष्ठ निर्माते उदय धुरत, निर्मिती सूत्रधार श्रीकांत तटकरे, निर्मिती प्रशासक चैतन्य गोडबोले, तसेच निर्मिती सहाय्यक प्रणित बोडके, सूत्रधार भगवान गोडसे यांचे योगदान महत्वाचे आहे.
 
या नाटकात आकाश भडसावळे, चिन्मय पाटसकर, सुजित देशपांडे, तेजस बर्वे, स्वप्निल फडके, अमित जांभेकर, समर्थ कुलकर्णी, गौरव निमकर विविध व्यक्तिरेखा साकारत असून नथुराम गोडसेंच्या मुख्य भूमिकेत अभिनेता सौरभ गोखले झळकणार आहे. नाटकाच्या जोरदार तालमी सुरू असून नव्या तंत्रांसह, नव्या ढंगात, तितक्याच ताकदीचा आणि वेगळ्या धाटणीचा 'दुसरा नथुराम' ८१८ वा प्रयोग घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Powered By Sangraha 9.0