मुंबई : एकदिवसीय विश्वचषकात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामन्यात भारताच्या पदरी निराशा आली. विश्वचषकील प्रत्येक सामना जिंकून अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर झालेला पराभव भारतीय खेळाडूंच्या आणि प्रत्येक भारतीय नागरिकांच्या जिव्हारी लागला आहे. मात्र, अशा स्थितीतही भारतीयांनी खेळाडूंना प्रोत्साहन देणाऱ्या पोस्ट समाज माध्यमावर केल्या आहेत. तर काही जणांना दुर्दैवाने कुणी त्यांना वाईट म्हणणारे मीम्स व्हायरल केले आहेत. परंतु, या सगळ्यात अभिनेता जितेंद्र जोशीने केलेल्या खास पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतले आहे.
जितेंद्रने एक पोस्ट करत लिहिले की, 'आता पराभवानंतर काहीजण आपल्या संघाबद्दल वाईट प्रतिक्रिया देतील, त्यांच्याबद्दल उलटसुलट गोष्टी बोलतील, टीका करतील. काही नेटकऱ्यांनी तर आधीच बालिश मीम्स बनवले आहेत. पण, या संपूर्ण सीरिजमध्ये आपल्या संघाने उत्कृष्ट कामगिरी केली हे आपण विसरून चालणार नाही. आपल्या टीमचा मला प्रचंड अभिमान आहे कारण, एकही सामना न गमावता त्यांनी अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. आपल्याला स्वप्न दाखवली…यंदा आपण जिंकू असा विश्वास आपल्यात निर्माण केला. आपण सगळे एक प्रेक्षक आणि कुटुंब म्हणून एकत्र खेळलो.. शेवटी हा एक खेळ आहे! कुणाला जिंकण्यासाठी कुणाला तरी हार मानावी लागते…हा दिवस आपला नसला तरी आपली टीम खूप चांगली खेळलेली आहे. आता मी खरंच दु:खी आहे पण त्या खेळाडूंपुढे आपलं दु:ख काहीच नाही. त्यांनी सर्वस्व पणाला लावलं होतं. आपल्या सर्वांच्या वतीने ते मैदानात खेळले.'
पुढे त्याने असे देखील लिहिले आहे की, “आपण या विश्वचषकात सर्वोत्कृष्ट ठरलो नाही याचा अर्थ आपण हरलो असा होत नाही. माझ्या टीमला माझा कायम पाठिंबा आहे. मी कायम त्यांच्याबरोबर आहे. असो…ऑस्ट्रेलिया संघाचे अभिनंदन…तुम्ही आमच्यापेक्षा चांगला खेळ खेळलात!”.
अभिनेता जितेंद्र जोशी नुकताच नाळ भाग २ मध्ये दिसला होता. राष्ट्रीय पुरस्कारावर नाव नोंदवणाऱ्या नाळ चित्रपटाचा भाग होता आल्याचा आनंद जितेंद्र जोशी याने महाएमटीबीशी बोलताना व्यक्त केला होता. तसेच, लेखक-दिग्दर्शक नागराज मंजुळे सोबत माझी नाळ फार जुनी असल्याचे देखील जितेंद्र यावेळी म्हणाला होता.