मुंबई : विश्वचषक २०२३ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताच्या पदरी पराभव आला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हा सामना रंगला होता. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा हा रंजक सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार देथी उपस्थित होते. यात किंग खान शाहरुख खान पत्नी गौरी खान सह सामना पाहण्यासाठी गेला होता. भारताच्या पराभवानंतर चाहते आणि कलाकार जरी निराश झाले असले तरी त्.नी भारतीय क्रिकेटपटूंचे कौतुक केले आहे. यात शाहरुख खान याचाही समावेश आहे.
शाहरुख खानने ट्विट करत आपल्याला भारतीय संघाचा अभिमान असल्याचं म्हटलं आहे. शाहरुखने लिहिलं, “भारतीय संघाने ही संपूर्ण स्पर्धा ज्या प्रकारे खेळली ती सन्मानाची गोष्ट आहे. या स्पर्धेत त्यांनी खूप उत्साह आणि चिकाटी दाखवली. हा एक खेळ आहे आणि नेहमीच एक किंवा दोन दिवस वाईट असतात. दुर्दैवाने आज ते घडलं….परंतु क्रिकेटमधील आमच्या लिगसीचा आम्हाला अभिमान वाटेल, अशी कामगिरी केल्याबद्दल टीम इंडियाचे आभार…तुम्ही पूर्ण भारताला खूप आनंद दिला. तुमच्यासाठी खूप प्रेम आणि आदर आहे.”
तर अभिनेत्री काजोलनेही पोस्ट करत लिहिले आहे की, “हारकर जीतने वाले को बाजीगर कहते है! टीम इंडिया तुम्ही खूप चांगले खेळलात. आणखी एक वर्ल्ड कप जिंकल्याबद्दल ऑस्ट्रेलियाला शुभेच्छा.” हिंदीसह अनेक मराठी कलाकारांनी देखील भारतीय क्रिकेट संघाच्या पाठीशी उभे राहात सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत.