मुंबई : आदित्य ठाकरेंच्या ग्लासमध्ये कोणत्या ब्रँडची व्हीस्की? असा सवाल भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून विचारण्यात आला आहे. खासदार संजय राऊत यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा एक फोटो ट्वीट केला होता. ज्यात त्यांनी म्हटले की, महाराष्ट्र पेटलेला आहे… आणि हे महाशय मकाऊ येथे कासिनोत जुगार खेळत आहेत. फोटो झुम करुन पहा…ते तेच आहेत ना? असा प्रश्न उपस्थित करत पिक्चर अभी बाकी है… असे राऊतांनी म्हटले होते.
राऊतांच्या ट्विटला प्रत्त्युत्तर देताना भाजपने ट्विट केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे त्यांच्या आयुष्यात कधी जुगार खेळलेले नाहीत. ते ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी तेथील हा परिसर. असो, ज्यांच्या आयुष्याचा जुगार झालाय, त्यांची दृष्टी त्यापलिकडे जाऊ शकत नाही. आम्हाला फक्त एक सांगा संजुभाऊ, आदित्य च्या या ग्लासमध्ये कोणत्या ब्रँडची व्हीस्की?" असा खोचक सवाल उपस्थित केला आहे.