वॉशिंग्टन : OpenAIच्या CEO पदावरुन बरखास्त केल्यानंतर सॅम ऑल्टमॅन आता मायक्रोसॉफ्टमध्ये रुजू होणार आहे. स्वतः मायक्रोसॉफ्टचे CEO सत्या नाडेलांनी Xवर पोस्ट करत याबद्दल माहिती दिली. ऑल्टमॅनसह ग्रेग ब्रॉकमैन (Greg Brockman) सुद्धा मायक्रोसॉफ्टसोबत काम करणार आहेत. अधिक माहितीनुसार, सॅम ऑल्टमॅन आणि ब्रॉकमॅन मायक्रोसॉफ्टच्या एका नव्या A। रिसर्च टीमचं नेतृत्व करणार आहेत.
OpenAI कंपनीतील संचालक मंडळाने १७ नोव्हेंबर रोजी CEO ऑल्टमॅन यांना पदावरुन बरखास्त केलं होतं. त्यांच्यावर संचालक मंडळाशी सुसंवाद न ठेवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळेच काम करणे कठीण जात असल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. त्या निर्णयानंतर Open AI चे सहसंस्थापक आणि अध्यक्ष ग्रेग ब्रॉकमॅन यांनीही राजीनामा सोपविला. ऑल्टमॅनवरील कारवाईनंतर काही तासांतच अन्य तीन वरिष्ठांनी आपला राजीनामा सोपवला.
OpenAI चे रिसर्चर जॅकब पचॉकी, एलेग्झांडर मॅड्री आणि सिजमन सिदोर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान कंपनीने शुक्रवारीच एका निवेदनात म्हटले आहे की, ‘‘Open AIचे नेतृत्व करण्याच्या क्षमतेवर आता संचालक मंडळाला विश्वास नाही." Open AI च्या मुख्य तंत्रज्ञान अधिकारी मीरा मुरातींना तत्काळ CEO पदावर नियुक्त केले आहे.