मुंबई : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या (महापारेषण) जनसंपर्क विभागाला (सांघिक सुसंवाद विभाग) पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील तीन पारितोषिके जाहीर झाली आहेत. यामध्ये सर्वोत्कृष्ट सोशल मीडिया ऍन्ड पीआर, ब्रॅंडिंग, सर्वोत्कृष्ट फिल्म (इंग्रजी) आणि भारतरत्न श्री. अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय जागृती अभियान हा विशेष पुरस्कार मिळाला आहे. या पारितोषिकांबद्दल महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार (भा.प्र.से.) यांनी जनसंपर्क विभागाचे कौतुक केले आहे.
पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया ही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी देशातील सर्वोत्तम संस्था आहे. भारतातील विविध राज्यांत तसेच संयुक्त अरब अमिरात, श्रीलंका आदी देशांतही सोसायटीच्या शाखा आहेत. नवी दिल्लीतील डॉ. भीमराव आंबेडकर आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटरमध्ये २५ ते २७ नोव्हेंबरला होणाऱ्या आंतरराष्ट्रीय जनसंपर्क महोत्सवाच्या उदघाटन समारंभात या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
महापारेषणच्या जनसंपर्क विभागाची विविध पुरस्कारासाठी निवड करताना अधिकारी व कर्मचारी यांच्या अंतर्गत (Internal) व बहिर्गंत (External) संपर्कासाठी केलेले उपक्रम, महापारेषण समाचार या गृहमासिकात (House Magazine) केलेले डिजिटल बदल, क्यू-आर कोड, पॉडकास्टचा सकारात्मक पध्दतीने वापर केला आहे. नागरिकांनी उच्च दाब वीजवाहिनीची काळजी कशी घ्यावी, तौक्ते व निसर्ग चक्रीवादळात महापारेषणच्या अधिकाऱ्यांनी सुरळीत वीजपुरवठ्यासाठी केलेली कामगिरी, महापारेषणने ड्रोनच्या सहाय्याने दुर्गम भागात अखंड वीजपुरवठ्यासाठी केलेली कामगिरी ही फिल्ममध्ये ऍनिमेशनचा वापर करून दाखविली आहे. या फिल्मची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे.
तसेच महापारेषणचे व्हॉटसअप बुलेटिन, ऑडिओ-व्हिज्युअल्स बुलेटिन, व्हॉटसअप चॅनेल, सोशल मीडियाचा सकारात्मक पध्दतीने जनसंपर्कासाठी वापर, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना, उपक्रम, अभियान सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेसमोर मांडले. केंद्र शासनाच्या `उज्ज्वल भारत; उज्ज्वल भविष्य` या अभियानात ऊर्जा विभागाने केलेली कामगिरी, मराठी भाषेचा जागर, पत्रकारिता व जनसंपर्क विभागाच्या विद्यार्थ्यांशी वार्तालाप, विविध प्रसारमाध्यमांच्या कार्यक्रमात महापारेषणची भूमिका विषद करण्यात आली.
महापारेषणच्या जनसंपर्क विभागाने क्यू-आर कोडच्या माध्यमातून नोकरभरतीच्या जाहिराती डिजिटल स्वरूपात केल्या. डिजिटल ई-न्यूजलेटर फ्लिपबुकच्या स्वरूपात मांडले. पॉडकास्टच्या माध्यमातून आधुनिक संवाद ही संकल्पना राबविणारी महापारेषण ही पहिली कंपनी ठरली आहे.
जनसंपर्क विभागाचा क्रिएटिव्ह कामांवर भर
महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार (भा.प्र.से.) यांच्या नेतृत्वाखाली व संचालक (संचलन) श्री. संदीप कलंत्री, संचालक (प्रकल्प) श्री. सुनील सूर्यवंशी, संचालक (वित्त) श्री. अशोक फळणीकर, संचालक (मनुष्यबळ विकास) श्री. सुगत गमरे यांच्या मार्गदर्शनाखाली जनसंपर्क विभाग सातत्याने सर्जनशील व नावीन्यपूर्ण उपक्रम राबवित आहे. यंदाची दैनंदिनी व दिनदर्शिका देखील पहिल्यांदाच डिजिटल स्वरूपात असणार आहेत. तसेच लवकरच आर्टिफिशियल इंटेलिजिन्सच्या माध्यमातून `महापारेषण समाचार` च्या अंकाचा चेहरा-मोहरा बदलणार आहे, असे महापारेषणचे जनसंपर्क अधिकारी मिलिंद आवताडे म्हणाले आहेत.