"राऊतांच्या स्वप्नातल्या गोष्टी बाहेर आल्या तर..." प्रसाद लाड यांची टीका
20-Nov-2023
Total Views | 45
मुंबई : संजय राऊत यांच्या ‘स्वप्ना’तल्या गोष्टी आम्ही बोलायला चालू केलं, तर राऊतांच स्वप्न भंग होईल. राऊतांनी बावनकुळेंबद्दल अपप्रचार करण्यापेक्षा नको ते उद्योग करणाऱ्या स्वतःच्या मालकाबद्दल बोलावं. अशी टीका आमदार प्रसाद लाड यांनी खासदार संजय राऊतांवर केली आहे. राऊत यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा एक फोटो ट्वीट केला होता. त्यास आता भाजपकडुन प्रत्त्युत्तर देण्यात येत आहे.
प्रसाद लाड म्हणाले, "वर्षभर पक्षासाठी काम केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा दोन वेळा फिरल्यानंतर कुटूंबाबरोबर दिवाळीच्या सुट्टीनिमित्त चंद्रशेखर बावनकुळे जर जात असतील, तर त्यामुळे राऊतांच्या पोटात दुखण्याचं कारण काय? बावनकुळे ज्या मकाऊ शहरात गेले कदाचित राऊतांनी ते शहर पाहिलं नसेल. तिथे पोर्तुगाल आणि चायनीज संस्कृतीचा संगम आहे. वेगवेगळ्या प्रकारचे हॉटेल्स, वेगवेगळ्या प्रकारचे कसिनो पहायला जगभरातुन लोकं तिथे जातात."
"परंतु ज्यांचा मालक नको ते उद्योग करतो, ज्यांचा मालक तेलगी लोकांबरोबर पार्ट्या करतो. त्याच्याबद्दल बोलायचं सोडून प्रामाणिक कार्यकर्त्यावर आरोप करणं राऊत तुम्हाला किती शोभतं? अशा गोष्टी तुमच्या स्वप्नातल्या बाहेर आल्या तर, तुमचं स्वप्न भंग होईल. हा माझा तुम्हाला गर्भीत इशारा आहे." असा घणाघात प्रसाद लाड यांनी राऊतांवर केला आहे.