ड्रेसिंग रुममध्ये पंतप्रधान मोदी आणि भारतीय संघाच्या भेटीत नेमकं काय घडलं?
20 Nov 2023 17:09:54
मुंबई : विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंमध्ये निराशा पसरली होती. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांची भेट घेत त्यांचे मनोबल वाढवले आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंनी यासंदर्भातील एक फोटो शेअर केला आहे.
रविवारी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना अहमदाबादमध्ये पार पडला. यामध्ये भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे टीम इंडियाचे खेळाडू दु:खी झाले होते. यावेळी कर्णधार रोहित शर्माचा रडतानाचा एक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ड्रेसिंग रूममध्ये जाऊन सर्व खेळाडूंचे मनोबल वाढवत त्यांना आणखी चांगले खेळण्याची प्रेरणा दिली आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने यासंबंधी एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने लिहिले की, “ही स्पर्धा आमच्यासाठी खूप चांगली होती, पण काल आम्ही थोडे मागे पडलो. मन दुखावले, पण आपल्या लोकांचा पाठिंबा आपल्याला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत असतो. ड्रेसिंग रूममधील पंतप्रधान मोदींची भेट विशेष आणि प्रेरणादायी होती," असे त्याने म्हटले आहे.
दुसरीकडे, भारताचा गोलंदाज मोहम्मद शमीनेही यासंदर्भातील एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये पंतप्रधान मोदी मोहम्मद शमीची गळाभेट घेताना दिसत आहेत. या पोस्टमध्ये मोहम्मद शमीने लिहिले की, “दुर्दैवाने काल आमचा दिवस नव्हता. भारतीय संघाला पाठिंबा दिल्याबद्दल मी सर्व भारतीयांचे आभार मानू इच्छितो. मी विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आभारी आहे, जे ड्रेसिंग रूममध्ये येऊन आम्हाला प्रोत्साहन दिले," असेही त्याने म्हटले आहे.