मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीनंतर पक्ष-चिन्हाचा वाद निवडणूक आयोगात सुरू आहे. अजित पवार गटाकडून पक्ष आणि चिन्हावर दावा सांगण्यात आल्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत कायदेशीर लढाई सुरू झाली. यानंतर निवडणूक आयोगासमोर आतापर्यंत तीन सुनावण्या झाल्या. या तीनही सुनावणीदरम्यान दोन्ही गटांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. दरम्यान दि. २० नोव्हेंबर रोजी सुनावणीमध्ये निवडणुक आयोगाने शरद पवार गटाच्या वकिलांची कानउघडणी केली आहे.
निवडणुक आयोगाने सांगितले की, प्रत्येक सुनावणीत तेच तेच मुद्दे उपस्थित करू नका. गेल्या सुनावणीत ही बनावट प्रतिज्ञापत्राचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. ह्यावेळी ही तोच मुद्दा उपस्थित केल्याने आयोगाने नाराजी व्यक्त केली आहे. या सुनावणीला शरद पवार गटाकडून शरद पवार, सुप्रिया सुळे तर अजित पवार गटाकडून पार्थ पवार उपस्थित होते.